करण जोहर तुम्हाला वायुसेनेच्या संस्कृतीची कल्पना तरी आहे का ? गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल

सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हे जेव्हा लष्करी अधिकार्यांची निवड करतात तेव्हा मानसशास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतात आणि तज्ञान्याच्या मतानुसार एकंदर बुद्धिमत्तेचा विचार केला तर, स्त्री आणि पुरुष यांच्या बुद्धिमत्तेत  जास्त फरक नसतो. स्त्रिया बोलणे आणि आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षणाचा फार उत्तम प्रकारे उपयोग करू शकतात( superiority in verbal behaviour, and retain perceptions of details quickly and accurately). तर पुरुष हे संख्यात्मक, यांत्रिक, अवकाशिय विषयांमध्ये मध्ये जास्त तरबेज असतात. लष्करी अधिकारी म्हणून निवड करतानाच हा विचार करणारी संस्था स्त्री पुरुषामध्ये भेदभाव करेल का? मला तर असे वाटते की करण  जोहर आणि त्याच्या दिर्गदर्शकाने, “गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल“ सिनेमा बनवण्यापूर्वी ह्या विषयावर नीट  संशोधन केले नाहीं हे नक्की.

खरा नायक कोण? खरा नायक तो, ज्याचे कार्य  प्रशंसनीय असते  त्याला त्यांच्यातले धैर्य, शौर्य,आयुष्यातील मोठ्या उपलब्धता,आणि असामान्य गुण ह्यामुळे ओळखले जाते. परंतु सिनेमातील नायकाची भूमिका ही त्या सिनेमा पर्यंतच किंवा  कादंबरीतील प्रमुख पात्रापर्यतच मर्यादित असते. म्हणून माझे म्हणणे हे की खऱ्या आयुष्यातला  नायक कोण आणि सिनेमातील नायक कोण ह्यात शंका नसावी. खरे म्हंटले तर सिनेमातील नायकाला आपण ‘नायक’ न संबोधता  एक ‘कलाकार’ म्हणून संबोधले पाहीजे, कारण खऱ्या नायकाच्या  धैर्य, निष्ठा, शौर्य, दृढनिश्चय, नैतिक अखंडता अश्या  बऱ्याच गुणांचा अभाव सिनेमातील नायकात असू शकतो. तर, “गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल”  ह्या सिनेमातील नायकाने दिग्दर्शकाच्या म्हणण्या वरून भारतीय वायुसेनेत महिलांना बरोबरची वागणूक दिल्या जात नाही असे घृणास्पद आरोप केले आहेत व अशा प्रकारे वायुसेनेची छबीच खराब करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्व का तर सामान्य जनतेला खळबळ जनक खोटी माहिती देऊन आपला गल्ला भरण्यासाठी.

मी ह्या विषयावर का बोलतो आहे हे जाणून घेण्यात वाचक उत्सुक असतील. सर्वप्रथम मी सांगू इच्छीतो की कारगिल क्षेत्रात मी बरीच उड्डाणे केली आहेत शिवाय त्याच प्रदेशात एक विमान अपघातातून मी देवाच्या कृपेने वाचलो त्यामुळे, तेथील ऑपरेशन  किती कठीण आहेत हे मी जाणून आहे .दुसरी महत्त्वाची गोष्टं अशी की मी स्त्रियांच्या वायुसेनेनेतील भरतीच्या प्रक्रियेत अगदी  सुरवातीपासून सामील होतो महिलांची जी पहिली  तुकडी निवडण्यात आली त्यावेळी, म्हणजे 1992 साली मी एअर फोर्स अकादमी मधेच तैनात होतो. पुढे जेंव्हा  महिलांची पहिली तुकडी वैमानिक प्रशिक्षणासाठी निवडण्यात आली तेंव्हा पण मी तिथे उड्डाण  प्रशिक्षक म्हणून कार्यरत होतो.  महिलांची पहिली तुकडी अँडमिनिस्ट्शन, एज्युकेशन, आणि लॉजीस्टिक ह्या शाखांसाठी होती. मी तेंव्हा प्रशिक्षक म्हणून तैनात होतो व हा कार्यभाग मला सोपावल्या गेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्या महिला नवीन आव्हानाचा सामना करू शकतील की नाही ह्या  बद्दल आशंका होती , आणि त्या स्वतःला वायुसेनेत सामावून घेऊ शकतील की नाही ही सुद्धा  शंका त्यांना सारखी भेडसावत होती. परंतु ह्या महिलांचे प्रदर्शन अतिशय आश्चर्यचकित करणारे होते. प्रशिक्षणाला त्यांचा  प्रतिसाद अतिशय उत्साहजनक तर होताच पण त्या सर्व क्षेत्रातच पुरुषांच्या बरोबरीने होत्या किंबहुना वरचढच होत्या असे म्हटले तर वावगे होणार नाही.

महिलांची तुकडी प्रथमच वायुसेनेत सामील होणार म्हणून त्यांच्यासाठी राहण्याची  वेगळी व्यवस्था करण्यात आली होती आणि तीही कमीत कमी वेळात. त्या वर्षीच्या वायुसेना  दिनाच्या परेड मध्ये ही तुकडी सामील झाली आणि त्याच्या उत्तम कवायातीने  त्यांनी सर्वांची मने जिंकली. मी त्यांच्या  बरोबर त्यांचा  अधिकारी  प्रमुख म्हणून दिल्लीतच होतो. तेव्हा  ह्या महिला प्रशिक्षणार्थी   असूनही त्यांची  राहाण्याची  सोय अधिकाऱ्यांच्या  मेस मध्ये करण्यात आली होती. प्रथम काही दिवस राहावयाचे ठिकाण, त्यांची  प्रशिक्षणासाठी लागणारी व्यवस्था हयात अडचण आली पण, ती लागलीच दूर करण्यात आली. अशाप्रकारे अनेकानेक उपाय योजून ह्या महिलांना गैरसोय होऊ नये याची काळजी  घेण्यात आली.

1994 मध्ये वैमानिक प्रशिक्षणासाठी महिलांची पहिली तुकडी सामील झाली तेव्हा मी बंगरुळू येथे फ्लाइंग प्रशिक्षक म्हणून रुजू होतो येथेही त्यांना आवश्यक अश्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या.  हेलिकॉप्टर प्रशिक्षणार्थी  जवळ जवळ दीड वर्षांनी वायुसेनेत सामील झाल्या तोपर्यंत वायुसेना महिला प्रशिक्षणासाठी जय्यत तयार होते कारण 1992 पासूनच  ह्या कार्याचा अनुभव त्यांच्या  पदरी होता, म्हणूनच  ह्या सिनेमात महिलांसाठी प्राथमिक व्यवस्थाही नव्हती असे जे दाखवले आहे ते किती चूक हे लक्षात येईलच, नव्हे तो निव्वळ एक खोटारडेपणाच आहे असे म्हंटले तर वावगे होणार नाही, आणि हा खोटारडेपणा कशासाठी? तर सिनेमा चालावा ह्यासाठी. प्रशिक्षणादरम्यान महिलांची वाटचाल वाखाणण्याजोगी होती त्या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होत्या किंबहुना बरेचदा सरसच. फ्लाइंग प्रशिक्षण दरम्यान आपत्कालीन स्थितीत करावयाची कार्यवाही हा एक महत्वाचा भाग असतो. ह्या प्रशिक्षणIवर आपत्कालीन स्थितीत वैमानिक जगणार की नाही हे अवलंबून असते म्हणून, हे प्रशिक्षण फार महत्वाचे असते.  ह्याच्या  उजळणीवर फार जोर दिल्या जातो. गोविंद निहलानी ह्यांच्या ‘विजेता’  चित्रपटात वैमानिकाच्या  ह्या  महत्वाच्या प्रशिक्षणाचं महत्व फार छान पद्धतीने दर्शवले आहे. पण करणनी मात्र ह्या दृष्यात मसाला कालवून वायुसेनेत महिलांच्या प्रती  द्वेष व दुजाभाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  महिला वैमानिक प्राथमिक प्रशिक्षणा नंतर ऑपरेशनल स्क्वाड्रन  मधे रूजू झाल्या तिथे त्यानी पॅरा ड्रॉप, फॉर्मशन फ्लाइंग आणि एअर मेन्टेनन्स ह्या सर्व क्षेत्रात उत्तम  कामगिरी बजावली. 

2008 साली मी जेव्हा कमांडिंग ऑफिसर होतो माझ्या स्क्वाड्रन मध्ये तेव्हा 7- 8 महिला वैमानिक होत्या आणि त्यांचा सहभाग हा स्क्वाड्रन साठी फार महत्वाचा ठरला. हे त्यांना साध्य झाले कIरण त्याना पुरुषांच्या इतक्याच संधी प्राप्त झाल्या. महिला वैमानिक पुरुष वैमानिक ह्यांच्या मध्ये कोणताही भेदभाव नव्हता म्हणूनच हे साध्य  झाले. चंदीगढ  स्थित विमाने ही हिमालयात कार्यरत आहेत आणि इथे जगातील सर्वात जास्त आव्हानात्मक परिस्थिती  आहे हे सांगावयास नको.  ह्यातील कित्येक महिला वैमानिक आज नागरी विमान सेवेत प्रमुख वैमानिक म्हणून काम करत आहेत हे त्यांना  वायुसेनेत मिळालेल्या संधी मुळेच नाही का?  महिला आजकाल कोणाच्याही क्षेत्रात वरचढ ठरू शकतात त्यांना बरोबरीची संधी मिळाली तर. भारतीय वायूसेनेने ही  संधी महिलांना  सर्व सोयी व अनुकूल परिस्थिती  बहाल करून दिली  ह्यात शंकाच नसावी. सिनेमा क्षेत्रात महिलांना त्यांच्या  विरोधाला  न जुमानता मानाचे स्थान नाही हे सर्वानाच ज्ञात आहे. करण जोहर ह्यांनी बनवलेल्या  ह्या सिनेमात वायुसेना महिलांना दुय्यम स्थान देते हे दाखवायचा  वारंवार  प्रयत्न केला गेला आहे. भारतीय वायू सेना ही भारतातील पहिली लष्करी संस्था आहे की जिने  महिला अधिकाऱ्यांना  सर्व शाखांमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला आणि आज जवळजवळ 14 प्रतिशत महिला अधिकारी वायुसेनेत कार्यरत आहेत हे प्रमाण कोणत्याही पश्चिमी राष्ट्रांइतकेच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. करण जोहरला हे माहीत तरी आहे का? हा  सिनेमा बनवण्याचे प्रमुख कारण होते हेलिकॉप्टर महिला वैमानिकाच्या धैर्याचे व शूरतेचे कौतुक करणे. ते बाजूलाच राहिले व या अगदी शुल्लक अश्या गोष्टींना महत्त्व देण्यात आले. महिलांसाठी वायुसेनेने  नीट सोई उपलब्द्ध करून दिल्या नाही, महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले असे बिनबुडाचे आरोप करण्यातच करण आणि त्याच्या दिग्दर्शकाची शक्ती वाया गेली हे निदर्शनास येते.  गुंजनला शौर्य चक्र मिळाले नसताना तसे सर्व जनतेला सांगणे हेच दर्शवते की ह्या विषयावर  जोहर आणि दिग्दर्शकाने नीट संशोधन केले नाही. मी स्वतः शौर्यचक्र प्राप्त अधिकारी आहे म्हणून यांच्या बातमी नंतर मी गुंजनचे कौतुक करावे म्हणून शहानिशा करता झालो. तेव्हा कळले की तिला शौर्य चक्र प्राप्त झालेले नाही असो. मला करणला विचारावयाचे आहे की त्याला भारतीय वायुसेनेची संस्कृती ज्ञात आहे का? वायुसेनेत महिलांचे किती मानाचे  स्थान आहे ह्याची  कल्पना आहे का? कल्पना नसेलच कारण पैसे कमावण्याच्या नादात संशोधनाचा विसर पडला असेल. मी करण साठी वायुसेना महिलांना कसा मान देते हे उदाहरण देऊन सांगतो, कोणीही  महिला जर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली तर तिथे उपस्थित  सर्व अधिकारी  उभे राहून महिलेचे स्वागत करतात व तिला स्थानापन्न होण्यास मदत करतात. जेवणाच्या वेळीपण जेवण सुरू करण्याचा  महिलांचा  मान पहिला असतो. करणला हे सर्व माहीत असणे अश्यक्यच, मग वायुसेना  महिलांना दुय्यम लेखते त्यांना बरोबरीने वागवत नाही हे बोलण्याचा हक्क त्याला कोणी दिला? आणि तसे सिनेमात दाखविण्यास तो कसा धजावला ह्याचा जाब विचारलाच पाहिजे.  करण सांस्कृतिक हक्काच्या  मागे लपून वार  करणे बंद कर . जेंव्हा  वायुसेनेनि आक्षेप घेतला  तेव्हा एक अस्वीकरण (disclaimer) देऊन तू मोकळा झाला  की, “सिनेमात दाखवलेले दृश्य खऱ्या घटनांशी तंतोतंत जुळत नाहीत प्रत्यक्षात जे घडले ते वेगळे असू शकते भारतीय वायुसेना महिलांना पुरुषांच्या बरोबरीचीच वागणूक देण्यात विश्वास ठेवते“. जर तुला खरोखर  माहीत आहे की हेच खरे आहे तर सिनेमात असे का दाखविले. अगदी स्पष्ट आहे खोटे बोलून  खळबळजनक बातम्या वापरून  (sensation create करून) तिजोरी भरायची हेच ना? करण आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांनी आत्मनिरीक्षण करणे अत्यावश्यक आहे , सर्व जनतेसमोर  माफी मागणे हाच फक्त उपाय नाही तर सिनेमातील चुकीची दृश्य काढून टाकली  पाहिजेत.

AVM Suryakant Chafekar

Air Vice-Marshal Suryakant Chintaman Chafekar, AVSM, Sharuya, Shaurya Chakra is a retired Indian Air Force (IAF)officer. He was the Commander Officer of No 48 Squadron IAF. In May 2008, he landed Antonov AN-32 aircraft on High Altitude Advanced Landing Grounds Daulat Beg Oldie, Fukche, and Nyoma.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *