हेलिकॉप्टर पेरेंटिंग

प्रत्येक पालकाची आपल्या मुलांना संस्कार देण्याची, त्यांना वाढवण्याची वेगवेगळी पद्धत असते. यातील काहींची पद्धत बरोबर वाटते तर काहींची चुकीची. शेवटी मुले आपली खुश राहावी आयुष्यात, त्यांना कशाची कमतरता भासू नये हीच इच्छा असते. तरुण पणी फक्त स्वतःचा विचार करणारे मुलं मुली जेव्हा स्वतः आई वडील बनतात तेव्हा फक्त आपल्या मुलांचा विचार करतात. त्यांची स्वप्न, उद्देश ही फक्त आपली मुले असतात. 

पण कधीकधी मुलांवरील पालकांचे हे प्रेम प्रमाणापेक्षा जास्त होते, त्यात त्यांच्याकडून मुलांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप केला जातो. असुरक्षिततेची  भावना पालकांच्या मनात निर्माण होते. प्रत्येक गोष्ट मुलांच्या बाबतीतील आपल्याला माहित असावी ह्या बद्दल ते आग्रही बनतात आणि इथूनच सुरुवात होते ती हेलिकॉप्टर पॅरेंटिंग ह्या समस्येला! 

  

असे पालक मुलांच्या आयुष्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. अशा पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता हे एक कारण असू शकते. ते आपल्या मुलाला खूप प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. कुठलीच झळ मुलापर्यंत पोहोचू नये ह्याचा ते प्रयत्न करतात. उदाहरण द्यायचे झाले तर सायकल वरून शाळेत जाऊ देत नाहीत किंवा जवळचे एखादे कामही सायकलने जाऊन करू देत नाहीत. अति   काळजी  केल्याने ही मुले पंगू बनतात . कुठल्याही छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स ना ही मुले हाताळू शकत नाहीत. 

हळूहळू ही  मुले आत्मविश्वास गमावू लागतात.

पण असे असून पालकांच्या आपल्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा मात्र खूप असतात . स्वतः हे पालक टेन्शन घेतात. 

उन्हाळ्यात ऊन लागेल म्हणून “रस्त्यावर शेड बांधावी मुलांना ट्युशन पर्यंत पायी जाताना” हा प्रस्ताव ठेवणारे पालक (तेही पुणेरी ) माहीतीत आहेत.अशा पालकांना हे कळत नाहीये की ते मुलांनाअपंग बनवत जातायेत.

सतत घिरट्या घालत असतात मुलांभोवती म्हणून हे “हेलिकॉप्टर पॅरेण्ट” अशा नावाने ओळखले जातात.

अशा पालकांची मुले भित्री , लाजरी होतात.स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय ही मुले घेवू शकत नाहीत.कारण पूर्णपणे त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल पालकांकडेअसतो.

दुसरे म्हणजे ही मुले मेहनत करू शकत नाहीत.कारण त्यांच्यापुढे जेवणाचं ताटसुद्धा रेडीमेड वाढले जाते.

आता सांगा अशारितीने वीस वर्ष वाढल्यानंतर जेव्हा ते

बाहेरच्या जगात एकटे पाऊल टाकतात तेव्हा काय प्रकार होतअसेल ? मोठी आव्हानं तर दूर राहिली पण छोटे संकटही ही मुले पेलू शकत नाहीत.

ह्यामुळे होणारे तोटे –   पालकांची मुले भित्री आणि लाजरी बुजरी होतात .आत्मविश्वास मुलांमध्ये कमी असतो. आयती  वस्तू हातात मिळाल्याने ही मुले मेहनती नसतात. उलट परावलंबी असतात आणि जेव्हा बाहेरील जगात वावरतात तेव्हा ताणतणावाखाली येतात. 

फायदे – अशा पालकांना म्हणाल तर हा फायदा होतो की  मुलांबाबत सगळ्या गोष्टी माहित असतात . त्यामुळे मुले बिघडण्याची शक्यता फार कमी असते. 

अजून काही भिन्न प्रवृत्तीचे पालक पाहूया-

१) Authoritarian (एकाधिकारशाही) असलेले पालक – 

हे पालक खूप शिस्तीचे असतात .ह्या पालकांना मुलं चुकलेली आवडत नाहीत . आणि  समजा चुकली तर त्यांचा भर त्यांना शिक्षा करून सुधरवणे ह्यावर जास्त असतो. असे पालक मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा विचार न करता  त्यांच्या वर आपली मते लादण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या मुलांना स्वतःची स्वप्नं काय आहेत हे कधी कळत नाही. असे पालक मुलांचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करतात . 

पालक शिक्षा करताना टोकाला जातात . उदा – चटके देणे, मारणे, उपाशी ठेवणे , बाथरूम मध्ये कोंडणे इत्यादी . अशामुळे एक भीती निर्माण होते मुलांच्या मनात .आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास खुंटतो . 

२)  Permissive ( लिबरल पालक) :

असे पालक मुलांना खूप स्वातंत्र्य देतात ज्याला आपण फ्रीडम म्हणतो. असे पालक मुलांच्या चुका मान्य करत नाहीतच उलट त्यावर पांघरूण टाकतात. मुलांना समजावून सांगणे हे काम असे पालक कधी करत नाहीत. आपण मुलांना कसे हातही लावत नाही ह्याचे त्यांना समाधान असते . ह्यामागे अनेक करणे असू शकतात . अति श्रीमंती, पालक स्वतः खूप बिझी असणे – नोकरी अथवा सोशल सर्कल मध्ये , किंवा    

शिक्षण ,मेहनत अशा गोष्टी चे महत्व स्वतः पालकांना न वाटणे इत्यादी. अशा पालकांची मुले स्वार्थी बनतात .कोणाचंच ऐकत  नाहीत . आपण चूक करतोय हे त्यांना मान्य नसते .आणि कुठलीच आव्हाने ही मुले स्वीकारू शकत नाहीत. 

३) Uninvolved (अलिप्त पालक ) :

हे पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत . मानसिक आधार देऊ शकत नाहीत , त्यामुळे अशा पालकांची मुले बाहेरच्या जगात रमतात . ताणतणाव आल्यास ती सहन करू शकत नाहीत . नाती , प्रेम , एकमेकांबद्दल आदर , थोरामोठ्यांबद्दल सन्मानाची भावना इत्यादी गुण अशा मुलांमध्ये विकसित होत नाहीत. 

 ४) Authoritative (विदवत्ता व ज्ञान असणारे  पालक ) :

हे पालक समतोल असतात . उगीचच शिक्षा करणे , मुलांकडे दुर्लक्ष करणे स्वतःच्या टाइमपास ऍक्टिव्हिटीसाठी हे त्यांना मान्य नसते . कुठल्याही गोष्टी समजावून सांगणे , त्याप्रमाणे मुलांना वागायला शिकवणे , योग्य ते संस्कार देणे हे असे पालक आपले कर्तव्य समजतात . अशी मुले आनंदी असतात . त्यांच्यात आत्मविश्वास असतो . निर्णय घेण्याची क्षमता असते. त्यामुळे हे पालक यशस्वी समजले जातात. आणि त्यांची मुले ही आयुष्यात यशस्वी होतात.

  त्यामुळे पालकांनो जागे व्हा! असेच मी म्हणेन .  

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *