ब्युटी विथ ब्रेन

आजकाल मुलींचे शिक्षण ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले , महर्षी कर्वे ह्या लोकांचे थोर उपकार आहेत ह्या पिढीवर ! शिक्षणासाठी अजिबात त्रास सहन करावा लागला नाही सध्याच्या मुलींना. पाहिजे ते,पाहिजे त्या ठिकाणी आजकाल मुली मोकळेपणे शिक्षण घेऊ लागल्या आहेत .

खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यात मुलींचा सिंहाचा वाटा  आहे. कुठलेही क्षेत्र असो – मुली पुढे असतात.(इंजिनिरिंग , मेडिकल, एडुकेशन, डिफेन्स, इत्यादी ).  ह्या क्षेत्रात शैक्षणिक  पात्रता वेगवेगळ्या असणाऱ्या मुली (BE, MBBS, BArch, Pilot, )  वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणातून आलेल्या मुली, विविध वयोगटातील मुली, पत्नी, आई, सासू, बहीण, अशी विविध रोल पार पडणाऱ्या मुली आपापल्या नौकरीच्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडताना दिसतात. ह्याबद्दल अजिबात शंका नाही .

ह्यात मी काय नवीन माहिती सांगते आहे? हे सगळ्या जगाला ठाऊक आहे . म्हणूनच ह्या सगळ्या कर्तृत्ववान महिलांना आपण “ब्युटी विथ ब्रेन”असे विशेष शीर्षक देतो आणि त्यांचा सन्मान करतो. ब्युटी चा “ सौंदर्य “असा   शब्दशः अर्थ न घेता आपण “ तेज  “ असा घ्यायचाय . प्रत्येक शिक्षित स्त्री च्या चेहऱ्यावर तेज झळकत असते.

तिच्या बुद्धीने तेजस्वी बनलेला चेहरा तिच्यातील आत्मविश्वास वाढवतो . त्यामुळे ती सुंदर आहे कि नाही हे दुय्यम आहे ह्या ठिकाणी.

मला ह्याठिकाणी माझ्या आजीची गोष्टी सांगावीशी वाटते. ती म्हणायची, दिसायला साधारण जरी मुलगी असली आणि शिकलेली असली तर तिच्या बुद्धीची, ज्ञानाची झलक तिचा तेजस्वी चेहरा देतो. हेच खरे सौंदर्य! पण हल्लीच्या सौंदर्य स्पर्धांमधून चेहरा सुंदर असलेल्या तरुणींना बुटी विथ ब्रेन असा ‘किताब दिल्याने अनेक तरुण मुली भरकटत जातात. आणि स्वतःतील कौशल्य विसरून वरकरणी सौंदर्याच्या मागे लागतात.

अशा तरुणी ना हे सांगावेसे वाटते कि आपल्यातील कसब ओळखून निवड करा. सुंदर चेहरा हे कर्तृत्व नव्हे.

अर्थात हा दोष विचारांचा आहे. खूप समज स्त्री या जातीने पाळले आहेत. जसे उच्च शिक्षण म्हणजे नोकरी करणे जरुरी वगैरे. शिकल्याने ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते ह्या गोष्टी लक्षात न घेता निव्वळ अर्थार्जन करण्याचे माध्यम असे बघितले जाते आहे.

मला सांगा जेव्हा मल्हारराव होळकरांनी त्यांची सून अहिल्याबाई हिला शिकवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यामागे काय उद्देश होता ?. विद्या संपन्न करून मुलींनी समाजासाठी त्याचा वापर करावा . आपली घरातील कर्तव्ये सांभाळत समाज प्रगत करण्यासाठी झटावे हे उद्दिष्ट होते.ह्या कुठेही असे म्हटले नाही की घर , कुटुंब दुय्यम स्थानावर ठेवावेत. 

पण हल्लीच्या पिढीने फक्त शिक्षण = अर्थार्जन असाच मर्यादित अर्थ शोधला आहे. 

ह्याची सुरुवात शाळेतच होते. आताच्या शिक्षण पद्धतीत संस्कारित पिढी निर्माण करण्यापेक्षा परीक्षार्थी घडवण्याचे काम चालले आहे. त्यामुळे मुळातच ह्या विचारांनी प्रेरित होऊन मुली शाळेतून बाहेर पडतात.  मल्हारराव होळकरांनी जेव्हा समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षण कसे पुढची पिढी उत्तम घडवेल हे समजावून सांगितले ते किती शाळा आणि पालक आपल्या मुलींना किंवा  मुलांना सांगतात ? उलट मुलांची जबाबदारी नको किंवा ते करिअरच्या आड येतील म्हणून खूप मुली लग्नानंतर मुलं अनेक वर्ष( काही कधीच नकोत असेही म्हणतात).  होऊ देत नाहीत. हेय काय भावी पिढी निर्माण करणार मग?

बरं काही अपवाद सोडल्या तर पुष्कळ जणी पैशाची गरज नसताना , कुटुंबाची हेळसांड करत नोकरी करतात .

मला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे अशा मुलींनी आत्मपरीक्षण करावे. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण नक्की कोणाला करून देतो आहोत ? आपल्या मुलांना  ? समाजाला ? 

मला दोन उदाहरणं द्यावीशी वाटतात  . पहिले उदाहरण आहे जिजामाता यांचे. शहाजी भोंसले यांच्या कर्तृत्त्वान पत्नी आणि शिवाजीराजे यांच्या मातोश्री . जिजामाता यांच्या उदाहरणावरून आपण म्हणू शकतो की  सौंदर्य हा स्त्रीचा दागिना असू शकतो पण तिची बुद्धी , जिद्द , महत्वाकांक्षा ह्या सुद्धा तितक्याच आवश्यक आहेत  आणि स्वतः पुस्तकातील धडे न वाचताही शिवरायांना बालपणीपासून शौर्य , पराक्रम , देशप्रेम ह्या गोष्टीचे धडे त्यांनी दिले . आणि म्हणूनच शिवाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकले .येथे मला जिजामातांच्या ब्युटी विथ ब्रेन मधील ब्रेन चे दर्शन होते.

दुसरे उदाहरण आहे बहिणाबाई चौधरी यांचे. कुठले शिक्षण आणि कुठली शाळा हो ! खान्देशातील खेड्यात वाढलेली आणि आयुष्याच्या शाळेत शिकलेली हि अडाणी बाई थोर कवयित्री बनते. आपल्या कवितांमधून सरस्वती रेखाटते जे वास्तव आयुष्याचे जिवंत चित्र असते. येथे मला बुटी विथ ब्रेन मधील ब्युटी दिसते .

तुम्ही म्हणाल हा सगळा  काळाचा महिमा आहे . त्यावेळचा काळ वेगळा होता , काळाची गरज वेगळी होती . हे खरं  आहे . म्हणूनच आपण एक वर्तमानातील उदाहरण घेऊ या. ते म्हणजे सिंधुताई सपकाळ . हे नाव सगळ्यांच्या परिचयाचे आहे.पुनः एकदा आपल्या डिफाइन केलेल्या ब्युटी विथ ब्रेन ह्या कॉन्सेप्ट मध्ये न बसणाऱ्या सिंधुताई. उच्चशिक्षण , रूप ह्याचा अभाव असून आज लाखो निराधारांची असलेली ही  माता.काय शिकतो आपण ह्यातून ? काळानुसार समाजाची गरज बदलते आणि जर आपण उच्चशिक्षित आहोत, बुद्धिमान आहोत तर समाजाच्या प्रती कर्तव्य नक्की पार पडू शकतो. फक्त एकच हवे . तशी दृष्टी हवी. पण पहिल्या पोलीस ऑफिसर किरण बेदी, मेजर जनरल माधुरी कानिटकर,  इंजिनियर आणि इन्फोसिसच्या  चेअर पर्सन  सुधा  मूर्ती  असे काही अपवाद सोडता हल्ली तरुण मुली दिशाहीन होतायेत . काही खरंच स्वतःच्या पायावर उभ्या  आहेत , काही आर्थिक स्वातंत्र्य हवे म्हणून करिअर निवड करतायेत पण भौतिक सुख हे जास्त महत्वाचे अशी धारणा बाळगता आहेत.

ह्या  पिढीकडे बघून मला ब्युटी विथ ब्रेन ची व्याख्या आज नव्या अर्थाने सांगावीशी वाटतंय. प्रत्येक आई ही  ब्युटीफुल असते, प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी ही बुद्धिमान असते. 

फक्त आपली वैचारिक पातळी वाढवायची गरज आहे.  

All Mothers, Daughters, Sisters are BEAUTY WITH BRAINS! 

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *