जितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट
९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं झालं म्हणून त्यांनी पक्षांतर केले. २०१५ हिमंत बिस्वा शर्मा, २०२० ज्योतिरादित्य सिंदिया, २०२१ जितीन प्रसादा… इजा, बीजा आणि तिजा! आता फक्त सचिन पायलट राजस्थान निवडणुकांच्य आधी भाजपात आले की काँग्रेस चारो खाने चीत झाली असं म्हणायला हरकत नाही.
आता ह्या पक्षांतरा मुळे काय काय परिणाम होतील ते आपण बघू.
योगी आदित्यनाथ ह्याकडे काय दृष्टीनी बघतील?
भाजपचा फायदा काय?
ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी हे माहिती करून घेणे जरुरीचे आहे कि, हिंदी भाषिक राज्यांमध्ये, एकेकाळी काँग्रेस ब्राह्मणांची पार्टी होती आणि उत्तरप्रदेश तर अजूनही आहे. दुसरं हे कि,जितीन प्रसादा हे नुसते ब्राह्मण आहेत असं नाही, तर ते ब्राह्मण नेता म्हणून ओळखले जातात. तिसरं, उत्तरप्रदेश मध्ये जवळ जवळ ११% जनसंख्या हि ब्राह्मणांची आहे. शेवटचे म्हणजे, CSDS ह्या संस्थेच्या survey प्रमाणे, २०१४ मध्ये ७२%, २०१७ (UP assembly elections ) मध्ये ८०% आणि २०१९ मध्ये परत ८२% ब्राह्मण मतदारांनी भाजपला मतदान केले आहे.
हीच ब्राह्मण मते फोडण्याकरिता, मागच्या काही वर्षापासून जितीन, उत्तरप्रदेश मध्ये गावोगाव फिरून छोट्या मोठ्या ब्राह्मण नेत्यांना, ब्रम्ह चेतना मंच ह्या संस्थेला जोडत आहेत. जेव्हा कुख्यात गुंड, विकास दुबे encounter मध्ये मारला गेला, तेंव्हा सुद्धा त्यांनी उत्तर प्रदेश सरकार वर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आणि योगी आदित्यनाथ हे ब्राह्मण विरोधी आहेत असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला होता.
आता जितीन प्रसादाच भाजप मध्ये आल्यावर, जी काही थोडीफार ब्राह्मण मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती, ती जवळ जवळ नष्ट झाली आहे.
ह्यामुळे काँग्रेसला नुकसान किती?
उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस हा तिसऱ्या किंवा काही मतदारसंघांमध्ये तर चौथ्या क्रमांकांचा पक्ष आहे. आता अजून एक नेता सोडून गेला म्हणून ह्या पेक्षा अजून काय वाईट होणार? पण ह्या खेळी कडे वेगळ्या द्रुष्टीनि बघणं जरुरीचं आहे. जितीन सारख्या तरुण, राहुल आणि प्रियांकाच्या जवळचा आणि त्यांच्या पिढीच्या नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणे ह्यामुळे एक संदेश जनतेत जातो.
तो असा कि, तरुणांना आता काँग्रेस मध्ये वाव नाही. आणि हीमंता बिस्वा सर्मा आणि ज्योतिरादित्य सिंदिया, ह्या आधी काँग्रेस सोडून गेले आहेत हे आठवते. आणि हे सुद्धा आठवते, कि सचिन पायलट सारखा तरुण नेता काँग्रेस मध्ये असंतुष्ट आहे.(सचिन पायलट काल पासून दिल्लीत तहान मांडून बसले आहेत) कमालीची गोष्ट म्हणजे आसाम,मध्य प्रदेश आणि राजस्थान, ह्या तीन राज्य जिथे काँग्रेस सत्ते मध्ये किंव्हा नंबर दोनचा पक्ष आहे, आणि जिथून हे तीन नेते येतात तिथे गांधी घराण्याने कोणाला समर्थन दिले? अनुक्रमे,स्वर्गीय तरुण गोगोई, कमलनाथ आणि अशोक गेहलोत.
वयाची ७५ पार केलेली तिघेही, गांधी कुटुंबाचे जुने वफादार. आता ह्या तिघांमध्ये अशी काय खासियत कि जी तीन तरुणांमध्ये नाही? ती अर्थात हीच कि ते त्यांच्या वयामुळे राहुल गांधीशी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकत नाहीत! हे वरिष्ठ नेते आप-आपल्या राज्यात राहणार, राहुल गांधी केंद्रात. जेंव्हा कधी १० वर्षांनी, १५ वर्षांनी…२५ वर्षांनी सत्ता येईल तेंव्हा राहुलच पंतप्रधान होणार. नाहीतर त्यांची मुलं होतील. नाही, तर प्रियंका वाड्रांची मुलं! काँग्रेस मध्ये दशकं न दशकं हे असच चालत आलेलं आहे.
आता ह्यावर, मनमोहन सिंग १० वर्षे पंतप्रधान नव्हते का असे काँग्रेसचे समर्थक विचारणार. तर त्याच कारण,सोनिया गांधी वैधानिक अडचणी मुळे पंतप्रधान होऊ शकत नव्हत्या आणि राहुल अपरिपक्व होते हे आहे. आज वयाच्या त्रेपन्नवाय्या वर्षी सुद्धा ते युवा नेताच आहेत, तर त्या वेळला, अठरा वर्षे मागे काय अवस्था असेल विचार करा?
थोडक्यात काय, तरुण लोकांना काँग्रेस मध्ये वाव नाही हे जितीन प्रसाद यांच्या प्रवेशामुळे परत एकदा लक्षात आणून, काँग्रेस मधील तरुण नेत्यांच्या मनात शंका निर्माण करणे हा ह्या खेळीचा मोठा उपायोग आहे. आणि, राहुल-प्रियांका ह्यांना हि पडलेली ही एक राजकीय चपराक आहे.
ह्याचा संघटनात्मक दृष्टीने उत्तरप्रदेश मध्ये काय फरक पडेल?
संघटनात्मक दृष्टीने, ह्या मुळे दोन फरक पडतील. सगळ्यात पहिला असा, की उत्तरप्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ ह्यांचाच शब्द चालतो, हे जे एक चित्र निर्माण झाले होते, त्याला ह्या मुळे, केंद्रीय नेतृत्वाने तडा दिलेला आहे. आणि २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणूका योगी आदित्यनाथ आणि त्यांची युवा वाहिनी लढत नसून, २०१७ प्रमाणेच भाजपचे केंद्रीय संघठन लढत आहे हि गोष्ट स्पष्ट होईल.
मला नाही वाटत ह्यपेक्षा जास्त ह्यामधून भाजपला २०२२ च्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमध्ये काही अपेक्षित आहे. अजून एक छोटासा फरक म्हणजे, उत्तरप्रदेश मधील भाजप ब्राह्मण विरोधी आहे, हा अपप्रचार करणं काँग्रेसला जवळजवळ अशक्य होणार आहे.
दुसरी लाट!
राजकीय नेत्यांनी आपली पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे ह्यात काही नवीन नाही. उगाच नाही, नेत्यांना आया राम, गया राम म्हणत. मागच्या काही वर्षात, एक Communists सोडले तर सगळ्याच पक्षांमधून राजकीय नेते भाजप मध्ये सामील झाले आहेत. ह्याला काँग्रेस पण अपवाद नाही. पण हे जे राहुल गांधींच्या पिढीचे नेते, एक एक करून काँग्रेसला राम राम करत आहेत, त्याच्या मागे एक इतिहास आहे.
राहुल गांधीच्या उदया पासून ज्यानि काँग्रेसचा त्याग केला आहे ती यादी मोठी आहे. ममता बॅनर्जी, जगन मोहन रेड्डी, रिटा बहुगुणा जोशी, हिमंत बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य सिंदिया आणि आता जितीन प्रसादा. आता ह्यात तुम्ही नाराज नेत्यांची नावे जोडा – सचिन पायलट, मिलिंद देवरा, संजय निरुपम; आणि चित्र किती भीषण आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळे नेते, १०-१५-२० वर्षे मागे आमदार-खासदार होते. २०१४ च्या मोदी लाटे मध्ये ह्यातल्या काहींची राजकीय कारकिर्द्ध बुडाली. उरलेल्यांची २०१९ मध्ये.
आणि ह्या करता हि मंडळी राहुल गांधींना जबाबदार मानतात. त्यांची अपेक्षा, इंदिरा गांधी किंवा राजीव किंवा काही प्रमाणात सोनियाजींच्या काळात जसे ते निवडून येत, तसे राहुलच्या काळात सुद्धा झाले पाहिजे. आणि तसे होत नसेल तर राहुलने पार्टीची कमान दुसऱ्या कोणाला द्यायला काय हरकत आहे? अपेक्षा तशी बरोबरच आहे. ४४ आणि ५२ जागा निवडून आल्यानंतर काय होणार?
आणि हि अपेक्षा ज्या नेत्यांची आहे ती अश्या नेत्यांची दुसरी लाट आहे! ह्या आधी ३ दशकं मागे, राजीव गांधींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, हीच अपेक्षा, माधवराव सिंधिया,(ज्योतिरादित्य चे पिता), राजेश पायलट (सचिन चे पिता), YS रेड्डी (जगन चे पिता), मुरली देवरा (मिलिंद चे पिता) आणि जितेंद्र प्रसादा (जितीन चे पिता) ह्यांची असली पाहिजे! त्याला मी पहिली लाट म्हणतो. पण त्यावेळी पी वी नरसिंहराव यांना काँग्रेस अध्यक्ष आणि नंतर पंतप्रधान करून हि लाट आटोक्यात आणली असं म्हणावं लागेल. नरसिंहराव यांच्या सरकार मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग होते हे विसरून चालणार नाही.
तर ह्या पाच पैकी, अनाकलनीय पणे, ४ नेत्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात जितेंद्र प्रसादा,पण होते. त्यांचं नाव मुद्दामून घेण्यामागे कारण हे आहे कि, ते सोनिया गांधी विरुद्ध काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये लढले होते.
इथे एवढ्या मोठ्या नेत्यांच्या अपघाती मृत्यूचा सुद्धा शोध करावा असं कोणालाच वाटत नाही हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. असो, तो आजचा विषय नाही.
तर थोडक्यात काय, सोनिया गांधीन विरुद्ध उठलेली बंडाची पहिली लाट येनकेन प्रकारेण संपली किंवा संपवली म्हणा. अर्थात त्यावेळी दुसरे राजकीय पर्याय नव्हते. आणि मोदी-शाहची भाजप पण नव्हती. पण आज परिस्थिती बदलेली आहे. कोणताही गांधी हा स्वतःच्या बळावर फारशी मतं खेचून आणू शकत नाही आणि समोर भाजप सारखा पर्याय उभा आहे. त्यामुळे परत आपल्या पायावर उभं राहण्याकरता, काँग्रेसला स्थानीय नेतृत्वाची(जसं कि Capt. Amrinder सिंग) गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर राहुल-प्रियांका भानावर आले नाही, तर हि दुसरी लाट काँग्रेसला बुडवेल ह्यात शंका नाही.