पानिपतचा रणसंग्राम !…..

“लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही …”

अशा भीषण शब्दात बखरकार, इतिहासकार ज्याचे वर्णन करतात तो घनघोर रणसंग्राम १४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपतनजीक झाला. याच गावानजीक पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. आणि ही अखेरची तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि छत्रपती  शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे लढवय्ये मराठे यांच्यात झाली. या घनघोर संग्रामात अहमदशाह अब्दालीने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० – ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राज्यकर्त्यांमध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सूर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. 

मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला. मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजुन प्रतिकार करु शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.

अजून एका वीराचा उल्लेख इथे जरुरी आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि राजे छत्रसाल ह्यांची कन्या मस्तानी, ह्यांचा पुत्र समशेर बहादूर उर्फ कृष्णराव हेही ह्याच युद्धात सदाशिवराव भाऊ आणि  विश्वासराव ह्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि वीरगतीला प्राप्त झाले. शमशेर बहादूर ह्यांना बाजीराव पेशव्यांनी लहानपणापासूनच शास्त्रार्थ व युद्धनीतीचे शिक्षण दिले होते. बाजीरावांचा पराक्रम शमशेर बहादूरांच्या नसानसात उतरला होता. त्यांच्याकडे पेशव्यांनी, उत्तर भारतातली काल्पी व बांदा ह्या सुभ्यांची जबाबदारी सोपवली होती. ती जबाबदारी शमशेर बहादुरानी पानिपतावर जाईपर्यंत अत्यंत इमाने-इतबारे निभावली. पानिपतावर झालेल्या मृत्यूच्या होळीमध्ये अन्य सरदारांप्रमाणेच अचाट पराक्रम व शौर्य गाजवून शमशेर बहादूरांनी आपल्या  प्राणाची आहुती दिली . 

ह्या अभूतपूर्व युद्धात ‘वीरमरण’ आलेल्या सर्व मराठा सरदार व शूर योध्दयांना माझा मानाचा मुजरा !….

श्री प्रसन्न खरे ह्यांच्या FB post वरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *