माझ्या मना…
प्रिय मनास,
विजयादशमीच्या लक्ष–लक्ष शुभेच्छा. कशी काय राहिली नवरात्री? काय काय केलंस? उपवास तर केलेच असतील होय ना? बरं आहे…अनपेक्षितपणे हातून घडलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी उपवास हा अपेक्षित आणि उत्तम पर्याय आहे. परंतु खरं सांगू का? काही उत्सवांना असलेले पारंपरिक संदर्भ आत्मसात करून आचरणात आणता आले ना की आयुष्याला नवीन उंची प्राप्त करता येते. नवरात्रीला खूप सारे पारंपारिक संदर्भ आहेत. विशेष म्हणजे शक्तीच्या सर्व रुपांची सर्वतोपरी उपासना आणि आपल्या मर्यादांचे सीमोल्लंघन हाच नवरात्रीचा खरा संदर्भ आहे. कळंतंय का? अलीकडच्या काळात परंपरा, इतिहास, संस्कृती सर्वच हरवत चाललंयं नाही का? आणि राहिला प्रश्न तुझा– तर विकारांची स्विकृती संस्कारांच्या आकृती पेक्षा जास्त प्रगल्भ होत चालली आहे. निघ रे बाबा यातून फार गुरफटला आहेस . वाटतयं कधी अंधानुकरणात ! कधी फॅशन मध्ये !! कधी अतिरेकी स्वातंत्र्याच्या स्वैराचारी चक्रव्यूहात !!! तुला एक सांगू कां? नीट बसून आत्मचिंतन कर ! आपण कसे वागतोय याचा विचार कर !! दे नवीन संदर्भ या विजयादशमीला !!! कर विवेकाचे शस्त्रपूजन !!!! कर उल्लंघन आपल्या मर्यादांचे आणि मग बघ तुला हळूहळू संदर्भ कळू लागेल नवरात्रीचा !!!
कनफ्युज्ड झाला आहेस वाटत, की नेमके कशाचे उल्लंघन करायचे? अरे फार सोपी आहे. नवरात्रीचे नऊ संकल्प, नऊ संकल्पांच्या दहा दिशा, उत्सव संपन्न झाला अस समज. आता सांगतोय तुला कुठले संकल्प करायचे आणि कसे राबवायचे ते !
एक काळ असा होता की तू जगतांना जसा आहेस तसाच दिसायचा. विचारात आणि आचरणात फरक नसायचाच. मुळी कुठलाही मुखवटा नसायचा. सगळेकाही पारदर्शी पाण्या इतकं सुंदर तरल. हल्ली खूप मुखवटे घालतोयस तू ! स्वत:ला काय वाटेल यापेक्षा इतरांना कसं दिसेल याचा विचार करतोयस तू !! बंदिस्त झाला आहेस रे !!! सगळ लपून लपून चाललेलं असतं तुझं . मोकळं मोकळं काहीच नाही. प्रश्न पडतो, कधी कधी, तू आनंदाचा शोध घेतोस की आनंद शोधता शोधता दुःखाचा महाप्रसाद वाटत असतो. बस झाली रे ड्रामेबाजी. निघ या मुखवट्यातून बाहेर. मोबाइलला लावलेला सिक्युरिटी कोड काढून फेक. विचारांच्या स्वच्छतेचं अभियान सुरू कर. स्वच्छ भारत होण्यासाठीही स्वच्छ विचार लागतात बाबा ! घे की पहिला संकल्प. मुखवटे काढून पारदर्शी पणे जगण्याचा.
दुसरा संकल्प याहून फार कठीण आहे. स्थिरता हरवली आहे रे, तुझ्या हृदयाची. जितक्या झपाट्याने कपडे बदलतोस तितक्या झपाट्याने नाती देखील बदलायला लागलास रे. नशीब आई–वडिल बदलायची प्रथा नाही आपल्या देशात. एरवी नवीन आई–वडिल घेऊन आला असतास एक्सचेंज ऑफर मध्ये. तुझं लाईफ म्हणजे टीव्ही सिरीयल आहे का रे? बरं वाटतंय बघायला? एका बाईचे तीन नवरे? एका नवऱ्याच्या तीन बायका? अरे कसं सांगू तुला, बायको नावाचं एक नातं आणि त्याची घट्ट विण जन्मभर जोपासता आली ना, तर खरा पुरुषार्थ निर्माण होतो. नातं कुठलेही असो रे, पण त्यात स्थैर्य असावं लागतं. नाती म्हणजे सेल नव्हे की शेकडोनी जमवता येतील. ती मर्यादित असली की त्यात आनंद शोधता येतो. तुझी वाट लागली आहे रे. किती नाती बदलतोस लेका? थांबव की आणि खरं सांगू, नाती निभवायला मन जपावी लागतात,अपेक्षा नाही! मला काय मिळालं याचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या संबंधिताना काय देतोय याचा विचार कर. एक बोलू, तू जेंव्हा केंव्हा निराश असशील ना, तर तुझे २००००/२५००० फेसबुक फ्रेंड्स जपणार आहेत का तुझ्या संवेदना? अशा वेळी आई, बायको, बहीण आणि खूपच भाग्यवान असलास आणि अविवाहीत असलास तर प्रेयसी. बस इथेच तुझ्या नैराश्याच उत्तर मिळेल. बाकी सब ढोंग धतुरा है पगले. मग करणार का संकल्प नाती निभावण्याचा आणि त्यांच्यात स्थिरता शोधण्याचा?
खूप साऱ्या स्वप्नांचा पाठलाग करतो आहेस तू. खूप गोंधळ झाला आहे असं नाही का वाटत तुला? हे पकडू का ते? बँड वाजलियं रे तुझी. किती किती संकल्प आणि कितीदा उध्वस्त? तुझ्या उध्वस्त स्वप्नांची गाठोडी बांधायची झाली ना, अख्खी हवेली कमी पडेल रे गाठोडी ठेवायला… हं! मला वाटलंच तू चिडशील. म्हणून! मोठं होण्यासाठी मोठी स्वप्न असावी लागतात. खरयं तुझं, पण काय आहे ना बाबा, नक्षत्राच्या चांदण्यांनी पोट भरता येत नाही. भाकरी लागते रे….! त्याला बघ ना मोठी स्वप्न पण इंस्टॉलमेन्ट पाड. स्वप्नांचे छोटे छोटे हप्ते तयार कर आणि कर पूर्तता आपल्या स्वप्नांची. नको कोण म्हणतंय. पण कानात हवा घुसलेल्या शिंगरा सारखा उधळू नकोस. चोहीकडे एक एक हप्ता पूर्ण कर. नाही तर कर्माच्या वहीत सीबील खराब होईल. तुझ्या स्वप्नांना पंख नसले तर चालतील, पाय मात्र हवेत. घे मग तिसरा संकल्प! मोठ्या स्वप्नांना लहान लहान स्वप्नांमध्ये भक्कम पणे गाठण्याचा!
खुप स्ट्रेस मध्ये आहेस का रे? टेन्शन वाढलाय वाटतं! का नाही वाढणार? माळ रानातल्या गारव्यापेक्षा ए सी च्या हवेतच झोपतोय लेका. मातीचा गंध देणाऱ्या भिंतीपेक्षा परफ्युमशी गट्टी जमलीय तुझी. चुलीवरच्या भाकरी ऐवजी ओव्हनच्या पिज्जा वर शिफ्ट झालायस तू. दिवसभर चरत असतोस. पोट भरत नाही तरीपण सुटत चाललयं. योगा करावासा वाटतो पण होत नाही. खुप खाऊनही पोट भरत नाही. म्हणून की काय बीपी, शुगरच्या गोळ्या पण खातोस? मरशील ना लेका. अरे थोडा जागा हो. ऊठ लवकर, झोप लवकर. फारसा ऑनलाईन राहिलास ना तर लवकर ऑफ होशील. कधी–कधी झाडांशी बोलत जा. माती हातात घेऊन तिचा सुगंध एन्जॉय कर. चिमण्यांना दाणे खायला बोलाव / आनंदाने जमल्यास शेती कर. नाहीच जमलं तर एखाद्या वेळी फेरफटका मार जंगलात! आ धुनिकीकरण्याच्या तारेनी बांधलंय तुला. बोनसाय झालाय तुझा. उंदरांचा देखील हात पुरतोय रे तुझ्या फळांपर्यंत. अरे कर संकल्प. संकल्प क्रमांक चार – आधुनिकीकरणाची तार तोडून ( सोडून नाही). थोडस गावरान जगण्याचा.
खूप संपत्ती जमवतोयस, खरंय का? जमव जमव! येणारा काळ तसाही तुझ्या पिलांसाठी कठीणच असणार आहे. भौतिक वादाचे भूत मानगुटीवर बसवता बसवता आपली पिढी खपली आणि ती उतरवता उतरवता आपल्या पिलांच्या नाकी नऊ येणार आहे. इनआँरगँनिक (अजैविक) स्वस्त असतं, आँरगँनिक ( जैविक) महाग असतं. आँरगँनिक खातील तरच जगतील. मग इतकं महाग मिळवायला पैसे देखील भरपूर लागतील. नाही का? पैसे जमव सोय कर पिलांची. फक्त काळजी घे. त्यांना इतकं परावलंबी करू नकोस की उडण्यासाठीही पंख उधार मागतील ते. संपत्ती सोबतच सतप्रवृत्तीचा वारसा ही दे त्यांना. जमेल का रे? कारण युग कुठलेही असो भव्यदिव्य जे काही घडेल ते सतप्रवृत्तीतूनच निर्माण होणार. हा पाचवा संकल्प… आपल्या वारसा मध्ये संपत्ती सोबतच सतप्रवृत्तीही निर्माण करण्याचा.
खूप दानी होत चाललायस असं ऐकलंय. स्वाभाविक आहे म्हणा.. पैसा अतोनात झाला की दान सुचतंय. काही ऑब्जेक्शन नाही. दान नक्की कर. वर्षातून एकदा महाप्रसाद कर मंदिरासमोर. अनाथालयात फळं वाट. भिकाऱ्यांच्या हातात चार पैसे दे. पण खरं सांगू , तयार फळ वाटण्यापेक्षा बीज वाटणारा मोठा असतो. म्हणून खू पसारे दानपुण्य करता करता एखाद्या गरीब किंवा अनाथ मुलाला मोफत शिकवण्याची जबाबदारी घे आणि शक्य झाल्यास एखाद्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या शेतीत पाणीपुरवठ्यासाठी मदत कर. काय मग घेणार हा सहावा संकल्प? शंभर महाप्रसादाचे पुण्य लाभेल, बरं का!
हल्ली फार रोमँटिक होत चालला आहेस वाटतं. खूप सारे मित्र आणि खूप साऱ्या मैत्रिणी आणि काहीही बोलण्याची मुभा. अगदी काहीही. काहीही बोलणे, काहीही करण्यात परिवर्तित होण्यासाठी वासनेचा एक क्षण पुरेसा असतो. अनुरागातून निर्माण होणारे आकर्षण आणि वासना यात फार पुसटशी लक्ष्मणरेखा असते. मित्रा आकर्षण नैसर्गिक आणि वासना मात्र मानवनिर्मित असते. कारण ती विकारातून उत्पन्न होते. रोमॅंटिसीजन च्या नावाखाली वासनेला बळी पडू नकोस. आकर्षणाच्या लक्ष्मणरेखा ठरव. जमेल का मनाला कंट्रोल करणं? बघ प्रयत्न करून. आणि कर सातवा संकल्प… वासनेला बळी न पडण्याचा. आकर्षणाला मर्यादित ठेवण्याचा.
तुला माहीत आहे का, स्वार्थ आणि भोग फार जवळचे मित्र असतात. स्वार्थाचा तोल गेला की भोग निर्माण होतो. भोग निर्माण झाला की तो खूप भोग भोगायला लावतो. ते देवाधिकांना देखील सुटले नाही. तुला सुटतील का? नाही नाही नाही! गैरसमज करून घेऊ नकोस. तू वैरागी व्हावास अस म्हणणं नाही आहे माझं. पण सांगू…खूप सारे स्वार्थ साधता साधता एखाद्यावेळी केलेला त्याग समाधान देऊन जातो. बघ प्रयत्न करून. मानवी जन्मास आलेला भोग आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य प्रतिबंधित करायचे असेल तर त्याग शिकावा लागतो. शिकशील कां?
करोना संपला का रे की परत येणार? खूप घाबरलास लेका आयुष्य पोझिटीव्ह करता करता किती धडपडतोयस टेस्ट निगेटिव्ह यावी म्हणून! काय भिती आहे रे तुझ्या चेहऱ्यावर? तरी बरं…चायनात जन्मला नाहीस. तुला काय वाटत एक करोना गेला तर दुसरा येणार नाही कशावरून अरे हा तर शरीराचा कोरोना आहे. आम्ही भारतीय तर मनाच्या कोरोनानी कधीचे संक्रमित अहोत. किती दुष्प्रथा जिवंत ठेवल्यात आम्ही जिवंत माणसांना मरण यातना देण्यासाठी. लिंगभेद, भृणहत्या, जातीभेद, सांप्रदायिकता, धर्म विद्वेष इतक्या कोरोनांचे काय करणार आणि मजेदार म्हणजे तुझ्यामध्ये घट्ट रुतून बसलेल्या या संक्रमणाला शतकानुशतके प्रतिबंधक लसेची प्रतीक्षा आहे. बोल मित्रा शोधायची का? अरे माणूस म्हणून जगण्याचा संकल्प करू चल! शरीराचा कोरोना काय आहे? आज ना उद्या संपेलच. पण अनिष्ठ परंपरांच्या विकरण्यातून जन्माला येणाऱ्या कुप्रथांचा कोरोना संपवूया.
खुप जास्त ज्ञान झालं काय रे? पण एक सांगू ….हे सर्व मी माझ्यासाठी लिहिलंय. बघ तुला पटतंय तर तू पण कर. नवरात्रीचे हे नऊ संकल्प दहा दिशांना नवीन चेतना देतील. ही अपेक्षा करतोय. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सांगितलेले सीमोल्लंघन तुम्हास पचनी पडो ही ईश्वर चरणी प्रार्थना.