श्रीराम का गुणगान कीजे

इंडिक विचार साठी हा पहिला लेख लिहिताना मला खूप आनंद होतोय. भारताच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर आपण आज उभे आहोत. बरोबर दहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे श्रीरामाच्या जन्मस्थानी, म्हणजे अयोध्येत भव्य राममंदिराचे भूमीपूजन केले होते. त्या वेळी त्यांनी रामलल्लापुढे घातलेला साष्टांग दंडवत आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ह्याच पंतप्रधान मोदींनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर असाच दंडवत घातला होता. त्यांचे दोन्ही नमस्कार म्हणजे अस्सल हिंदू धर्मविचाराचे अविष्कार आहेत. पहिला नमस्कार होता कर्मभूमीला आणि दुसरा नमस्कार होता धर्मभूमीला. भारतीय तत्वज्ञानाने नेहमीच कर्माला धर्माचे अधिष्ठान पाहिजे असा विचार मांडला आहे. पण आपल्याला अभिप्रेत असलेला धर्म म्हणजे केवळ मंदिरात जाणे, उपासना करणे इतक्यापुरताच सीमित नाही तर ती एक विचारपद्धती आहे, आचारपद्धती आहे. म्हणूनच आपल्याकडे आदर्श राज्यपद्धतीला अजूनही रामराज्य हेच नाव आहे. भारतीय घटनाकारांनाही हेच अपेक्षित होते म्हणून तर मूळ घटनेच्या मूलभूत हक्क विधीत करणाऱ्या पानावर रावणाचा वध करून लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येत परतलेल्या विजयी श्रीरामाचे चित्र आहे. न्यायी, आदर्श असे रामराज्य प्रस्थापित करणे हा आपल्या लोकशाहीचा मूळ गाभा आहे हे पंतप्रधानांनी राममंदिराचे भूमिपूजन करून परत एकवार सर्व जगाला दाखवून दिले. त्यादिवशी पूजेचा संकल्प सांगताना अयोध्येतल्या पुरोहिताने पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘स्वराष्ट्र प्रतिनिधी’ असा केला होता. त्या शब्दांना खोल अर्थ आहे. पंतप्रधान अयोध्येत केवळ एक भाविक हिंदू म्हणून गेले नव्हते, किंवा केवळ हिंदूंचे प्रतिनिधी म्हणूनही गेले नव्हते. ते अयोध्येत गेले होते ते अखिल भारताचे प्रतिनिधी म्हणून, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी.

 

 

अयोध्येत पाच ऑगस्टला साकार झालेला श्रीराममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहोळा डोळे भरून पाहिला तेव्हापासून भारतातल्या करोडो लोकांच्या तनामनात फक्त श्रीरामच भरून उरलाय, म्हणून तर माझ्या ९३ वर्षांच्या आजेसासूबाईंनी आपल्या थरथरत्या आवाजात त्यागराजांचे एक श्रीराम भजन रेकॉर्ड करून मला पाठवले तर एका चार वर्षांच्या चिमुरड्याने आपल्या बोबड्या बोलांमध्ये एकश्लोकी रामायण म्हणून ते पंतप्रधान मोदींना पाठवले. श्रीराम ह्या नावाची भारतीय जनमानसावरची जादूच तशी आहे. केवळ श्रीविष्णूचा दैवी अवतार म्हणून नव्हे तर उत्कट मानवी पातळीवर श्रीराम आपल्याला जवळचे वाटतात. सर्व सामान्य मानवांना भोगावे लागणारे भोग, त्यांच्या भावना, त्यांना सोसावी लागणारी दुःखे सर्व श्रीरामानेही आपल्या आयुष्यात भोगलेली आहेत. वात्सल्य, प्रेम, कर्तव्यपूर्ती, शौर्य, न्यायप्रियता, करुणा वियोग, विजय, ह्या मानवी आयुष्यातल्या भाव-भावना श्रीरामानेही अनुभवलेल्या आहेत म्हणूनच अगदी आजही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर रामायण आपल्याला वेगळ्या रूपात भावत असतं.

 

 

पायातले पैंजण वाजवत अयोध्येतल्या राजवाड्यात ‘ठुमक चलत’ दशरथ आणि कौशल्येचं मन वात्सल्यभावनेने ओतप्रोत भरून  टाकणारा राजस बाल श्रीराम, पूर्णचंद्राचा जगावेगळा हट्ट धरणारा अवखळ श्रीराम, विश्वामित्रांचे शिष्यत्व पत्करलेला नवतरुण कोदंडधारी श्रीराम, सलज्ज सीतेच्या गळ्यात वरमाला घालणारा देखणा वरवेषातला श्रीराम, वडिलांच्या वचनाचा आदर करण्यासाठी म्हणून वनवास पत्करायचा निर्णय घेणारा आज्ञाधारक पुत्र राम, कैकेयीच्या हट्टापायी हतबल झालेल्या वडिलांचा अत्यंत धीरोदात्त निरोप घेणारा समजूतदार श्रीराम, वनवासात सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या सहवासात एका छोट्या पर्णकुटीत आनंदाने  वास करणारा प्रेमळ पती श्रीराम, सीतेचे रावणाने हरण केल्यानंतर शोकाने वेडा-पिसा होऊन रानोमाळ भटकणारा शोकविव्हळ प्रियकर राम, वानरसेनेचे नेतृत्व स्वीकारणारा धीरोदात्त सेनानायक श्रीराम, रावणाचा वध करणारा विजयी नायक राम, आपला वनवास संपवून अयोध्येत विजयी राजा म्हणून परत आलेला राम, सीतेवर अपार प्रेम आणि विश्वास असतानाही केवळ राजाचे जनतेप्रती असलेले कर्तव्य बजावण्यासाठी म्हणून तिला वाल्मीकींच्या आश्रमात सोडून येण्याची आज्ञा देणारा कर्तव्यकठोर, निर्मम राजा राम, आपली कथा आपल्यासारख्याच दिसणाऱ्या दोन कोवळ्या ऋषीकुमारांच्या तोंडून ऐकून अनामिक वात्सल्यभावनेने भरून आलेला पिता राम आणि शेवटी सीता त्याला कायमची सोडून गेल्यानंतर ते जळते दुःख सदैव अंतरी बाळगत आपले राज्य चालवणारा सम्राट श्रीराम ही श्रीरामाची सर्व रूपे आपल्याला आपल्याही आयुष्यात कधी ना कधी तरी भेटलेली असतात. श्रीरामांनी अनुभवलेले भावनेचे कल्लोळ आपणही कधी न कधी सोसलेले असतात. त्यातून श्रीरामांनी कशी वाट काढली हे रामायण आपल्याला सतत सांगत असतं.

 

 

म्हणून तर इतकी हजारो वर्षे लोटली तरी रामकथा अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातली अनेक देशांमधून श्रीराम पूजनीय आहेत. अश्या जनप्रिय, प्रातःस्मरणीय श्रीरामाला त्याच्या मूळ जन्मस्थानी, एका भव्य मंदिरात परत एकवार विराजमान झालेलं बघण्याचा अपूर्व योग आपल्या पिढीला मिळतोय ही किती भाग्याची गोष्ट आहे. वाईट इतकंच वाटतं की ह्या करुणाराघवाच्या जन्मस्थानी हे मंदिर व्हायला ह्या देशातल्याबहुसंख्य जनतेला पाचशे वर्षे वाट बघावी लागली, कित्येक पिढ्यांचा त्याग, त्यांचा लढा खर्ची गेला तेव्हा कुठे हे मंदिर बनतंय. इस्लामी आक्रमकांनी ह्या भूमीवर, इथल्या लोकांवर, आपल्याला पवित्र असलेल्या प्रतिकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याला वेळोवेळी आपण प्रतिकारही केला पण आक्रमणाच्या मानाने तो प्रतिकार दुबळा होता म्हणूनच भारतातली चाळीस हजारच्या वर हिंदू मंदिरे जमीनदोस्त झाली. पण दहा दिवसांपूर्वी स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांना अयोध्येतली माती आपल्या ललाटी तिलक म्हणून लावताना बघितलं आणि वाटलं श्रीरामनामाच्या पुण्याईने समुद्रात वीट तरली, तसेच ह्या देशाचे भविष्यही तरुन जाईल.

 

Shefali Vaidya

Shefali Vaidya

Author,Satirist,Speaker,Fellow-Ananta Leadership Program, Convenor-Indic Academy,Love Travel,Temples and Textiles,Mum to triplets,Indian,Hindu,Woman

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *