पाकिस्तान का मतलब क्या?

भाग १

पाकिस्तान हा देश त्याच्या जन्मापासूनच सैन्याच्या  तावडीत राहिलेला आहे. पाकिस्तानला आर्मी आणि त्यातले खास वरिष्ठ जनरल सांभाळतात. यांना कोर-कमांडर (Corps commander) म्हणतात. हे बहुधा पंजाबी असतात आणि त्यातही मुस्लीम समाजातील बरेलवी पंथातले असतात. या पंथास दर्ग्यावर जाऊन पूजा करणे, पीर फकीर, उरूस वगैरे करणे मान्य आहे म्हणून देवबंदी आणि वहाबी संप्रदाय बरेलवी लोकांना काफिर म्हणतात. त्यामुळे असे म्हणता येईल की  पाकिस्तान हे पंजाबी आर्मीची वसाहत आहे. या बरेलवी संप्रदाय आणि पंजाबी वृत्तीची खासियत आहे की यांना इस्लाम पण हवा आणि राष्ट्रवाद पण हवा. या निबंधाचे शीर्षक फाळणीच्या वेळेसच्या प्रसिद्ध घोषणे वरून स्फुरलेले आहे – पाकिस्तान का मतलब क्या – ला इलाहा इल्लल्लाह (पाकिस्तान म्हणजे काय तर इस्लाम)

ही  गरज कशी काय उद्भवली यासाठी आपला इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.

भारताचा भूगोल आणि त्याचा इतिहासावर झालेला परिणाम

भारत हे प्राचीन काळापासून सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. एखादा कांदा असतो, तश्या भारताच्या पाकळ्या आहेत. सर्वात बाहेरची लेयर अथवा पाकळी म्हणजे गांधार प्रांत – आजचा दक्षिण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा सिंधू नदीच्या पश्चिमेकडे असलेला उत्तरपश्चिम प्रांत खैबर पख्तूनख्वा. गांधार भूभाग पेशावर पासून काबुल पर्यंत पसरलेला आहे आणि आधुनिक काळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशात ड्यूरंड लाईन (Durand line)  या सीमेने विभागलेला आहे. या प्रांतात असलेला हिंदुकुश पर्वत (संस्कृत मध्ये पारीयात्र पर्वत रांगा) म्हणजे “भारताची” नैसर्गिक, सामरिक आणि शास्त्रीय सीमा. या पर्वता पलीकडे “बाहेर” चा प्रदेश सुरु होतो. ह्या प्रदेशाच्या बाहेरच्या लोकांनी केलेले आक्रमण म्हणजे “परकीय” आक्रमण. पारशी, अरब, मोगल, इंग्रज, हूण, शक, कुशाण, ग्रीक वगैरे सगळे लोक “परकीय” होते कारण ते गांधारच्या बाहेरचे लोक होते..

गांधार मधील प्रसिद्ध इस्लामी लुटेरे महमूद गजनी, शहाबुद्दीन मुहम्मद घोरी वगैरे मंडळी म्हणजे ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनीचे बाटलेले वंशज. सोमनाथ फोडणाऱ्या मेहमूद गजनीच्या २०-२५ वर्षे आधीपर्यंत खुद्द गजनी शहरावर “राजा शिलादित्य” राज्य करत होता. त्यावरून त्या भागाचे “भारतीयत्व” चटकन लक्षात येईल. या शिलादित्याचे पूर्वज पण मेहमूद सारखेच पंजाबवर आणि इतर आसपासच्या राजांवर चढाई करायचे, पण मेहमूद सारखा विध्वंस कुणी केल्याचा उल्लेख इतिहासात नाही. इस्लाम स्वीकारल्या नंतर गजनी आणि तिथल्या एकंदर सर्व भावी राजांच्या आणि लोकांच्या “चित्त-वृत्ती” मध्ये मूलभूत बदल झाला आणि तिथले लोक हे भारतासाठी कायमचे शत्रू होऊन बसले. ते शत्रुत्व अजूनही तालिबान च्या रूपाने सुरु आहे.

भारत म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. गांधार पासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंध पासून आसाम पर्यंत राजकीय एकता इतिहासात फार काल नव्हती. आणि सांस्कृतिक एकतेवर आधारित या राष्ट्रास राजकीय एकतेचे इतके वेड पण नव्हते. किंबहुना राजकीय एकते शिवाय देखील राष्ट्र म्हणून अस्तित्वात राहता येते हे जगाला भारताने दाखवून दिलेले आहे. 

तर अश्या या “अखंड भारता”च्या भूगोला मध्ये आजच्या घडीला आठ वेगळी राष्ट्र-राज्य (nation-state) आहेत – भारतीय गणराज्य, पाकिस्तानचे इस्लामी गणराज्य, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश. अखंड भारत आज नाही, याचे कारण म्हणजे इंग्रजांनी १९३७ आणि १९४७ साली केलेल्या दोन फाळण्या. १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा केला आणि १९४७ पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) ची निर्मिती करून उरलेला भारत देखील तोडला. त्या फाळणीमुळे आजचे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाले आहेत. आणि ती फाळणी समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे आवश्यक आहे.

१७६१ – पानिपतची तिसरी लढाई आणि फाळणीची बीजे

जेव्हा उत्तर-प्रदेशातल्या नजीबउद्दौनने अफगाणी अब्दालीला  देशी हिंदू मराठ्यांचा बंदोबस्त करायला आमंत्रण दिले, त्याच वेळेस फाळणीचे बीज पेरल्या गेले. मुहम्मद घोरी नंतर आक्रमक पठाण लॉबी गंगेच्या खोऱ्यात स्थिरावली आणि दिल्ली ही त्यांच्या सल्तनतीची राजधानी बनली. पांडवांच्या युधिष्ठिरानंतर दिल्लीला (तेव्हाचे इंद्रप्रस्थ) देशाची राजधानी बनवणारा पहिला राजा म्हणजे मुहंमद घुरी आणि त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक. ३०० वर्षे एकंदर भारतात अराजकता होती. लूट, कत्तली, धर्मांतरे, देवळांची-विद्यापीठांची-स्तूपांची-मठांची-मूर्तींची तोडफोड निरंकुश सुरु होती. 

पानिपतच्या दुसऱ्या लढाईत बैरमखानच्या मदतीने १३ वर्षीय अकबराने हेमुला हरवले आणि दिल्लीचा बादशाह झाला. मधल्या धामधुमी मध्ये काजी वर्ग तटस्थ होता कारण सत्तेसाठी झुंजणारे दोन्ही पक्ष मुसलमान होते.

१७व्या शतकात दक्षिणेत शिवछत्रपतींचा उदय झाला आणि समीकरणे बदलू लागलीत. शिवछत्रपतींची खरी “महिमा’ त्यांच्या मृत्युनंतर दिसते. त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या ५०-६० वर्षात मोगलांची सत्ता केवळ लाल-किल्ल्यापर्यंत मर्यादित राहिली. शिवाजीने निर्माण केलेली ‘चळवळ” इतकी मोठी झाली की ती मोगलांचा “पर्याय” आणि उत्तराधिकारी म्हणून सबंध भारतात  मान्य झाली. इथे काजी-मुल्लाह लॉबी मधील लोकांचा तटस्थपणा तुटला.

पठाण लोक रोहीलखंडात मोठ्या प्रमाणात होते. रोहिलखंड म्हणजे आजचा पश्चिम यु.पी. देवबंद, आझमगढ, गोरखपूर आग्रा वगैरे . सगळे आजची “कुप्रसिद्ध” स्थळे इथेच आहेत. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत इथल्या पठाणांना खूप फायदा झाला (आर्थिक). मोगल क्षीण झाले आणि ३०० वर्षांपूर्वी अकबराने जिंकलेली सत्ता परत मिळवण्याचे वेध पठाणांना लागले. आता भारतावरील प्रभुत्वासाठी मराठे आणि पठाण यांच्यात स्पर्धा सुरु झाली. एक मोठी सत्ता लयाला जाते तेव्हा ती पोकळी भरून काढायची चढाओढ लागते. इथेही तेच झाले. रोहीलखंडातल्या पठाणांनी अफगाणिस्तानातल्या पठाणांची मदत घ्यायची ठरवले आणि अब्दालीला आमंत्रण दिले. यात काजी लोकांनी पूर्ण सहकार्य केले आणि या राजकीय लढाईला “जिहाद” चे रूप दिले. “काफिर” हिंदू भारताला बळकावत असताना उत्तरेतल्या मुसलमान राजांना एकत्र आणायचे मोठे काम उलेमा आणि काजी जमातीने केले.

गंगेचे खोरे अर्थात – रोहिलखंड, अवध आणि बंगाल “साफ” केल्याशिवाय पंजाबात जाणे (राघोबा ची अटक स्वारी) ही मराठ्यांची सर्वात मोठी घोडचूक होती. गंगेच्या खोऱ्यात असलेल्या मुसलमान राजांनी (नजीब आणि शुजा) अब्दालीला या मराठ्यांच्या विरोधात पुकारलेल्या जिहाद मध्ये मदत केली. पानिपत झाले आणि पदरात काहीही न पाडून घेता, उलट तीव्र हानी सोसून अब्दाली परत गेला. १० वर्षात मराठे परत आले, तोपर्यंत अवध इंग्रजांनी जिंकला होता.  बक्सर च्या लढाईत आणि नजीब म्हातारा होऊन मेला होता. पण इथला उलेमा संप्रदाय अजूनही होता जो “हातातून” गेलेल्या सत्तेच्या सोनेरी आठवणीमध्ये रमला होता. या उलेमा लोकांनी पुढे देवबंद वगैरे मदरसे उघडले आणि नंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठ, सैय्यद अहमद खान, मुस्लीम लीग वगैरे सुरु केले. पाकिस्तान च्या कल्पनेला पूर्ण पाठींबा देणारी लोकं  इथलीच होती, पंजाब आणि बंगाल मधली नाही.

इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला होतं, त्यामुळे इंग्रज गेल्यानंतर उद्भवलेल्या समस्या समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे अत्यावश्यक आहे. शिवाजीच्या काळात मराठे नेहमी दक्षिण-विरुद्ध उत्तर असा संघर्ष करीत. मोगलांविरुद्ध दक्षिणेतल्या राजांनी एक व्हावे ही नीती शहाजी राजांची. ती शिवाजी व संभाजीने पुढे चालवली. १७०७ मध्ये औरंगजेब मेल्यानंतर मात्र, हा संघर्ष उत्तर विरुद्ध दक्षिण न राहता भारतीय विरुद्ध परकीय असा झाला.

परकीय सत्तेला (मोगलांना) हरवून मराठे पठाणांना देखील उत्तर भारतातून हुसकावून लावायचा प्रयत्न करीत होते. इंग्रज नसते आले, तर हे झाले सुद्धा असते. पठाणांचे ७०० वर्षांचे गंगेच्या आणि सिंधूच्या खोऱ्यावरचे वर्चस्व मराठ्यांनी आणि नंतर शिखांनी उचकटून फेकले होते. ही एक अतिशय कष्टप्रद आणि संथ गतींनी होणारी प्रक्रिया होती. आणि ती, इंग्रजांनी अचानकपणे ती पूर्ण व्हायच्या आत थांबवली. म्हणून आजच्या समस्या (हिंदू-मुस्लीम प्रॉब्लेम आणि त्याचेच आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे भारत-पाकिस्तान समस्या) वगैरे भारतात आहेत. 

शिवाजी-नानासाहेब-माधवराव-रणजितसिंह या चौघांचे राजकारण समजावून घेतल्या शिवाय पाकिस्तान आणि रिलेटेड समस्या कायमच्या सोडवता येणे शक्य नाही. म्हणून हा इतिहास सांगायचा खटाटोप.

पहिला भाग समाप्त 

This was published originally on http://agphadnavis.blogspot.dk/2011/11/blog-post.html?m=1 in Nov 2011.

Ambarish Phadnavis

Co-founder & CEO at Greyeast Tech Pvt Ltd. IIT-B Alumni. History Buff, Blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *