शिक्षक दिनाच्या निमित्ताने!
भारतात पहिला शिक्षक दिन १९६२मध्ये साजरा केला गेला. आता शिक्षक दिन याच दिवशी साजरा करण्या मागे नेमके कारण काय तर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, जे स्वतः ऐक शिक्षक होते, त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे स्थान कायम होते. त्यामुळे त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. डॉ राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरूपद भूषविले. १९५२ ते १९६२ या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतिपद भूषविले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे खास सेलिब्रेशन असते. विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवतातही. आई वडिलांनंतर आपल्याला घडवण्यात कोणाचा वाटा असेल तर, आपल्या शिक्षकांचा.
या दरम्यान झालेल्या गमतीजमती आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मलाही माझ्या टीचर म्हणून करिअर प्रवासातील एक घटना नमूद करावीशी वाटते. १९९५ साली, मी M.SC. नन्तर BEd. डिग्री घेतली होती आणि MIT School मध्ये interview दिला. मी आणि माझी मैत्रीण दोघीही Select झालो. आतापर्यंत फक्त Ferguson कॉलेज लाइफ एन्जॉय करणाऱ्या आम्ही अचानक विद्यार्थीदशेतून टीचर च्या भूमिकेत होतो. खरं सांगायचं तर थोडसं टेन्शन आलं होतं. कसं आठ तास टीचर म्हणून जबाबदारी पार पाडू असं वाटलं पण लगेच पॉज़िटिव् एप्रोच ठेवायचा असं ठरवून टाकलं.
अजूनही आठवतो पहिला नोकरीचा दिवस. किती सुंदर वातावरण,किती निरागस चेहरे ,सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत होता.पहिली ते दहावी ची सगळी मुले प्रार्थनेसाठी पटांगणावर जमली होती.अतिशय मंगल वातावरण होते. थोड्याचवेळात आम्हाला क्लासेस आणि वर्ग, timetable मिळाले. मी सहाव्या वर्गाची क्लास इनचार्ज होते.पहिला पिरियड माझा होता .बेल वाजली, मी वर्गात गेले.
छोटी छोटी मुले वाट पाहत होती नवीन टीचरची! कुतूहल, मिश्किल भाव,खोडकर हसरे चेहरे…
जादूची कांडी फिरावी तशी पटकन आमच्यात दोस्ती झाली. कुठलाही नात्याचा पाया मैत्रीचे बीज रुजले की पक्का होतो मग ते नातं आई – मुलं, शिक्षक – विद्यार्थी कुठलही का असेना; ह्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी त्यांना सायन्स शिकवायचे. त्यांचे प्रश्न, एकमेकांविषयी तक्रारी, बंडपणा, मस्ती, धमाल यायची. क्लास सुरु झाला की मात्र मन लावून ऐकायची सगळी. सगळीच मुलं गोड होती पण माझ्या आवडत्या मुलांपैकी एक होता. सावळा, चष्मा असलेला, नाजूक, अत्यंत खोडकर भाव असलेला “नचिकेत “.
सगळीच मुले ब्रेकमध्ये आपला लंच बॉक्स ऑफर करायची. त्यात नचिकेत काही न बोलता नुसता बघायचा. त्यालाही वाटायचं की टिचरने आपला डबा खावा, पण बोलायचं नाही. मग काही दिवसाने मीच म्हंटलं आज मला नचिकेतचा डबा टेस्ट करायचाय. काय आनंद झाला त्याला, आणि मग नचिकेत क्लासचा मॉनिटर बनला.
स्कूलमध्ये खूप सिनिअर टीचर्स होत्या पण त्यांना नावडती असणारी ही मुले माझी मात्र बेस्ट अशी टीम होती.त्यामुळे खूप वेळा सिनिअर टीचर्स चा रोष ओढवून घ्यावा लागे. सुपरवायझर मॅडम तर मुलांसारखं मलाही रागवायच्या. त्यामुळे आपण चांगल्या टीचर नाही आहोत असच वाटायचं.
एक दिवशी असच रोजच्याप्रमाणे स्कूलमध्ये आले, गेटमध्येच मला एका टीचरने म्हंटलं , अग्ग , तुझा नाव डिस्प्ले बोर्डवर लिहिलंय . मला काही कळेना की म्हणजे काय? ती पण घाबरल्यासारखं करत होती. त्यामुळे शक्य तितक्या घाईत मी आत गेले.बघते तर काय बोर्डावर मोठी कविता लिहीली होती , कवितेचं नाव होतं “My Science Teacher– श्रद्धा मॅडम!” विद्यार्थी – नचिकेत. मला तर समजत नव्हतं की कसं रिऍक्ट करावे? डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. कारण त्या कवितेत नचिकेतने संपूर्ण वर्गाचे प्रतिनिधीत्व केले होते आणि फक्त सायन्स टीचर म्हणून नव्हे तर श्रद्धा मॅम कशा आपल्या मार्गदर्शक आहेत, कसं समजावून सांगतात, शिकवतात त्याचबरोबर आमचं मन जाणून घेऊन न रागावता अभ्यास करायला सांगतात इत्यादी.
त्या क्षणाला वाटले मला आपण शिक्षक म्हणून सर्टिफाइड झालो. कुठल्याही कॉलेज ने , विद्यापीठाने दिलेल्या प्रशस्तिपत्रकापेक्षा मौल्यवान होती ती कविता माझ्यासाठी! मी एक शिक्षक म्हणून मुलांच्या मनात जागा निर्माण केली होती. आणि तेही पहिल्या नोकरीत , काहीही अनुभव नसताना ! त्याआधी त्या स्कूलमध्ये कुठल्याही टीचर वर अशी कविता लिहिली गेली नव्हती ही गोष्ट मला सिनिअर मॅडम कडूनच कळली. स्कूल प्रिन्सिपॉल ने अभिनंदन केले. खरं तर माझा आत्मविश्वास, उत्साह एक टीचर म्हणून पुढे वाटचाल करण्यासाठी कितीतरी पटीने वाढला होता. आणि ह्यासाठी नचिकेत सारखे विद्यार्थी घडवण्याचे भाग्य लाभणे मला तरी फार मोलाचे वाटते. म्हणूनच आज मी गेली २२ वर्षे शिक्षण क्षेत्रात जोमाने कार्यरत आहे.
म्हणूनच आज शिक्षक दिनानिमित्त मला हे सांगावेसे वाटते की ज्ञान देणे आणि ते समोरच्याने घेणे ही मैत्रीचीची, विश्वासाची, सन्मानाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये शिक्षक हे शिल्पकार असले तरी विद्यार्थी हे त्या शिल्पा च्या मातीतील कण आहेत!