राजदीप सरदेसाईचे असत्याचे प्रयोग

राजदीप सरदेसाई हा मराठीतल्या एका कुमार बुद्धीच्या सुमार पत्रकाराची लेदर बाइंडिंग मधली इंग्रजी आवृत्ती आहे. जाणून बुजून खोटारडेपणा करणे आणि खोटे उघडकीला आल्यानंतर माफी मागणे हा याचा बऱ्याच वर्षांपासूनचा धंदा आहे. एकेकाळी हा बरा लिहायचा पण पुढे नेहरू डायनॅस्टी टीव्ही नामक अनधिकृत पाकिस्तानी चॅनेल जॉईन केल्यापासून सत्सदविवेकबुद्धी आणि नुसतीच बुद्धी ह्या दोन्हींपासून फारकत घेऊन हा धादांत खोटारडेपणा करायला लागला. हिंदी भाषेत ’थूंक के चाटना’ नावाचा एक वाक्प्रचार आहे, त्या विद्येत प्राविण्य मिळविल्यामुळे ह्याला काँग्रेस सरकार कडून पद्मश्री मिळाली.

गेल्या दहा दिवसांत ह्याने ट्विटर वरुन दोनदा खोटारडेपणा केला आणि तो उघडकीला आल्यानंतर चूक कबुल करून माफी मागणे तर सोडाच, ह्याने साळसूदपणे फक्त आपले ट्विट डिलिट केले आणि वर काही घडलेच नाही ह्या थाटात लोकांना नैतिकतेचे धडे द्यायला सुरवात केली. असले उद्योग ह्याने ह्यापूर्वीही अनेक वेळेला केलेले आहेत, पण ह्यावेळी हे उद्योग त्याला भोवले कारण खुद्द भारताच्या राष्ट्रपतीभवनातून ह्याचा खोटारडेपणा रीतसर इंडिया टुडे च्या मालकाला रीतसर पत्र लिहून उघड केला गेला.

अर्थात, न भयं न लज्जा, त्यामुळे ह्यातूनही धडा न शिकता राजदीपने सव्वीस जानेवारीला दिल्ली पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक शेतकरी ठार झाला अशी भडकाऊ आणि तद्दन खोटी ट्विट केली. इतकेच नाही तर टीव्हीवर आपण स्वतः ती बॉडी पाहिली असून त्या बॉडीच्या डोक्यात गोळी घुसलेली आहे आणि शेतकरी हे खपवून घेणार नाहीत असे धडधडीत खोटे सांगितले. तेही दिल्लीतील परिस्थिती ह्या असत्यामुळे चिघळू शकते, दंगे भडकू शकतात ह्याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा, किंबहुना असे दंगे पेटवणे हाच राजदीपचा उद्देश्य असावा असे दिसते.

ह्याच माणसाने राजीव त्रिवेदी नावाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर सोहराबुद्दीन प्रकरणात भयंकर असे खोटे आरोप केले होते आणि मिश्रा कोर्टात गेल्यानंतर रीतसर स्टॅम्प पेपर वर माफीनामा लिहून दिला होता ज्यामध्ये राजदीपने स्पष्टपणे कबूल केले होते की राजीव त्रिवेदी ह्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे, खोडसाळ आणि कुठलाही पुरावा नसताना केले गेले होते.

त्यानंतरही राजदीप सरदेसाईने असे बरेच असत्याचे प्रयोग केले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाचे कुलगुरू मोदींच्या सभेला उपस्थित होते असे धडघडीत खोटे बोलणे, कोरोना काळात उत्तर प्रदेश मध्ये एक माणूस उपासमारीने मेला अशी खोटी बातमी पसरवणे, दिल्ली निवडणूकीपूर्वी झालेल्या अमित शहांच्या भाषणाबद्दल खोटी बातमी पसरवणे, इनबॉक्स मधून लोकांना आई-माईवरून शिव्या देणे आणि ते स्क्रीनशॉट प्रसिद्ध झाल्यावर ’तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेऊन माझा अकाउंट हॅक झाला होता असा कांगावा करणे असे ह्याचे बरेच उद्योग आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ह्याचा खोटारडेपणा उघडकीला येऊनही हा मनुष्य अत्यंत कोडग्या निर्लज्जपणे टीव्ही वर वावरायचा, आणि वर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ‘पत्रकारितेतील नैतिकता’ ह्या विषयावर लेक्चरही द्यायचा.

सुदैवाने सध्या समाज माध्यमांमुळे खोटारडेपणा उघडकीला यायला वेळ लागत नाही, पण विचार करा २००२ मध्ये जेव्हा समाजमाध्यमं नव्हती तेव्हा ह्या माणसाने आणि त्याच्या बरोबरीच्या इतर लोकांनी किती रेटून खोटं बोललं असेल आणि ते पचवून ही नेलं असेल.

ठरवून खोटे बोलणे ह्या महान कार्यांत राजदीपला त्याच्या सुविद्य पत्नीचीही भक्कम साथ मिळालेली आहे. श्री श्री रविशंकरांचा आधी रेकॉर्ड केलेला इंटरव्यू हवी तशी काटछाट करून लाईव्ह म्हणून दाखवणे, ईव्हीएम मशीन ब्लु टूथ तंत्रज्ञानाने हॅक केली जातात हा शास्त्रज्ञांना झीट आणणारा शोध लावणे, दिल्लीमध्ये एका मुलीवर फेकलेल्या होळीच्या फुग्यांमध्ये मानवी वीर्य भरलेलं होतं असे सांगणे आणि असं काही नव्हतं असा रिऊर्ट प्रयोगशाळेतुन आल्यानंतरही ट्विट डिलीट न करणे ह्या आणि ह्यासारख्या अनेक खोटारडेपणाच्या लीला सागरिका बाईंनीही केलेल्या आहेत फक्त बाई अत्यंत बिनडोक असल्यामुळे त्यांचा खोटारडेपणा लोक हसण्यावारी नेतात.

अश्या ह्या खोटारडेपणाचा अर्क असलेल्या पती-पत्नीला विश्वासार्हतेचं सर्टिफिकेट कोण देतात माहित आहे? आपले ते प्रत्येक चॅनेल कडून नित्य लाथाडलेले निखिल वागळे! आहे की नाही मजा?

Shefali Vaidya

Author,Satirist,Speaker,Fellow-Ananta Leadership Program, Convenor-Indic Academy,Love Travel,Temples and Textiles,Mum to triplets,Indian,Hindu,Woman

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *