गुरुदक्षिणा
गुरुदक्षिणा म्हंटलं कि आम्हा सर्वांच्या नजरेसमोर एकच नाव येते; ते म्हणजे “एकलव्य”, ज्याने आपल्या गुरु द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून दिला होता! हजारो वर्षांपूर्वीची हि कथा आम्हा सर्वांना परिचित आहे; परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पोलिसांशी निकराची झुंज देऊन आपल्या गुरुचे प्राण वाचवणाऱ्या एका वीरबाला, शिष्योत्तमे ची शौर्यगाथा फार कमी जणांना माहिती आहे!
गोष्ट तशी फार काही जुनी नाही… स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी दोन महिन्यापूर्वीची हि घटना!
हिंदुस्थान पारतंत्र्यात असतांना अनेकठिकाणी छोटी-मोठी संस्थाने अस्तित्वात होती. राजस्थानमधील डुंगरपूर हे देखील असेच एक संस्थान. हिंदुस्थानवर इंग्रंजीसत्तेचा अंमल असला तरी ‘डुंगरपूर’ संस्थानावर ‘महाराज लक्ष्मण सिंह’ यांचे अधिपत्य होते. अर्थात जवळपास सारेच संस्थानिक आपल्या मर्जीनुसार कारभार चालवीत असत. जनतेला त्यांच्या अधिकारांची जाणीव देखील होऊ नये याकडे त्यांचे जातीने लक्ष असे. त्यामुळे प्रजेला शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि त्यांची गरिबी कायम राहील याची ते खबरदारी घेत.
लोकांना शिक्षण मिळावे या हेतूने अनेक सेवाभावी संस्था पुढं येऊन शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करू लागल्या… गावोगावी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येऊ लागले… सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक खेड्यापाड्यातील मुलांना शाळेत जाण्यासाठी उत्तेजना देऊ लागले… त्याच माध्यमातून डुंगरपूर मधील ‘रास्तापाल’ येथे ‘नानाभाई खांट’ यांनी देखील एक शाळा स्थापित केली… त्या शाळेत ‘सेंगाभाई’ हे शिक्षक लहान-मोठ्या मुलांना शिकवू लागले… आसपासच्या पाड्यातील लहान मुलं – मुली शाळेत येऊ लागल्या…
परंतु ‘महाराज लक्ष्मण सिंह’ यांचा शिक्षणाला विरोध होता… त्यांच्या मते खेड्यापाडयातील मुले शिकली तर ते पुढे त्यांचे अधिकार मागतील, सत्तेत सहभागी होतील आणि मग आपल्या निर्विवाद सत्तेला धोका निर्माण होईल! त्यामुळे ‘महाराज लक्ष्मण सिंहांनी’ शाळा बंद करण्याचे आदेश दिले… शाळा बंद करण्यासाठी जिल्हा मॅजिस्ट्रेट, इंग्रज सैन्य आणि पोलिसांची मदत घेण्यात येऊ लागली…
१९ जून १९४७ चा दिवस होता तो… रास्तापाल गावातील पहाट आज जरा उशिरानेच उजाडली… रात्री अचानक आलेल्या पावसाने रास्तापाल मधील गावकऱ्यांची रात्री नीट झोप झाली नसल्याने ते अंमळ जरा गुरफटूनच पहुडले होते…
गावातील दोन कर्तव्यदक्ष शिक्षणप्रेमी, शाळेचे संस्थापक ‘नानाभाई’ आणि ‘सेंगाभाई गुरुजी’ मात्र आळस झटकून पहाटेपासूनच आपल्या कामाला लागले होते… रोजच्या वर्गाची तयारी करण्यासाठी ते दोघेही आपल्या शाळेत आले होते… आज सकाळच उशिरा झाल्याने अजून तरी विद्यार्थी शाळेत आले नव्हते… वर्गाची आवराआवर करण्याच्या कामात व्यस्त असलेल्या दोघांचे लक्ष विचलित झाले ते; दारासमोर अचानकपणे उभी राहिलेली एक गाडी पाहून!
“एव्हढ्या सकाळी शाळेच्या प्रांगणात हि कुणाची गाडी?” पण ते त्यांना समजायला फारसा वेळ लागलाच नाही… गाडी थांबल्या पाठोपाठ गाडीतून जिल्हा मॅजिस्ट्रेट उतरले… पाठोपाठ बंदूकधारी पोलिसांची तुकडी उतरली… आता मात्र नानाभाई आणि सेंगाभाई यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…
आपला सरकारी तोरा दाखवत मॅजिस्ट्रेट गुरगुरला, “चलो, आप दोनो बाहर आ जाओ! ये स्कूल बंद कर के चाबी हमारे हवाले दो!”
“आप पाठशाला ऐसे नहीं बंद कर सकते! सरकारी ऑर्डर दिखाईएगा!” नानाभाई खंबीरपणे उत्तरले.
“तुम मॅजिस्ट्रेट को कानून सिखाओगे? महाराजजी को ये स्कूल मंजूर नहीं है… बस ये हि ऑर्डर तुम्हे काफ़ी है”, मॅजिस्ट्रेटने गुर्मी दाखवली
“नहीं.. हम ये पाठशाला बिलकुल नहीं बंद करेंगे”, आता गुरुजी सेंगाभाईंनी इरादा स्पष्ट केला.
पोलिसांसमोर झालेल्या अपमानाने मॅजिस्ट्रेटच्या तळपायाची आग मस्तकाला गेली… त्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची पोलिसांना आज्ञा केली… त्याचबरोबर नानाभाई आणि सेंगाभाईवर सारे पोलीस तुटून पडले… बंदुकीचे दस्ते, लाथा, बुक्क्यांचे प्रहार करू लागले… एव्हढ्या साऱ्या सशस्त्र शिपायांसमोर दोन निशस्त्र शिक्षक कितीवेळ टिकाव धरणार! शाळा संचालक नानाभाई बेशुद्ध झाले; तरीही शिपायांनी त्यांना लाठ्या -काठ्या नि बंदुकीच्या दस्त्याने एव्हढं निर्दयीपणे मारले कि त्यातच नानाभाईंचा प्राण गेला…
इकडे सेंगाभाई गुरुजी मात्र अजूनही मार सहन करीत होते.. जीव गेला तरी चालेल पण शाळा नि शिकवणे बंद करणार नाही म्हणून ते निर्भीडपणे सांगत होते…
शाळेच्या आवारात चालू झालेल्या गदारोळाने गावातील मंडळी जमू लागली. पण सशस्त्र इंग्रजी शिपाई पाहून; त्यांना सोडवण्याची कोणाची छाती होईना… अजून लोक जमले तर मात्र परिस्थिती बिकट होईल; म्हणून मॅजिस्ट्रेटने जबर मारामुळे बेशुद्ध झालेल्या सेंगाभाई गुरुजींना बांधून सोबत नेण्याची आज्ञा केली… गावकऱ्यांमध्ये दहशत बसावी आणि पुन्हा कोणी शाळेत येण्याची हिम्मत करू नये म्हणून सेंगाभाईंना दोरीने बांधले… दुसरे टोक पोलीस ट्रकच्या मागील फळीला बांधण्यात आले… सारे पोलीस आणि मॅजिस्ट्रेट लगेच गाडीत बसले… मॅजिस्ट्रेटची गाडी गावाबाहेर निघाली… गुरुजी सेंगाभाई ट्रकच्या मागे बांधल्याने फरफटत ओढले जाऊ लागले… या जुलमी सशस्त्र शिपायांना अडवून गुरुजींना सोडवण्यासाठी गावातील कोणीही पुढाकार घेतला नाही!
रास्तापालच्या भिल्लवस्तीत एक गरीब कुटुंब रहात होतं. हातावर पोट असलेल्या या कुटुंबातील सर्वजण गावातील लोकांच्या शेतावर जाऊन मिळतील ती कामं करायची. त्या कुटुंबात १२-१३ वर्षाची एक मुलगी होती… तिचं नाव कालीबाई! नावाप्रमाणेच कालीबाई काळीसावळीच असली तरी नाकी डोळी देखणी होती. परकर-पोलकं घालण्याच्या वयातल्या या मुलीत बुद्धीसोबतच, चपळता, चाणाक्षपणा आणि साहस ठासून भरले होते. कालीबाईला शिक्षणाची खूप आवड होती. गावात शाळा आल्याचा तिला अत्यंत आनंद झाला होता… आता आपण शाळेत जाणार… शिकून खूप मोठे होणार… आणि मग आपल्या कुटुंबासोबतच आपल्या वस्तीतील साऱ्यांचे पांग फेडणार; हे स्वप्न ती उराशी बाळगून होती. परंतु घरची गरिबी आणि पोटाची भूक अशी होती कि; केवळ शिकण्यासाठी शेतातील कामे सोडून तिला शाळेत पाठवणं, हे त्या कुटुंबाला पेलवणारंच नव्हतं! ती जर कामावर गेली नाही तर कमावणारे दोन हात कमी झाले असते; आणि खाणारी पोटं मात्र तेव्हढीच राहिली असती…एव्हढी विदारक गरिबी! पण हि पोर कमालीची जिद्दी होती… शेतातले आपल्या वाटणीचे काम भराभर उरकून उरलेला वेळ ती शिकण्यासाठी द्यायची… बारा वर्षाच्या या मुलीत असलेला हा दृढनिश्चय; भिल्लवस्तीतील सर्वच बाया-बापड्यांसाठी कौतुकाचा विषय होता.
सेंगाभाईंना ट्रकमागे बांधून पोलीस गावाबाहेर रस्त्याला लागले… रस्त्याच्या कडेला शेतात कापणीचं काम करीत असलेल्या शेतमजुरांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही… रस्त्याच्या कडेलाच शेतात काम करीत असलेल्या कालीबाईचे तिकडे लक्ष गेले.. तिने ते विदारक दृश्य पाहीले… कालीबाईच्या चाणाक्ष नजरेने ओळखले कि, आपल्या शाळेतल्या गुरुजींना ट्रकच्या मागे बांधून फरफटत नेत आहेत आणि गुरुजी रक्तबंबाळ झाले आहेत… आपल्या शिक्षकाची झालेली हि दुर्दशा कालीबाईला सहन झाली नाही… मागचा पुढचा काहीही विचार न करता कापणीसाठी हातात असलेले ‘खुरपं’ तसेच घेऊन ती बारा वर्षाची मुलगी, कालीबाई, ट्रकच्या मागे धावत सुटली… धावतांना ती जोरजोराने ओरडू लागली, “माझ्या गुरुजींना सोडा, कुठे घेऊन चाललात त्यांना? सोsडा माझ्या गुरुजींना”
बेभानपणे धावत धावत कालीबाई त्या चालत्या ट्रक पर्यंत पोचली… फरफटणाऱ्या आपल्या गुरुजींना सोडवण्यासाठी ती धडपड करू लागली… गाडीच्या मागे पळत-पळत हातातल्या खुरपीने गुरुजींना बांधलेला दोरखंड कापण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली…
गाडीत बसलेल्या शिपायांच्या मागे चाललेला प्रकार लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवली. पोलिसांनी कालीबाईला परत जाण्यासाठी धमकावले, “ये लडकी, चल भाग यहांसे, नहीं तो मार खायेगी”
“नहीं जाऊंगी, मैं अपने मास्टरजीको ऐसे नहीं ले जाने दूंगी,” कालीबाई निडर होऊन उत्तरली.
आपल्या बेशुद्ध सेंगाभाई गुरुजींना सोडवण्यासाठी दोरी कापण्याचा प्रयत्न करणाऱ्या कालीबाईवर पोलिसांनी बंदूक रोखली… पण बारा वर्षाची कालीबाई आपल्या प्राणाची पर्वा न करता अतिशय ध्येर्याने सेंगाभाईंना बांधलेली दोरी कापण्यात यशस्वी झाली… आपले गुरुजी बेशुद्ध झालेले पाहून कालीबाईला काय करावे काहीच सुचेना… ती आरडाओरडा करीत इतरांना मदतीसाठी हाका मारू लागली… या छोट्याशा मुलीचे हे धाडस पाहून बाजूच्या शेतात काम करणाऱ्या इतर महिला त्या ठिकाणी धावत आल्या…
एका बारा वर्षाच्या मुलीने सेंगाभाईंना सोडवल्याचे पाहून पोलिसांचे पित्त खवळले… त्या रागातच त्यांनी कालीबाई आणि जमलेल्या इतर महिलांवर गोळीबार केला… कालीबाईला जवळून गोळ्या लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली… आणि हाय रे दुर्दैवं! त्यातच कालीबाई वीरगतीस प्राप्त झाली… परंतु स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कालीबाईने आपल्या गुरुजींचे, सेंगाभाईंचे प्राण वाचवले!
कालीबाईचे हे कृत्य केवळ एका व्यक्तीचे प्राण वाचवणारी ‘साधी’ घटना नसून; तिचे हे साहस प्रस्थापितांच्या आणि राजसत्तेच्या चुकीच्या निर्णयाला पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न होता. म्हणूनच कालीबाईचे बलिदान हे झोपलेल्या समाजात चेतना निर्माण करणारी वीरगाथा आहे!
दरम्यान शेतातील अनेक लोक घटनास्थळी हत्यारांसहित धावून येत असल्याचे पाहून मॅजिस्ट्रेट सहित पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेले.
स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आपल्या गुरुचे प्राण वाचवणारी हि बारा वर्षांची वीर बालिका-कालीबाई; खऱ्या अर्थाने शिष्योत्तमा म्हणून अजरामर झाली! धन्य ते गुरुजी आणि धन्य ती जगावेगळी गुरुदक्षिणा! आजच्या युगातील या ‘आधुनिक एकलव्य – कालीबाईस’ कोटी कोटी प्रणाम!
‘मॅडम’-‘सर’, ट्युशन फी आणि डोनेशनच्या जमान्यात ‘गुरुजी’ आणि ‘गुरुदक्षिणा’ हि संकल्पना केव्हाच हद्दपार झाली आहे. निदान आपल्या शिक्षकाचा उचित आदर तरी नक्कीच केला गेला पाहिजे. शालेय जीवनातील शिक्षक कुठेही, अगदी रस्त्यात भेटले तरी त्यांना चरणस्पर्श करणारे विद्यार्थी तुरळक का होईना पण आजही आढळतात हि जमेची बाजू! परंतु आपल्या शिक्षकाला वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करून गुरुदक्षिणा देणारी बारा वर्षांची कालीबाई हि जगभरातील कदाचित एकमेव उदाहरण असेल!
त्याग, समर्पण आणि शौर्य हा आम्हा हिंदुस्थानी जनमानसाचा स्थायीभाव आहे. इंग्रजी राजसत्तेने आमच्या या मूळ संस्कृतीवरच घाला घातला. दुर्दैवाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील त्याकडे कानाडोळा करण्यात आला. स्वयंप्रेरणा आणि दृढनिश्चय सोडले तर कालीबाईच्या या साहसामध्ये ना कोणती संघटना होती ना तो शिस्तबद्ध ‘सत्याग्रह’ होता! त्याचाच परिपाक म्हणून मग कदाचित “कालीबाई” सारख्या वीरबालेची हि शौर्यगाथा तिच्याच वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलीच नाही. बारा वर्षाच्या या चिमुरड्या मुलीची साहस कथा राजस्थान पुरती मर्यादित न राहता ती सर्वदूर पोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न! अर्थात, आपणसुद्धा ही शौर्यगाथा शेअर करून या कार्यात सहभागी व्हाल यात शंकाच नाही!
(अद्ययावत माहिती: जुलै २०१८ मध्ये, राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात ‘नानाभाई खांट’ आणि ‘कालीबाई’ यांचे देखावे आणि पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा; तत्कालीन मुख्यमंत्री ‘वसुंधरा राजे’ यांच्या हस्ते संपन्न झाला.)