अभिमान स्थळ – ‘भीमबेटका’

भारताच्या प्राचीनतेचं, स्थापत्य आणि संरचनात्मक वैभव अंगप्रत्यंगांवर वागवणारी स्थळं या भूमीच्या काना कोपऱ्यात आढळतात. यात प्रामुख्यानं वेगवेगळ्या शैलीची मंदिरं आहेत, लेणी आहेत आणि इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या कर्मभूमीही आहेत. भारतीयत्वामुळे आलोकित झालेल्या संस्कृती जिथे जिथे नांदल्या तिथे तिथे इतिहास घडला. ज्ञानाच्या अखंड प्रवाहाला वेगवेगळी वळणं देणाऱ्या या स्थळांची माहिती आणि महती भारतीय म्हणून आपल्याला असायलाच हवी. त्यातून दैदिप्यमान इतिहासाला उजाळा मिळतो, राष्ट्राविषयी जाज्वल्य अभिमान जागृत होतो आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळते. म्हणून ही ‘अभिमान स्थळं’ प्रत्येक भारतीयानं आपल्या हृदयात मिरवायला हवीत.

२०१९ हे वर्ष भारतमहर्षी  पद्मश्री डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर यांचं जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. मानवी संस्कृतीची जडणघडण या भूमीत प्राचीन कालापासून होत होती हे सिद्ध करण्यासाठी लागणारा भक्कम पुरावा या मनस्वी कलावंत विद्वानानं जगासमोर ठेवला आणि भारताच्या प्राचीनत्वाची ओळख साऱ्या जगाला पटली. 

भीमबेटकाचे प्रवेशद्वार       

                                                                     

‘हा प्रसंग आहे १९५६ चा. मी भोपाळहून इटारसीला जाण्यासाठी आगगाडीच्या डब्यात बसलो. गाडीनं जेमतेम भोपाळ सोडलं होतं. खिडकीतून मला काही टेकड्या दिसल्या. आतून एक ऊर्मी जाणवली की इथे या टेकड्यांच्या उदरात इतिहास दडला आहे. मला तिथे जायलाच हवं. मी सहप्रवाश्यांना विचारलं की तिथे कसं जातात. ते म्हणाले की त्यांना माहिती नाही. मनात हुरुहुर कायम होती. इतक्यात कोणीतरी साखळी ओढली आणि गाडीचा वेग कमी होताच काही प्रवाशांनी सामानासकट उडी मारली. मलाही काय झालं कोणास ठाऊक, मीही माझं सामान उचललं आणि गाडीतून खाली उडी घेतली. सारं अंग ठेचकाळलं, चेचलं गेलं, पण त्याचं भान मला नव्हतं. मी सामान गोळा केलं आणि टेकड्यांच्या दिशेनं निघालो. रस्ता असा नव्हताच. रानटी झुडुपांचे काटे, अणकुचीदार दगड आणि वेडावाकडा भूभाग. मी त्या टेकड्यांपर्यंत कसा पोहचलो ते माहित नाही. पण पहिल्या गुहेत दाखल होताच मला भिंतीवर आदिम चित्रं चितारलेली दिसली.’ वाकणकर आपल्या एका मुलाखतीत तो प्रसंग सांगतात.‘और उस के बाद करीब १५ वर्षों तक मैं वहाँ जाता ही रहा!’ 

चुनखडीचा वापर करून काढलेला प्राण्यांचा कळप

असं काय आहे या टेकड्यांच्या कड्याकपारीत, ज्याचा मोह वाकणकरांना पुन्हा पुन्हा पुकारत होता. या प्रश्नाचं उत्तर डेव्हिड व्हीत्ली या संशोधक लेखकाच्या ‘हँडबुक ऑफ रॉक आर्ट रिसर्च’ या पुस्तकात सापडतं. तो लिहितो – ‘Bhimbetka (Madhya Pradesh), not far from Bhopal, has one of the largest clusters of painted rock art shelters in the world: 1,700 shelters within the range of  9 km. या ठिकाणी असलेल्या विविध शैलचित्रांचा वैभवशाली साठा, मध्यपाषाण युगीन ते उत्तर पाषाण युगीन मानवी वस्तीत होणाऱ्या सामाजिक घडामोडी, यशोगाथा, बौद्धिक विकास, धार्मिक संकल्पनांची जडणघडण आणि भौतिक विकासाचे टप्पे इत्यादि पैलू प्रकाशित करतो

जगाच्या पाठीवर अश्मयुग (१लाख ५०हजार वर्षांपूर्वी) पासून  ते ३शे वर्ष जुन्या गोंड राजवटीपर्यंत अखंडित, निरंतर मानवी वस्ती असलेलं एकमेव ठिकाण म्हणजे भीमबेटका. रॉकशेल्टर म्हणजे शैलाश्रय, खडकांच्या आश्रयाला राहणारी मध्याश्मयुगीन आदिम मंडळींनी खडकांच्या सपाट जागांवर चित्रं काढली आहेत. 

या साऱ्या गुंफाचित्रांत रंगाच्या एकूण १६ छटा सापडल्या आहेत. रंग कालवण्यासाठी कवटी किंवा शहामृगाच्या अंड्याचं टरफल वापरण्यात येई. त्यात गेरू, चुनखडी आणि हिरव्या गारगोटीची वस्त्रगाळ भुकटी पाण्यात, प्राण्यांच्या चरबीत, हाडांच्या मगजात किंवा अंड्याच्या पांढऱ्या बलकात कालवत. रंगवण्यासाठी प्राण्यांच्या कातडीचे केस, विशेषतः खारीच्या किंवा डुकराच्या शेपटीचे केस वाळलेल्या काडी किंवा काटकीला बांधून, खोलगट दगडात चरबीत बुडवलेल्या शेवाळ्याची किंवा वेलींच्या रेशाची वात करून पेटवलेल्या ज्योतीच्या प्रकाशात हे सगळे चितारकाम चाले. यातलं सर्वात जुनं चित्र ३० हजार वर्षांहून जुनं असल्याचं मान्य करण्यात आलं आहे.  

स्थानिक लोकांत या स्थानाची किंवदंती खूप प्रसिद्ध आहे. वनवासात असताना पांडव या जागेच्या आसपासच्या रानात वास्तव्यास होते. दुपारच्या वेळी महाबली भीम या शैलाश्रयात येऊन बसायचा म्हणे म्हणून या जागेचं नाव ‘भीम बैठिका’ पडलं आणि अपभ्रंश होता होता त्याचं झालं ‘भीमबेटका’ 

आजूबाजूला घनदाट माजलेलं रान मध्येच भले मोठे वेडेवाकडे पसरलेले खडक त्यांच्यातून जाणारी वाट, आणि त्या खडकांच्या उभ्या कडे-कपारींवर मांडलेली आदिम चित्रांची नैसर्गिक विथिका (आर्ट गॅलरी).  

या चित्रांचा विषय म्हणजे तिथे राहणारा माणूस आणि त्याच्या सभोवताली राहणारे प्राणी. पशुपालनाच्या एका विशिष्ट अवस्थेत असताना चुनखडीचा वापर करून जंगली पशू कसे माणसाळावायचे याचं चित्रण केलेलं आहे. तर एका ठिकाणी शिकार करताना घडलेली एक घटना – रानगाय तिच्या मागून जाणारं तिचं वासरू आणि त्यांच्या मागे धनुष्यबाण घेतलेला माणूस, शिकारीनंतर मोठ्या जनावराचं धूड काठीवर बांधून घेऊन जाणारी शिकारी टोळी चितारली आहे. एका कातळावर एकमेकांच्या कमरेत हात घालून नाचणारी चमू आहे तर दुसऱ्या ठिकाणी पाल, विंचू, खेकडा, खार, मोर, शहामृग काढलेले आहेत. भारतीय भूमीवर शहामृग होता आणि काळाच्या प्रवाहात तो लुप्त झाला याचाही एक पुरावा इथे मिळाला आहे. कोरीवकाम केलेले शहामृगाच्या अंड्याच्या कवचाचे तुकडे इथे सापडले आहेत आणि त्यांचा काळ २५ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं मानण्यात येतं. 

वाशिंड असलेल्या रानगायींचा मोकाट सुटलेला कळप असो किंवा मासेमारी करणारी माणसं असो की तांत्रिक अनुष्ठानं करणारा / री ओझा असो, ही सारी आदिमांच्या विश्वातली मंडळी. सर्वात गमतीदार चित्रण आहे ते एका शिंगवाल्या रेड्यानं एका माणसाच्या केलेल्या पाठलागाचं. माणसाच्या मानानं भीमकाय असणारा रानरेडा, त्याचं ते प्रचंड मोठं तोंड, त्यातून निघणारा डूरकण्याचा आवाज, शिंगांपेक्षा वेगळे काढलेले त्याच्या मानेवरचे ताठरलेले केस, शेपटी, त्याचं अजस्र शरीर हे सारं स्पष्ट रंगवलेलं आहे. 

त्यानंतरच्या काळातली चित्रं म्हणजे एक प्रमाणबद्ध डौलदार शुभ्र घोडा कोण्याएका अज्ञातानं रंगवला आहे. कोणी हत्तीवर स्वार होऊन भाला घेतलेले लोक काढले आहेत. युद्धाचा प्रसंग ठळकपणे दिसतो तशीच एका लग्नाची वरातही चितारली आहे. 

कर्मकांड करणारा/री ओझा

                                                                                     

एकूण भारतीय संस्कृतीच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे आपल्या अंगा खांद्यांवर मिरवणारी भीम बेटक्याची शैलाश्रयं. 

खरं म्हणजे इसवीसन १८८८ मध्ये डब्ल्यू किंकेड नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं काही आदिवासी लोकांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित एका शोधपत्रात ‘भीमबेटका’ या स्थानाचा उल्लेख केला होता. पण त्याचं पुरातनत्व सिद्ध करण्याचं संशोधनात्मक कार्य मात्र पद्मश्री डॉ. वाकणकरांनी केलं.   

 गेरू वापरून रंगवलेला माणसाचा पाठलाग करणारा रानरेडा

साधारणपणे १९७०च्या दशकात भीमबेटका शैलाश्रयाचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व साऱ्या जगानं मान्य केलं. त्यावर झालेल्या संशोधनातून त्याच्या आसपास ७५० हून अधिक शैलाश्रये शोधण्यात यश मिळालं आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या नोंदीनुसार या परिसरात केलेल्या उत्खननात पुराश्मयुगीन, मध्याश्मयुगीन आणि उत्तर पाषाण युगीन मानवांनी तयार केलेल्या दगडी हत्यारं सापडलीत, ताम्रपाषाण युगीन, लोहयुगीन आणि त्यानंतरच्या काळातही इथे मानवी वस्ती होतीच. त्या व्यतिरिक्त शुंग आणि गुप्त काळात प्रचलित असलेल्या ब्राह्मी लिपीत लिहिलेले तसेच शंख लिपीतले शिलालेखही इथे सापडले आहेत. 

चुनखडी वापरून रंगवलेला घोडा

या ठिकाणी जगातली सर्वात जुन्या दगडी भिंती आणि फरसबंदी आढळते असाही उल्लेख आढळतो. सन १९९० मध्ये भीमबेटका आणि सभोवतालचा १८९२ हेक्टरचा परिसर भारत सरकारनं भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत सुरक्षित केला. सन २००३ मध्ये युनेस्कोनं भीमबेटकाला ‘वैश्विक वारसा स्थळ’ घोषित केलं, तेव्हापासून जगाच्या नकाशावर भीमबेटका आणि सभोवतालच्या परिसराचं जागतिक महत्त्व वाढलं आहे. देशोदेशीचे मानववंशशास्त्री, इतिहास आणि संस्कृतीअभ्यासक, मानवी कलेच्या इतिहासाचे अभ्यासक, पुरातत्त्वशास्त्री, भूगर्भशास्त्री संशोधक इथे वेळोवेळी अभ्यास करण्यासाठी येत असतात.    

साऱ्या जगाला मानवी विकासाचा कालबद्ध आलेख सादर करणारं आणि भारतीय कलाविश्वाचं उगमस्थान असलेलं भीमबेटका हे भारताच्या हृदयस्थानी म्हणजे मध्यप्रदेशात असलेलं प्रत्येक भारतप्रेमीनं जायलाच हवं असं अभिमान स्थळ !!                                                     

                                                      

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *