मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा – उर्मिला

आजपासून मी आपल्याला मला भावलेल्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांपैकी काही व्यक्तिरेखा बद्दल लिहिणार आहे. ह्याची सुरुवात मी रामायणातील मला, सीते इतकेच महान वाटणारे, पण दुर्लक्षित ठेवली गेलेले व्यक्तिमत्व, “उर्मिला” हिच्या पासून करते आहे. 

उर्मिलेची,सर्वश्रुत असलेली ओळख, म्हणजे लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण. पण माझ्या करता, उर्मिला एक आदर्श बहीण होती, आदर्श पत्नी होती,आदर्श सून पण होती! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आदर्श ऍडमिनिस्ट्रेटर होती. चला तर मग जाणून घेऊ तिच्या विविध छटा! 

आदर्श बहीण

उर्मिला जनक राजाची मुलगी आणि  सीतेची बहीण होती. उर्मिला सीते पेक्षा एक वर्षाने लहान  होती. जनक राजास यज्ञासाठी जमीन नांगरताना सापडलेली भूमिपुत्री सीता. “जनक” राजाची मुलगी  म्हणजे “जानकी” खरं तर उर्मिला, पण जानकी म्हणून गौरवले गेले सीतेला ; जी जनक राजाची दत्तक कन्या होती. पण उर्मिलेने ही गोष्ट सीतेला कधीही जाणवू दिली नाही. 

उर्मिलेचा मनाचा मोठेपणा इतका की तिने कधीही मनात हेवा दावा न बाळगता, सीतेवर जीवापाड प्रेम केले.  “मैथिली” म्हणजेच ‘मिथिला’ नगराची राजकन्या खरं तर उर्मिला; पण तोही मुकुट, सीतेच्याच मस्तकी. उर्मिलेला ह्या गोष्टीचा अंदाज होता की सीता एक असामान्य शक्ती, दैवी शक्ती असलेली स्त्री आहे. त्यामुळे लोभ, मत्सर ह्यासारख्या भावना कधी उर्मिला आणि सीता या दोघींमध्ये आल्या नाहीत. 

लक्ष्मणाची आदर्श पत्नी 

उर्मिला, सीतेच्या स्वयंवरा आधीपासून लक्ष्मणाच्या प्रेमात होती! लक्ष्मण देखील प्रेमाने उर्मिलेला “ मिला “ असे म्हणत असे. पण असे असूनसुद्धा आपण तिच्याशी लग्न केले तर तिला दुरावून बसू असे लक्ष्मणास वाटे. आणि तसे त्याने उर्मिलेला सांगितले देखील. कारण लक्ष्मणासाठी “ राम ” हेच सर्वस्व होते. लक्ष्मणाचे आयुष्य रामासाठी अर्पण केलेले होते. एवढेच नव्हे तर मी तुला खुश ठेऊ शकणार नाही कारण तू आणि राम ह्या दोघात मी रामाची निवड केली आहे असे लक्ष्मणाने उर्मिलेला स्पष्ट सांगितले होते. 

ह्यामुळे एखादी दुसरी मुलगी खचली असती, दुख्खी झाली असती.  पण उर्मिलेचा लक्ष्मणाविषयी असलेला आदर आणखी वाढला आणि तिने हे सगळे हसत हसत मान्य केले. कारण तिचा आपल्या प्रेमावर विश्वास होता. आपला पती कधीही राजा होऊ शकणार नाही हे तिने केव्हाच जाणले होते पण त्याने ती उदास झाली नाही.

आणि लग्नानंतर रामाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी जेव्हा  कैकयी, तिचा डाव,भरत ह्यास राज्य, १४ वर्षे दंडकारण्यात  रामाला वनवास  ह्या गोष्टी एका मागोमाग समोर आल्या, तेव्हा उर्मिला कणखरपणे परिस्थितीला सामोरी गेली. सीतेस आधार दिला तिने. आणि खरी उर्मिला तर तेव्हा दिसली जेव्हा लक्ष्मणाने वनवासात रामाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि वळून उर्मिलेकडे पाहिले देखील नाही. नववधू असलेली उर्मिला, सीतेप्रमाणेच पतिप्रेमासाठी अधिकार असताना आपले मन, भावना मारून कर्त्यव्य निभावण्यास सज्ज झालेली उर्मिला! 

काय वाटत असेल तिला ? रामाबरोबर वनवासात जाणारी आपली बहीण सीता,आपला पती लक्ष्मण आणि ह्यांना निरोप देणारी एकाकी झालेली उर्मिला!   

आदर्श सून  

इकडे अयोध्या नगरीत दुख्खाची अवकळा पसरली. राजा दशरथ पार कोसळले. माता कौशल्येच्या दुःखाला पारावार उरला नाही. उर्मिला हाच त्यांचा मानसिक आधार होती. दिवसेंदिवस खालावत जाणारी राजा दशरथाची तब्येत,त्यांची काळजी घेणे हे सगळे एकटी नवीन आलेली उर्मिला करत होती.आणि  तेही अशा वातावरणात जिथे मंथरा कैकयी चे रोजचे नवनवीन डाव  चालू राहत.

राजा दशरथाने अन्नपाणी त्यागले .दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती. ह्यात उर्मिला पूर्णपणे त्यांची औषधं आणि सुश्रुषा करत होती. कैकयीला समजावत होती की आपला निर्णय बदल, रामाला परत बोलाव.पण काही उपयोग झाला नाही आणि दशरथ राजाने प्राण सोडले. 

आदर्श आणि धूर्त  ऍडमिनिस्ट्रेटर

अयोध्येचे सिंहासन रिक्त होते. कैकयी आपला पुत्र भरत ह्याचे राजा बनण्याच्या तयारीत होती तर इतर दोघी राण्या दशरथाच्या मृत्यूने दुःखाच्या सागरात बुडून गेल्या होत्या. ह्यात मंत्रिमंडळातील मंत्री राज्यावर शत्रूने वार केला तर अपेक्षेने फक्त उर्मिलेकडे बघत होते.

प्रजेला आपला कोणी राजा नाही, आपल्या व्यथा आता कोण ऐकणार , कोण आपला तारक आता रामाच्या मागे , आपल्या अडचणी कोण सोडवणार असे प्रश्न पडू नये याची पूर्ण काळजी उर्मिला घेत होती.शत्रूने सुद्धा उर्मिलेच्या उपस्थितीत आक्रमण करण्याचे धाडस केले नाही. अशा तऱ्हेने अयोध्या नगरी रामाच्या वनवास काळात उर्मिलेमुळे सुरक्षित होती. 

समजूतदार मोठे मन

उर्मिलेकडे फार मोठे मन होते. एखाद्या घटनेकडे बघण्याची अद्वितीय दृष्टी होती. म्हणूनच लक्ष्मण जेव्हा रामाबरोबर १४ वर्षाच्या वनवासास निघाला, तेव्हा उर्मिलेला त्याचा अभिमान वाटला. उर्मिला ह्या घटनेबद्दल असं  म्हणते की राम १४ वर्षासाठी एक लढाई लढण्यास जातो आहे आणि त्या युद्धात आपला पती लक्ष्मण सैनिक म्हणून जात आहे.  आणि सैनिकांबरोबर त्यांच्या पत्नी युद्धभूमीवर जात नाहीत तर मागे राहिलेल्या नात्यांची देखभाल करतात. आणि हसत मुखाने पतीच्या विजयाची प्रतीक्षा करतात.

एवढेच नव्हे तर कैकयीच्या कृत्यामागे दासी मंथरेचा हात आहे, हे उघडकीस आणून ती मंथरेला अयोध्येतून सर्वानुमते हाकलून लावते. त्याबरोबरच कैकयी आपली राणी आहे, तिला क्षमा करून सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा असे सांगते. भरत कैकयीला आई म्हणून त्यागतो.  ह्यापेक्षा अजून मोठी शिक्षा कैकयीला काय करणार म्हणून सुमित्रा, कौसल्या, ह्या राण्याना समजावते. आणि संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आणते.

तिन्ही राण्या, शत्रुघ्न, त्याची राणी, भरताची राणी इत्यादी, ज्या कैकईमुळे उर्मिलेचा पती लक्ष्मण रामाबरोबर जातो आणि पर्यायाने उर्मिलेपासून दूर त्या कैकयीला उर्मिला दुसरी संधी देते. किती हे मोठं मन!

ह्या झाल्या मला दिसलेल्या उर्मिलेमधील विविध छटा ! 

आपण प्रत्येक जण आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतो. आई, पत्नी, मुलगी, बहीण, सून… वेळोवेळी एका भूमिकेतून निघून दुसऱ्यात शिरणे अवघड असते, पण अशक्य नाही. ऊर्मिलेने ह्या सगळ्या खुबीने निभावल्या! 

पुढच्या लेखात आपल्या इतिहासातील असेच एक गुणवान स्त्री व्यक्तिमत्व तुमच्या समोर आणायचा प्रयत्न आहे. 

 

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *