सुख म्हणजे नक्की काय असतं ?

जन्मापासून मनुष्य ज्याच्या शोधासाठी वणवण फिरत असतो, ते म्हणजे सुख मिळवण्याकरिता!पण सुख म्हणजे नेमकं काय हेच कळत नाही. आणि त्यामुळे कदाचित ते त्याच्याजवळ असूनही दिसत नाही. कोणी म्हणतं उच्चशिक्षित होणे, चांगली नोकरी, चांगला पगार, रुबाबदार पद, कार, बंगला ह्या गोष्टी असल्या की मनुष्य सुखी. पण हे झालं अलीकडच्या काळात. पूर्वी कुठे कार,एवढाले पगार असायचे? पण तरी देखील माणसं जास्त सुखी होती.आणि हल्ली ह्या गोष्टी असूनही हरवला आहे माणूस! मग काय चुकतंय तर सुखाची व्याख्या! 

अर्थात सुखाची व्याख्या व्यक्ती परत्वे बदलते. जसं कोणाला ईश्वर भक्ती हेच अत्युचम सुख वाटते तर कोणी परमार्थ जवळ करतो आणि त्याला सुख असे नाव देतो. म्हणजे व्याख्या भिन्न असली तरी मनुष्याला सुख सापडायला हवे. पण प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. खूप माणसं वर्षोनुवर्ष वाया घालवतात सुखाच्या शोधात. आणि उदास राहतात. ह्यात अनेकवेळा मानसिक कमकुवतपणा कारणीभूत ठरतो किंवा दुसऱ्या बरोबर तुलना,स्पर्धा ! 

खरं तर रस्त्याकडेच्या झोपडीतून बाहेर येऊन आनंदाने रस्त्यावर खेळणाऱ्या मुलाकडे पाहिलं की वाटते सुख मोफत मिळते. काही चिंता नाही , टेन्शन नाही, निरागस हसू !जे एका लहान मुलाला जमते ते मोठ्या माणसांना का जमत नाही?का एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही? का हा गैरसमज पाळला  आहे की पैसे खर्च झाले की आनंद मिळतो. कधी कधी वाटते की  आई वडील म्हणून आपण हे मुलांना सांगायला विसरतो . त्यामुळे भौतिक सुख महत्वाचे वाटते. 

खरं म्हणजे आपल्याला जुना मित्र किंवा मैत्रीण भेटली की होणारा  आनंद अशी जरी कोणी सुखाची व्याख्या  केली तरी वावगे होणार नाही . पण आजकाल खरे मित्र मैत्रीण भेटणे पेक्षा सोशल मेडिया वर भेटणे गरज आणि फॅशन बनले आहे. ज्यामध्ये वास्तविकता कमी आणि आभासी पण जास्त असल्याने कृत्रिम , पोकळ वाटते सारे. ह्या पिढीला जेव्हा रिऍलिटी चा अनुभव येतो तेव्हा सुख तर मिळत  नाही पण नैराश्य मात्र नक्की येते.

मला प्रामाणिक पणे असे वाटते की मानसिक शांती , समाधान , धीर ह्या गोष्टी सुख देतात. कोणाला एकटे राहण्यात आनंद वाटतो , कोणाला एक दिवस जरी मैत्रीण भेटली नाही की  चिडचिड सुरु होते . कोणाला वाचन करणे, बाग काम ह्यात सुख गवसते . 

कुठे असंही चित्र दिसते की प्रचंड श्रीमंत घरात काम करणारी गरीब मोलकरीण मालकिणीपेक्षा जास्त सुखात आहे. कारण श्रीमंती खोलवर रुतलेल्या जखमा भरून काढू शकत नाही ज्या बहुदा  ज्या आपल्याच लोकांनी दिलेल्या असतात . 

पैसा जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तरी सुख मात्र मानण्यावर असते. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते की आपण एन्जॉय काय करतो . कदाचित हेदेखील खूप जणांना समजत नाही कारण आत्मपरीक्षण नसते. अनेकदा फॅमिली , एकत्र नातेवाईक , एकत्र जेवण , गप्पा , मनमोकळे संवाद आई वडिलांशी खूप सुखद अनुभव देऊन जातात. 

साधेपणा, अपेक्षा ना करता, जे पडेल झोळीत ते गोड मानून घ्यायचं .आला तो  क्षण जगायचा. खूप जण भविष्यासाठी इन्व्हेस्ट  करणे, पोरांसाठी चिंता , उद्यासाठी खबरदारी ह्या गोष्टी करताना वर्तमानात जगतच नाहीत. तरुणपणी म्हातारपणाची सोय म्हणून कमावताना आयुष्य सटकन हातातून निसटून जातं आणि माणूस पुन्हा उदास होतो . काय अर्थ आहे ह्याला?  

 गुपित असतं सुख विकत घ्यायचं कसं ह्या चं ! ज्याला ते रहस्य कळलं तो सुखी आणि तसंही आपण म्हणतो ना जगी सर्वसुखी असा कोण आहे ? प्लस मायनस चालणार आणि त्याशिवाय गंम्मत तरी कशी येणार ?     

प्रत्येकाला परफेक्ट, ideal life हवे असते . खरं तर ही fantasy आहे. काही

लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याकरिता प्रियजनांपासून दूर राहतात तर काही प्रिय लोकांजवळ राहता यावे म्हणून आपल्या स्वप्नातील ध्येयापासून दूर जातात . 

मला इथे आवर्जून प्रशांत दामले यांनी म्हणलेल्या गाण्याच्या ओळींचा उल्लेख करावासा वाटतो . 

“मला सांगा सुख म्हणजे नक्की कायअसतं काय असतं ?

काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं 

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो 

हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो 

आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायच नुसतं”

असं म्हणतात की ,”जे तुम्ही बदलवू शकता ते बदला; जे बदलू शकत नाही ते स्वीकार करा; आणि जे स्वीकारू शकत नाही मात मिळवा.” म्हणजे सुखी व्हाल. 

कुठलाही नेगेटिव्ह विचार तुम्हाला शिवू शकणार नाही जर तुम्ही एखाद्या बरोबर आपल्या भावना शेअर केल्या . उलट तुम्हाला आधार मिळू शकतो. खूप जण एकटेपण, कमी बोलणे ह्या मुळे स्वतःला त्रास करून घेतात. उलट सोशल असणे, मित्र, मैत्रिणी असणे आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहे. वर्तमानात जगणे , आला तो क्षण एन्जॉय करणे ह्या छोट्या गोष्टी सुख देतात. 

म्हणूनच आपण बघतो पैसे, बंगला, गाडी, नोकर सगळं असून अनेकांना सुख न सापडल्याने ड्रुग्स, डिप्रेशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. सोशल मीडिया वरील आभासी मित्र गोळा करण्यापेक्षा रोज भेटणारे, जिव्हाळा वाटणारे खरे मित्र जर जोडले तर कोणाची काय बिशाद की तुम्हाला एकटे पाडण्याची !  

खरी ताकद कशात  आहे माहित आहे? आपण आपल्या मनावर कंट्रोल, ताबा  घेण्याची. फोकस करा आणि सुखाची किल्ली तुमची तुमच्याच हातात आहे हे कधी विसरू नका, ती दुसऱ्याला देऊ नका!

 

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *