हिमालय पर्वतराजींतुन निर्वासन – एक आव्हान

हिमालय पर्वतराजींची आव्हाने केवळ त्यांच्या अतिविशाल आणि उत्तुंग शिखरांपुरतीच मर्यादित नाहीत. अतिशीत तIपमान, बर्फाची वादळे, हिमनगस्खलन ह्या नगाधीराजाच्या संहारक शक्तीचे वर्णन तर बहुतेक करून आपण ऐकलेलेच असते, पण वैमानिकापुढे उभी ठाकणारी आव्हाने ही त्याच्या रौद्र शक्तीची झलक दाखविणारी असतात जिच्या पुढे नम्रता हेच प्रतिशस्त्र आहे. पर्वतीय लाटांमध्ये AN32 सारख्या महाकाय विमानाचे धूड एखाद्या कस्पटासारखे हवेत हेलकावे खाते आणि एखाद्या वेळी त्याचे  वरच्यावर दोन तुकडे सुद्धा होऊ शकतात. अश्या परिस्थितीत विमानावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते. विमानाची दिशा बदलण्यासाठी लागणारी वळण-त्रिज्या वाढते परंतु दऱ्या अरुंद असल्यामुळे पर्वत आणि विमान ह्यात त्या साठी आवश्यक तेवढे अंतरच उपलब्ध नसते. कधी कधी अशाही दरीत भरकटण्याचा धोका असतो ज्यातून बाहेर पडण्यासाठी वाटच नसते. अंधी गली म्हणतो न आपण एकच तोंड असलेल्या गल्लीला; तश्याच ह्या आंधळ्या दऱ्या आहेत हिमालयात आ वासून बसलेल्या.

शून्याखाली पन्नास डिग्री पर्यंत खाली गेलेला पारा, विरळ हवामानातील प्राणवायुची कमतरता ह्या प्रतिकूल बाबींचा मानवाच्या शरीरावर परिणाम होतोच. तिथे ना रस्ते आहेत ना उपचार केंद्र. अश्या परिस्थितीत आजारी नागरिक आणि जवान ह्यांना उपचार देण्याचा एकच मार्ग उरतो – तो म्हणजे ‘एअर लिफ्ट’ त्यांना विमान किंवा हेलिकॉप्टर द्वारे जवळच्या उपचार केंद्रात अथवा इस्पितळात हलविणे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात, तोफांच्या भडीमारात जखमी होणाऱ्यांची संख्या बरीच असते. अश्या जखमींना आणि रुग्णांना अतिदुर्गम भागातून लेह किंवा थोइसे पर्यंत हेलिकॉप्टर ने आणि तिथून पुढे चंदिगढ ला विमानाने नेऊन इस्पितळात दाखल करण्याचे काम सुद्धा वायु सेनाच करते. अश्या रीतीने असंख्य नागरिकांचे प्राण वाचविण्यात वायुसेना व लष्कराच्या वैमानिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. असा एक किस्सा माझ्याही लक्षात राहिला आहे.

तो 2008 सालचा हिवाळा होता. हिमवर्षावामुळे उत्तरेतील जनजीवन फार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. अश्या परिस्थितीत पाकी सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आपले बरेच जवान जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्याचा निरोप मला चंदिगढ येथे मिळाला. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आम्ही ताबडतोब पावले उचलण्यास सूरूवात केली. मी हवामानाचा आढावा घेतला. आणि चपापलो. ज्या ठिकाणी ह्या जखमी जवानांना ठेवण्यात आले होते, त्या थोईस चे हवामान लँडिंग साठी प्रतिकूल होते. लेह आणि थोईस चा संपूर्ण आसमंत ढगांनी व्यापला होता. पर्वतीय प्रदेशात विमान चालविताना पर्वतशिखरांपासून सुरक्षित अंतर ठेवत जमिनीवरच्या खुणांच्या सहाय्याने मार्ग काढावा लागतो. ढगांमुळे हे कठीण होते. ह्या भागात इन्स्ट्रुमन्ट्स चा वापर करून विमान उतरविणे अतिशय धोकादायक असल्यामुळे तो पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हता.ह्या मिशन साठी निवडण्यात आलेल्या क्रू साठी ही कामगिरी अवघड होती. सर्वसाधारण परिस्थितीत अश्या हवामानात लँडींग करण्याचा विचार आम्ही सोडूनच दिला असता.  पण इथे जखमी जवानांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. मी स्क्वाड्रन मधला सगळ्यात जास्त अनुभवी पायलट असल्यामुळे मीच प्रयत्न करून बघण्याचे ठरविले. निरोप मिळाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आम्ही आकाशात झेप घेतली आणि थोड्याच वेळात लेह च्या आकाशात पोहोचलो. इथं पर्यंत हवामान वाईट होते पण अतिशय वाईट नव्हते. परंतु थोईस वरच्या आकाशातून जमिनीवरचे अजिबात काही दिसत नव्हते. कुठेतरी ढगांच्या एखाद्या फटीतून काही तरी दिसेल ह्या आशेवर आम्ही थोईस वर घिरट्या घालत होतो. आणि एका क्षणी एक फट तयार झाली आणि आम्ही थोईस ची धावपट्टी बघू शकलो. सर्व कौशल्य पणाला लावून, सुरक्षेची काळजी घेत, आणि धावपट्टी नजरेसमोर ठेवत आम्ही थोईस ला लँडींग केले. विमानाचे इंजीन सुरू ठेवूनच जखमी जवानांना विमानात घेतले आणि ताबडतोब परतीच्या प्रवासासाठी निघालो. डॉक्टरांनी मला जखमी जवनांविषयी माहिती दिली. सगळे जवान 19-20 वर्षे वयाचे होते आणि त्यांना डोके आणि शरीराच्या इतर भागात जखमा झाल्या होत्या. त्यांना भूल देण्यात आली होती तरी त्यांना अधिक त्रास होऊ नये म्हणून विमानाच्या आतील हवेचा दाब योग्य पातळीवर राखणे आवश्यक होते.विमान उड्डाणाच्या तयारीत होते, हवामान परत आमची कसोटी बघत होते. ढगांनी परत दाटी केली. दहा मिनिटे आम्ही धावपट्टीवरच वाट पाहिली. विमानात चंदिगढ ला जेमतेम पोहोचू शकू एवढेच इंधन शिल्लक होते. मी विमान डिसपर्सल मध्ये परत आणले. तेवढ्यात डॉक्टर परत कॉकपिट मध्ये आले. “अर्धवट शुद्धीत असले तरी जखमी जवानांना आपण विमानात असल्याची जाणीव झाली आहे. हॉस्पिटल मध्ये आपल्यावर उपचार होणार ही खात्री वाटल्यामुळे त्यांचे ब्लड प्रेशर स्थिरावले आहे. विमान परत फिरल्याचे त्यांना माहीत नाही, त्यामुळे ते आश्वस्त आहेत. निसर्गाने परत कृपा केली. एका ढगात थोडी फट पडली, आणि आम्ही संधीचा फायदा घेत ताबडतोब चंदिगढ च्या दिशेने उड्डाण केले. चंदिगढ ला विमानतळावर रुग्णवाहीका तयारच होत्या. 

दुसऱ्या दिवशी कमांड हॉस्पिटलमध्ये त्या जवानांची विचारपूस करण्याचा मोह मला टाळता आला नाही. मी प्रत्येकाला भेटलो आणि त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा बघून सुखावलो. त्यांना चांदिगढला माझ्या विमानातून हलविण्यात आल्याचे मात्र मी बोललो नाही. ते थोईस ला जखमी अवस्थेत पडले असतांना त्यांना दिलासा देण्यासाठी  अन्ना बत्तीस चा (म्हणजेच AN32 चा) आकाशातून येणारा आवाजच पुरेसा होता. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि वैद्यकीय उपचारांच्या बळावर ते फिरून उभे राहणार होते सीमेवर पहारा ठेवण्यासाठी. असे प्रसंग तुमच्या मनावर कायमचे कोरले जातात. असे समाधान तुम्ही पैशांनी विकत घेऊ शकत नाही. त्याच्या बळावरच सेवIवृत्ती अधिक दृढ होत जाते. निरपेक्ष सेवा करण्याची संधी हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे ह्याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही तुमच्या कामावर अधिक प्रेम करू लागता. असे क्षण भाग्यवंतांनाच लाभतात. न मागता!

 

AVM Suryakant Chafekar

Air Vice-Marshal Suryakant Chintaman Chafekar, AVSM, Sharuya, Shaurya Chakra is a retired Indian Air Force (IAF)officer. He was the Commander Officer of No 48 Squadron IAF. In May 2008, he landed Antonov AN-32 aircraft on High Altitude Advanced Landing Grounds Daulat Beg Oldie, Fukche, and Nyoma.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *