राणीचा राज्य कारभार

आई,मी निघते हं. राधा आलीय.” घाईघाईने दरवाजा उघडत कल्याणीने म्हटलं आणि ती घराबाहेर पडली. नऊ अकराची गाडी पकडण्यासाठी तिची ही रोजची धावपळ असायची.

राधा घरात शिरली तशी मंगलाताईंनी तिचा ताबा घेतला.

राधा, अळू बनव ग. मी पानं धुवून ठेवली आहेत.”

हो हो .” ती भराभर कामाला लागली.

आणि कणीस, काजू, दाणे सगळं काही व्यवस्थित पडू दे. वाटण लाव.

अहो आजी, आज पहिल्यांदाच करणार आहे का मी? करीन सर्व नीट.तुम्ही आरामात बाहेर बसा.”

“कोबी किसून कोशिंबीर कर. कोवळा छान आहे”

यांच्याशी बोलत बसले तर सूचना कधी संपायच्या नाहीत असा विचार करून राधा मुकाट्याने कामं उरकत होती.

मंगलाताई बाहेर येऊन बसल्या. समोर टीव्ही वर काही चालू होतं पण त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांच्या डोक्यात विचार चालू होते. ‘ आता काय बरं करावं? लसूण सोलून ठेवावी का?’ इतक्यात बेल वाजली. त्या उठून तरातरा दाराकडे निघाल्या. तोवर राधाने येऊन दरवाजा उघडला.

तू कशाला आलीस? मी आहे ना इथे?”

आजी,ही वेळ सुखदेवची. तो येणार, आणलेले कपडे ठेवणार आणि इथले घेऊन जाणार. तुम्ही कशाला उठता ?”

कशाला म्हणजे ? कपडे मोजायला नकोत ? जाग्यावर ठेवायला नकोत ?”

 मग मंगलाताईंनी कपडे मोजले आणि आंत नेऊन ठेवले. ‘ दमले ग बाई’ म्हणत त्या परत सोफ्यावर बसल्या.राधा स्वयंपाक उरकून गेल्यावर स्वयंपाकघरात डोकावून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करून घेतली. इतक्यात राहुल क्लासमधून आला.

कॉलेज कधी रे तुझं? कधी जेवायला बसणार?”

आजी, मी तासाभरात निघतोय. माझं मी वाढून घेईन.”

ते काही नाही. नीट जेवत नाहीस तू वाढल्या शिवाय .लक्ष कुठे असतं तुझं जेवणाकडे ?” असं म्हणत त्या उठल्याच.

  मग दिवसभर काही ना काही काम करता शोधत राहिल्या . संध्याकाळी कल्याणी आणि विद्या चर्चगेट स्टेशनवर आल्या तेंव्हा साऱ्या प्लॅटफॉर्मवर नेहमी पेक्षा जास्तच गर्दी होती. कुठेतरी वायर तुटल्याने गाड्या उशिराने धावत होत्या. बसणार कुठे, उभं रहायला जागा नव्हती.

विद्या, मी जॉब सोडायचा विचार करतेय. कंटाळा आला बघ या सगळ्याचा.”

ए वेडाबाई, बरी आहेस ना? नोकरी काय सोडतेस ? ”

काय करू ? आताशी ही रोजची धावपळ नकोशी वाटतेय.शिवाय घरी गेलं की अपराधी वाटतं. सासूबाईही किती दिवस सारं बघणार ?”

काही वेळ दोघी गप्पच होत्या. प्रवासातही फारसं बोलणं झालं नाही. गाडीतून उतरल्यावर विद्या म्हणाली, “ कल्याणी, मला कळतंय तरीपण मी एवढंच सुचवेन की सध्या हवी तर रजा घे महिनाभर. मी विचार करून निर्णय घे.”

कल्याणी घरात शिरली तेंव्हा मंगलाताई फोनवर बोलत होत्या. तिने चहा केला आणि नेहमी प्रमाणे अर्धा कप त्यांना द्यायला गेली. त्या कुणाला तरी सांगत होत्या.

नाही ग बाई’. मला कुठे वेळ आहे तुमच्या भागवत सप्ताहाला यायला ? सून नोकरी करते ना ! घरकामातून फुरसत काढणं……..” असं म्हणताना त्यांचं लक्ष कल्याणीकडे गेलं आणि त्या चपापल्या.

ठेवते ग फोन.” म्हणत त्यांनी फोन बंद केला. चहाचा कप त्यांच्या हाती देऊन कल्याणी म्हणाली,

आई, तुम्हाला जाता येईल. मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांच्याकडे चाव्या असतात. तुम्ही कधीही सत्संगाला जाऊ शकता. ”

अग ही पोरं धसमुसळी. सदा घाईत. जेवणाखाणाचीही शुद्ध नसते त्यांना.”

बरं बरं. उद्यापासून मी रजेवरच आहे. मग नोकरी सोडणार म्हणतेय. ”

हो का ? बघ बाई तू आणि उल्हास ठरवा.”

कल्याणीने रजेचा अर्ज पाठवला आणि तात्पुरता विषय संपवला. रोजची धावपळ संपली. नवरा , मुलं यांचे लाड, कपाटं लावणं, घर नटवणं, सिनेमा नाटकाला हजेरी लावणं या ती रमून गेली.

मंगलाताईही सुखावल्या. आरामात दिवस जात होते. सत्संगाला जाता येत होतं. मध्ये चार दिवस मुलीकडे राहून आल्या. बहिणीला भेटून आल्या. पण जसे दिवस जात होते तश्या त्या अस्वस्थ होऊ लागल्या. सत्संगात फारसं मन लागत नव्हतं. ती प्रवचने, उपदेशपर वाचन, भजनं छे, मुळातच त्यांना या सगळ्याची आवड नव्हती.

एका वेगळ्याच शंकेने त्यांच्या मनात घर केलं. घरातील आपल्या अस्तित्वालाच धक्का लागला आहे का? काही काम करू गेले तर कल्याणी धावत येते आणि म्हणते, “ आता तुम्ही आराम करायचा. मी आहे ना घरी ! किती वर्षे तुम्ही राबलात. तुम्हाला वाचायला काही हवं का ?”

आता काय सांगू हिला. पोरंही येताजाता “आई आई” करतात. आधी  “आजी निघालो ग.मित्र आला तर हे जर्नल देशील का ? माझं कुरिअर आलं तर घे हं”,असं काहीबाही सांगायचे. आता आपली गरजच कुणाला उरली नाही. सर्व काही कल्याणीच करणार. मी तरी किती माळा जपणार ? यातून कसा मार्ग काढू ?

 उल्हास ऑफिसला जायला निघाला होता. आदर्श पत्नीप्रमाणे कल्याणीने त्याची सारी तयारी करून ठेवली होती. अचानक मंगलाताईंना काही सुचलं. त्या हळूच उठल्या. त्यांनी उल्हासचा हातरुमाल काढून बसल्याजागी लपवून ठेवला व शांतपणे टीव्ही पहात बसल्या. टीपॉयवरुन मोबाईल, वॉलेट उचलताना उल्हासने विचारलं,” कल्याणी,अग इथला हातरुमाल कुठे गेला ? ” कल्याणी हातातील काम सोडून घाईघाईने आली.

इथंच तर ठेवला होता. ” तिने इथे तिथे शोधलं. मग ‘दुसरा आणते’ म्हणत ती आत गेली.

उल्हास, हा का रे तू शोधत होतास तो रुमाल?” असं साळसूदपणे विचारत मंगलाताईंनी हळूच रुमाल पुढे केला.

हो ना, कुठे सापडला तुला ?”

इथेच तर ह़ोता.”

“अरेच्या, आम्हाला दिसलाच नाही. थॅंक्यू आई.” म्हणत तो हंसत निघाला. मंगलाताईंना खूप बरं वाटलं.

मग दोन-तीन दिवसांआड अश्याच घटना घडू लागल्या.कधी चार्जर, कधी पेन, कधी पुस्तक दिसेनासं व्हायचं आणि मंगलाताई अगदी वेळेवर ती वस्तू शोधून हातात द्यायच्या. समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावरील आधीचा ताण, मग वस्तू हाती आल्यानंतर ‘ सुटलो बुवा’ चा आविर्भाव आणि मुख्य म्हणजे आपल्या प्रतीची कृतज्ञता हे सारं त्यांना आवडू लागलं.

कल्याणीला मात्र यामागचं गूढ हळूहळू लक्षात येऊ लागलं. पण त्यावर काय उपाय करावा हे तिला कळेना. त्यांना न दुखवता मार्ग काढायला हवा.

त्यादिवशी कसली तरी रजा होती म्हणून विद्या कल्याणीच्या घरी आली.एकमेकींना बघून दोघां मैत्रीणींना आनंदाचं भरतं आलं. शॉपिंगला जायचं ठरलं. कल्याणीने भराभरा तयारी केली. त्या बाहेर पडणार म्हणता तिच्या लक्षात आलं की आपला मोबाईल कुठे दिसत नाही. तिने एक कटाक्ष मंगलाताईंकडे टाकला आणि शोधायला सुरुवात केली.

थांब जरा, मी तुझा नंबर लावते.” विद्याने फोन लावला.रिंग ऐकू आली तशी त्या आवाजाच्या दिशेने कल्याणी मंगलाताईंच्या खोलीत पोचली आणि त्यांच्या उशीजवळ तिला तिचा फोन दिसला. एव्हाना गोर्यामोर्या झालेल्या मंगलाताई तिथे पोहोचल्या.

अग बाई, इथे कसा काय तुझा फोन आला?”

मीच चुकून ठेवला असेल की .जाऊन येते हं.”

दोघी मैत्रिणी बाहेर पडल्या..

कल्याणी, कसं चाललंय तुझं ?मी मात्र रोज तुला मिस् करते ग. ”

 “खरं सांगू विद्या, घरी बसून महिना झाला नाही अजून तरी मी कंटाळून गेले आहे. मीही तुला मिस् करते. येताजाता गाडीतल्या गप्पा, साजरे होणारे खास दिवसअगदी सर्वच मिस् करतेरोज रात्री वॉट्स अॅप ग्रुपवर आपल्या गप्पा होतात. ऑफिसमध्ये काय घडलं ते सारं कळतं. या साऱ्यापासून मी मात्र दूर फेकले गेले आहे असं वाटतं. नोकरी सोडण्याचा विचार चुकीचा आहे का असं वाटतंय. ”

अग अजून काहीच बिघडलं नाही. सरळ रुजू हो. “

बघते. घरी काय सांगू ?”

कल्याणी घरी परतल्यावर मंगलाताईंनी तिला आपल्या खोलीत बोलावून,जवळ बसवून अधीरतेने विचारलं,

कल्याणी, तू रागावलीस का माझ्यावर ? मी हे असं वेड्यासारखं का वागतेय हे मलाही समजत नाही.”

कल्याणीने त्यांचा हात धरला व मायेनं म्हटलं,

नाही हो, मला काहीसं समजतंय. तुम्ही चार दिवस कुठे फिरून येता का ? ”

नको, माझं ऐकशील? उगीच नोकरी सोडू नकोस. मी आहे ना घरचं सगळं बघायला !”

आई, पण तुम्हाला किती दगदग होते या वयात. आणि कुठे जाता येत नाही. ॠषीकेश, हरीद्वारला जाणार का? चांगली सोबत बघून देते.”

छे ग. आपलं हे घर हेच माझं तीर्थस्थान.माझे देव इथे माझ्या घरी. माझी छोटीशी पूजा त्यांना पुरते. बाकी सत्संग, महिला मंडळं, भिशी पार्टी यांत माझं मन रमत नाही. उपऱ्यागत वाटतं. आणि मी अगदी घट्टमुट्ट आहे बरं का! आणि एक सांगायचं तर मी यापुढे कधीही काही तक्रार करणार नाही. ”

थॅंक्यू आई. मलाही ऑफिसला जायला आवडतं. पण तुम्ही फार दगदग करायची नाही हं.”

कल्याणीचा हा बदललेला निर्णय ऐकून मुलंही आनंदली. ती घरी असल्यापासून “ कुठे चालला ? कधी येणार? कुणाबरोबर जाणार? इतका उशीर का झाला? अभ्यास झाला का ?” असे सततचे प्रश्न आणि हेरगिरी. शिवाय पॉकेट मनी वाढण्याऐवजी कमी होण्याची धास्ती. बरं झालं ती पुन्हा ऑफिसला जायला तयार झाली.

उल्हास नेही सुटकेचा निःश्वास टाकला. पैशांची किंमत कमी होत आहे. कुठेतरी गुंतवणूक करावी, एखादा प्लॉट घ्यावा, शिवाय अचानक उद्भवणाऱे खर्च, आजारपण एक ना दोन, अनेक वाटांनी पैसे जाऊ शकतात. आणि ही नोकरी सोडायला निघाली. तिच्याशी या विषयावर एकदा सविस्तर बोलावं असं तो ठरवत होता.अखेर तिलाच सुबुद्धी सुचली म्हणायची. देवच पावला म्हणायचं.

कल्याणीचं चक्र सुरू झालं, नव्या उत्साहाने आणि अपराधीपणाची भावना झुगारून. सगळ्यात जास्त आनंद झाला मंगलाताईंना. त्यांचा राज्यकारभार सुरू झाला,सुखेनैव. अगदी इंग्लंडच्या राणी सारखा.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *