हिंदू सणांचे महत्त्व
आपल्या सगळ्यांना ब्रम्हांडातील अद्भुत कथा माहित असेलच. ती म्हणजे चंद्र, दक्ष राजा, रोहिणी आणि इतर नक्षत्र. आपण थोडक्यात बघू काय ते. चंद्राच्या २७ पत्नी म्हणजे दक्ष राजाच्या कन्या होय. पण चंद्राची आवडती पत्नी होती फक्त रोहिणी आणि यामुळे दक्ष राजा चंद्रावर क्रोधीत होतो की आपल्या एका मुलीवर चंद्र जास्त प्रेम करतो आणि बाकी २६ मुली त्याच्या प्रेमापासून वंचित राहतात. म्हणून तो त्याला शाप देतो की चंद्राचा आकार हळूहळू लहान होत जाईल आणि तो नाहीसा होईल पण चंद्र शिवाची आराधना करतो आणि शिव त्याला मदत करतात. ज्यामुळे चंद्र हळू हळू लहान होत जातो १५ दिवस आणि नंतरपुढचे १५ दिवस पुन्हा हळू हळू त्याच्या कला वाढत जातात. ह्यालाच आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात. आणि ज्यादिवशी चंद्र गोलाकार मोठा असतो त्याला पौर्णिमा म्हणतात आणि बारीक कोर असेल चंद्राची तो दिवस अमावास्या म्हणतात.
ह्या बदलांना खगोलशास्त्रीय बदल म्हणतात. म्हणजेच चंद्र, सूर्य, ग्रह, तारे ह्यांची स्थिती. आणि त्यावरून आपले कॅलेंडर आणि पंचांग लिहिले गेले आहे. आपल्या पंचांगात तिथी, वार, महिना, नक्षत्र आणि बदलत्या ऋतूंवर आधारित सण ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आपली प्राचीन भारतीय संस्कृती आध्यात्म प्रवण होती. जीवनाला अध्यात्म, भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्वच सणांना पौराणिक कथाकल्पना व दैवते यांची जोड दिली आहे. त्यामुळे प्रत्येक सण श्रद्धा, व्रत, नैवैद्य या धार्मिक भावनेने साजरा केला जातो. जसे कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्री, होळी, दिवाळी इत्यादी. जसे काही दिवसात गणपती, गौरी येणार. गौऱ्या/महालक्ष्म्या दोन का असतात? त्यांच्या समोर कोण मुले असतात?
ज्येष्ठा लक्ष्मी / गौरी – विद्या (अध्यात्मिक ज्ञान)
कनिष्ठा लक्ष्मी / गौरी- अविद्या (भौतिक / अधिदैविक ज्ञान)
ज्येष्ठेसमोरचा मुलगा – ज्येष्ठेचा मुलगा/फळ – अमृत (मोक्ष)
कनिष्ठेसमोरची मुलगी – कनिष्ठेची मुलगी / फळ – समृद्धी (भौतिक)
ईशावास्य उपनिषद :
“यः विद्यां च अविद्यां च तत् उभयं सह वेद अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते ॥”
“विद्या आणि अविद्या दोघींची उपासना करा. अविद्येच्या सहाय्याने मृत्यूतुल्य संकटांवर मात करा. विद्येच्या सहाय्याने अमृततत्व (कैवल्य/मोक्ष) प्राप्त करा. जो फक्त अविद्येच्या मागे लागतो तो घनघोर अंधकारात पडतो. आणि जो फक्त विद्येच्या मागे लागतो तो त्याहून मोठ्या घनघोर अंधकारमय दरीत पडतो. त्यामुळे अध्यात्मासोबत भौतिकाची सुद्धा उपासना करणे आवश्यक”
तसेच प्रत्येक सणाचा नेवैद्य हा ऋतूप्रमाणे बदलतो. म्हणजेच विशिष्ट ऋतूत विशिष्ट आहार प्रत्येकाने घ्यावा हा त्यामागील उद्देश. जसे गुढीपाडव्याच्या दिवशी उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कडुनिंबाचा पाला प्रसाद म्हणून सेवन केला जातो. मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि तिळगुळाचे थंडीपासून रक्षण करण्यासाठीं सेवन केले जाते. आता सणांचे वैज्ञानिक महत्त्व बघू. होळीच्या दिवशी पेटलेले लाकूड फॉस्फरस बाहेर सोडते, ज्यामुळे पर्यावरण शुद्ध होते. त्याप्रमाणेच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा, हे, झाडे लावल्याने आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो याचे द्योतक आहे. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. आणि दिवाळीत वसुबारसेला गायीची. प्राण्यांची हत्या करू नये त्यांची जपणूक करावी. हेच ह्यामागील महत्व. नारळीपौर्णिमेला जल देवतेचे पूजन केले जाते म्हणजेच निसर्ग पूजन.
गणेशोत्सव आणि नवरात्री सारखे सण सामाजिक मेळाव्यांमधून एकमेकांमधील प्रेम भाव वाढवतात.
आपले सण मनुष्याला जगण्याचे उद्दिष्ट देतात म्हणजेच पर्पज ऑफ लाइफ देतात. ज्यामुळे नैराश्य येत नाही. जिथे संस्कृतीची संस्कारांची कमतरता असते तिथे आत्मघातकी विचार, हिंसक विचार उदयास येतात.
स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत, एका विद्वानाने भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य विचारले असता, ते म्हणाले, आमची कुटुंब व्यवस्था हेच आमचे वैशिष्ट्य. आणि आपले सण ही कुटुंबव्यवस्था जपण्यास मदत करतात.
थोडक्यात आपले भारतीय सण संस्कृती, विज्ञान आणि परंपरा ह्यांचा सुरेख त्रिवेणी संगम आहे.