संस्कार आणि संस्कृती यांचे प्रतीक – माझा भारत देश

महारथी कर्णा कडे जी सूर्यदेवतेकडून मिळालेली कवच-कुंडले होती, ती त्याची सुरक्षा कवच होती.  तशीच कवच-कुंडले आहेत प्रत्येक भारतीयाकडे, संस्कार आणि  संस्कृतीची.

स्वामी विवेकानंदांच्या विश्वादिग्विजयानंतरचा एक प्रसंग. अमेरिकेतील प्रबुद्ध नागरिकांच्या एका सभेत एका विद्वानाने त्यांना विचारले , ”स्वामीजी, ज्या भारतीय संस्कृतीचा इतका गौरव तुम्ही सातत्याने सर्वत्र करीत आहात त्या भारतीय संस्कृतीचे एखादे एकमेवाद्वितीय  वैशिष्ट्य एका वाक्यात सांगू शकाल ? ”प्रश्नकर्त्याला वाटले होते,स्वामीजींना उत्तर द्यायला वेळ लागेल.पण क्षणार्धात मंद स्मित करीत स्वामीजी उत्तरले ,”एक वाक्य कशाला, एका शब्दात सांगतो,साऱ्या जगाला हेवा वाटावा असे माझ्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य, आमची कुटुंब संस्था !”

“कुटुंब” ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ परंपरा आहे. आपला भारत देश या “ कुटुंबसंस्थे” मुळेच आज जगात वेगळा आहे. अनेक वर्षांच्या संघर्षातही आपल्या संस्कृतीची , धर्माची, जीवनमूल्यांची पाळेमुळे कुटुंब या संस्थेने तगवून आणि जगवून ठेवली . या कुटुंबाचे हृदय म्हणजे घरातील स्री आहे . मग ती स्त्री पत्नी , मुलगी, बहीण, या विविध भूमिका जगणारी का असेना , ती पूर्ण घरावर संस्कार करत असते. नवीन पिढी घडवत असते . घरातील स्त्री जर संयमी , संस्कारित ,कर्तृत्ववान ,संघटित , क्षमा

शील असेल तर मुले चांगली घडतात . इतिहासातील असंख्य उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे . या कुटुंब संस्थेचा पाय असणारी “आई” आपल्या मुलाला दोन गोष्टी प्रामुख्याने देण्याचा प्रयत्न करते. १) भरभक्कम मुळे २) बळकट पंख

जसे एखादे झाड लावताना जमिनीची मशागत केली जाते , त्याप्रमाणे मूल जन्माला येण्यापूर्वी आई आपल्या गर्भावर संस्काररूपी मशागत करते. चांगले  वाचन, चांगले विचार व कर्म याचे आचरण करून येणाऱ्या मुलाला संस्कारानी सिंचित करते. प्रत्येक भारतीय स्त्री “जिजामाता” बनून आपल्या मुलाला थोर मोठ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगते ज्यामुळे “ शिवरायांसारखे “ पुत्र आणि “राणी लक्ष्मीबाई सारख्या” शूरांगना घडतात.

आपले आयुष्य घडवणाऱ्या संस्कारांचे विद्यापीठ आहे “ कुटुंब”. धर्म , राजकारण , कला, विज्ञान ,समाजसुधारणा या विविध क्षेत्रातील कोणताही महापुरुष घ्या , त्याच्या जडणघडणीमागे आपल्याला आई व पत्नी दिसते . उदाहरणे द्यायची झाली तर शिवाजीमहाराजांसारखा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जिजामातेसारख्या जननीने  घडविला. स्त्री शिक्षणाचे धडे देणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांच्या सोबतीने समाज सुधारक म्हणून उदयास आले. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती ह्यांच्या यशातही त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा मूर्तिंजी ह्यांचा सिंहाचा वाटा आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीचे वर्णन करायचे झाले तर असे काहीसे करता येईल . जुना वाडा ज्यात गजबजलेले एकत्र कुटुंब राहतंय.पणजीपणजोबा , आजीआजोबा ,काकाकाकू , आईवडील, नातवंडे ,भावंडे … सूर्योदयानंतर  सडा, रांगोळी, देवपूजा करणारी घरातील मंडळी , एकत्र जेवण करताना  वदनी कवळ म्हणणारे ,  संध्याकाळी देवघरासमोर हात जोडून शुभंकरोती व रामरक्षा म्हणणारे मुले …. रात्री आजीकडून श्रावणबाळ , एकलव्य , प्रभू रामचंद्र व श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकत झोपत जाणारी निरागस मुले भविष्यातील भारत घडवत असतात.

ह्या संस्कारानंतर आमची परंपरा” भारतीय संस्कृती” साजरा केल्या जाणाऱ्या विविध सणांमधून दिसते . कसे ते पाहू…

महाराष्ट्र , कर्नाटक, तेलंगणा ,आंध्र प्रदेश मधील कॅलेंडर सारखे असते. चैत्रप्रतिपदेला आपला  गुढीपाडवा ह्या तीन राज्यात युगांधी म्हणून साजरा करतात. तामिळनाडूत ह्या सणाला पुथन्दू म्हणतात .वैशाख मधील पौर्णिमा वटसावित्री पूजा वरील राज्यात केली जाते. आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा दक्षिणेत साजरे केले जातात. श्रीमंत श्रावण महिना महाराष्ट्रात नागपंचमी पासून सुरु होतो. दक्षिणेतही हा सण असतो. पाठोपाठ येते  गोकुळाष्टमी .संपूर्ण भारतभर कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो.दहीहंडी तर जगभरात प्रसिद्ध आहे आपल्या भारतातील. केरळ मधील ओणम , महाराष्ट्रातील राखी पौर्णिमा अवर्णनीय असतात. नंतर  येणारा  गणपतीउत्सव  तर आनंद आणि उत्साह यांचे प्रतीक आहे. दशहरा किंवा दसरा म्हैसूरपासून लोकप्रिय आहे. संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा दिवाळी हा सण तर पाश्च्यात्य देशांनाही भुरळ घालतो . ह्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे ऐतिहासिक असे कारणे आहेत , त्या मागचा हेतू प्रत्येक भारतीयाला लहानपणापासून वडीलधाऱ्या लोकांकडून स्पष्ट केला जातो.माघ महिन्यात येणार सण म्हणजे संक्रांत . दक्षिणेत हा सण पोंगल म्हणून साजरा केला  जातो.

ह्याशिवाय बिहू, छटपूजा, बैसाखी, होळी, पोळा, यासारखे सण त्या त्या राज्यात लोकप्रिय आहेत.

१५ऑगस्ट आणि २६ जानेवारी हेय राष्ट्रीय सण भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय आहोत , स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ह्याची जाणीव वरील दोन दिवशी करून देते. प्रत्येक भारतीयाचा उर स्वाभिमानाने भरून यावा असे लोकमान्य टिळक,भगतसिंग, लाल बहादूर शास्त्री,वीर सावरकर सुभाषचंद्र बोस ह्या थोर नेत्यांची बलिदान पाहिलेली ही  भूमी…

ज्ञानेश्वर,तुकाराम,रामदास स्वामी, गजानन महाराज ह्या सारख्या थोर संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली माझी भारत भूमी, मला अतिशय अभिमान आहे मी  भारतीय असण्याचा !

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *