संवेदनांमधील स्थित्यंतरे, भोगवाद आणि भारतीय समाज
मानवीय संवेदनाचा इतिहास पाहता जग एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे. वसुंधरेच्या निर्मिती पासून तर आज पर्यंतच्या प्रवासात असे निर्णायक क्षण किंवा मैलाचे दगड भरपूर आलेत. वसुंधरेच्या उत्पत्तीपासून डार्विनचा मानवविकास सिद्धान्त, बहुराष्ट्रीय राजतंत्र, ‘राष्ट्र’ या संकल्पनेची उत्पत्ती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध फ्रेंच राज्यक्रांती, दोन जागतिक महायुद्धे, उपनिवेशवादाच्या नायनाटासाठी उभी राहिलेली स्वातंत्र्ययुद्धे आणि अलीकडे ९० च्या दशकात जन्मलेला आर्थिक उदारमतवाद या सर्व घटनांचा मानवी संवेदनांवर प्रखर परिणाम झाला परंतु मानवी संवेदनांची चौकट मात्र नेहमी तशीच राहीली. ती कधीही उध्वस्त झाली नाही. परंतु अलीकडच्या कालखंडात विशेषतः २० व्या शतकाच्या अखेरच्या सत्रात ही चौकट आपली राग रंग बदलू लागली विशेषतः भारतासारख्या सांस्कृतिक प्राबल्य लाभलेल्या देशात संवेदनांचा नाव आलेख जन्माला आला.
मानवी संवेदना जितक्या प्रबल तरीही तरल आणि पारदर्शी असतील तितकाच सुंदर समाज जन्माला येईल. ही प्रगल्भता भारतासारख्या देशात इथल्या सांस्कृतिक वारश्यातून जन्माला आलेली होती. कितीही नाकारले तरीही आणि कितीही तार्किक आणि तथाकथित विज्ञान निष्ठ विश्लेषण केले तरीही आमच्या संवेदनांची मूळ रामायण, महाभारत, भगवद्गीता यातच दडलेली आहे, हे नाकारता येणे शक्यच नाही. खरेतर जेव्हा जेव्हा हिंदू धर्मातील ३३ कोटी देवी देवतांचा उद्धार होतो. इतकेच नव्हे तर हिंदू धर्मावर अनाठायी वैचारिक आक्रमण केले जाते. किंबहुना हिंदू समाजाच्या तात्विक बैठकीवर आघात केला जातो, तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो की आमच्या संवेदना खरंच इतक्या खुजा आहेत का? कारण मानवी भावनांची संख्या किती? असा प्रश्न मी विचारला तर त्याचे निश्चित उत्तर देता येईल का? नक्कीच नाही. खरे तर प्रेम, करुणा, त्याग, लोभ, मोह, मत्सर, अश्या भावना मोजायच्या झाल्यास ३३ कोटींहून अधिक होईल, नाही का? हिंदू धर्मातील १-१ देवी देवता मानवी भावनांचे प्रकटीकरण आहे. हा केवळ तर्क नव्हे तर माझा ठाम विश्वास आहे. रामाच्या अंगी मला त्याग दिसतो आणि याच हिंदू धर्मातल्या नाथ पंथात मला वैराग्य दिसते. हे विवेचन देण्याचे कारण भारतीय समाजात असणारी संवेदना ही मूल्याधिष्टित असली तरीही ती आचरणीय आहे. आणि अनुकरणीय हि आहे. दुर्देवाने ‘आहे’, ऐवजी ‘होती’ म्हणावी लागेल कारण मानवी संवेदनांच्या खोल सरोवरात पाह एकदा डोकावून. काय उरलयं? काय सरलयं? काय घडलयं? आणि काय बिघडलयं?
प्रेम, स्वप्न, मन, अपेक्षा, खरं तर सर्व काही बदलत चाललंय आणि या बदलांनी व्यथित होऊन जेव्हा जेव्हा प्रश्न विचारला जातो, की हे काय चाललंय तर नाही म्हणण्याला एक निर्लज्ज उत्तर मिळतेय ‘संकुचितपणा बाळगू नये माणसानं’! ‘मोकळे विचार असावे’!! ‘जागतिकीकरणा मध्ये उभे असताना आपण आधुनिक आणि उदारवादी होणे गरजेचे आहे’, असा ढोल बडवला जातो. आधुनिकतेचा संदर्भ काय आहे? उदरवाद म्हणजे काय? तर फक्त बेधुंद वागणे, मग अशी आधुनिकता आणि तथाकथित उदरवाद आमच्या सांस्कृतिक वारस्यानी जन्माला घातलेल्या संवेदनावर आक्रमण करून पाहतो आहे आणि यातून जे जन्माला येतय ते नवं जग स्वीकारावं की स्वीकारु नये असा संभ्रम निर्माण होतो. आमच्या समाजाला कालिदासांनी अनुराग शिकविला, समुद्र गुप्तांनी वीरता शिकवलेली, चाणक्यांनी अर्थशास्त्र शिकविले आणि ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांनी उदारता शिकविली मग हे नवीन काय शिकतोय आपण? इतक्या झपाट्यांनी संवेदना का बदलत आहे? आमच्या संवेदनांमधली अभिजातता, नीतिमूल्य, सहनशीलता, दया, प्रेम, कारुण्य, सहकार्य, मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती का हरवत चाललेली आहे? याचे चिंतन गरजेचे आहे. कालिदासापासून खांडेकरापर्यंत सर्व संस्कार सोडून वासणेची पंख लावावीत का? ज्ञानदेव, तुकारामांनी शिकविलेली भक्ती, संपदा, इंद्रायणीत बुडवावी का? शिवबांपासून तर तात्याराव सावरकरां पर्यंतचा राष्ट्र-यज्ञ विझवून टाकून ऑनलाईन देशभक्ती विकत घ्यावी का? गोविंदाग्रजांपासून तर कुसुमाग्रजां पर्यंत नसा नसात भिनलेली अभिजातता वेशी वर टांगावी का? हि सर्व प्रश्न मन सुन्न करणारी असली तरीही बदलत्या भारतीय संवेदनावर आत्मचिंतन करायला लावणारी आहेत का? हे सांगणे न लगे.
मानवी मन आणि संवेदना ज्या प्रकारची स्थित्यंतरे परिवर्तन म्हणून गोंजरत आहेत. आमच्या देशातील नव्या युगाची पहाट म्हणून सुखावत आहे. आणि हे सर्व वास्तववादी आहे. म्हणून उड्या मारित आहेत. यातून एका अराजक समाजाखेरीस काही ही हाती लागणार नाही. दुर्देवाने याचे भान तरुण पिढीला तर नाहीच. नाही परंतु ते पन्नाशी गाठणाऱ्यांनाही राहले नाही. हा फार मोठा दुर्देवविलास आहे. मन आणि बुद्धि यांचे संतुलित संगोपन करणारा भारतीय समाज या प्रश्नांवर चिंतन करेल काय? हा खरा प्रश्न आहे. रामायण, महाभारताच्या कालखडा पासून तर अगदी नव्वदीच्या दशका पर्यंत जी स्थित्यंतर मूल्याधिष्ठित, नीतिमान तरीही गतिमान मूल्य होती थोड्याफार प्रमाणात गुण दोषांसहित आमची वाटचाल सुरु होती, परंतु २० व्या शतकाच्या अंतातच भोगवादाची जी पेरणी झाली त्यातून तात्पुर्ती सुजन आलेला विकास तर जन्माला आला परंतु अभिजातपणा, पारंपरिक मूल्य आणि संस्कारशीलतेचा मात्र बळी गेला. या वातावरणात गेल्या दोन तीन दशकात जी नवजात पिढी आकाराला आली, त्यांनी या भोग वादाचे बाळकडू आत्मसात तर केलेच पण सर्वात भयंकर म्हणजे आपल्या आधीच्या पिढीलाही (पन्नाशी गाठणाऱ्या) या भोगवादाची चव चाखायला लावली. आमच्या अवती भवती निर्माण होणाऱ्या टीव्ही सिरिअल्स, वेब सिरीज नावाचं नवीन पीक, संगीत, सिनेमातील गीते हे सर्व या भोगवादाचेच परिचायक नाहीत का? यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे जाणाऱ्या पिढीने येणारी पिढी घडवावी अशी लाखो उदाहरणे इतिहासात असतील. पण नवीन पिढीने जुन्या पिढीस बिघडविल्याचे हे एकमात्र उदाहरण आहे. इतकेच नव्हे तर नव्या पिढीने आमचा सांस्कृतिक इतिहासात देखील सोयींचा करू आपण किती बरोबर आहो आणि आपल्या संवेदना किती वास्तविक आहे हे सिद्ध करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. इतकेच काय तर या संवेदनांवर आक्षेप घेणाऱ्यांना तुम्ही अवास्तववादी आहात, अंधश्रद्धाळू आहात, सनातनी आहात असे आरोपही सहन करावे लागत आहे. पण या नवीन पिढीचं काय? आणि या पिढी सोबत रॅम्प वर झिंगणाऱ्या मध्यमवयीन पिढीचं ही काय? नशेत झिंगणाऱ्याला जसे इतरांना काहीच समजत नाही असे वाटत राहते. तोच बेशरम पणा समाजास पोखरत आहे. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यानी समस्या सुटतात का? की आधुनिकता जन्माला येते कि परिवर्तन घडतात? परिवार बदलतो की समाज? काहीच नाही. बुद्धिची आराधना करता करता मनाचा विसर पडला कि विकृतीचे नवीन आरसे जन्माला येतात. आणि समाज याच आरश्यात आपल्या मनास वाटेल तसे प्रतिबिंब पाहू लागतो.
येणारा उद्या आणखी भयंकर आहे जी चिमुकली मने पूर्णतः भोगवादी असलेल्या असुरी परंपरेच्या आणि भोगवादाचे मूक समर्थन करणाऱ्या मध्यमवयीन पिढीच्या संस्कारात वाढत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या विध्वंसाचे ट्रेलर ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सर्व चित्र बदलण्याची गरज आहे. बुद्धि आणि मनाचा विकास करताना संतुलित संवेदनशील शिक्षण पद्धतीचा विचार होणे क्रम प्राप्त आहे. लगतच्या काळात हे न घडल्यास आमचा सांस्कृतिक वारसा फार मोठ्या संकटात सापडेल. वैराग्यातून निर्माण होणारा अनुराग आणि अनुरागातुन निर्माण होणारे वैराग्य हा सांस्कृतिक प्रवास यशस्वी करून दाखविण्याची कसरत आपल्या सर्वाना करायची आहे. अशक्यप्राय परिस्थितिमध्येच नवीन शक्यतांचा जन्म होतो. तो आताही होईल अशी अपेक्षा करूया.