मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा – शकुंतला

मागील लेखात मी वरील शीर्षकाखाली लिहिलेली पहिली स्त्री व्यक्तिरेखा होती ती म्हणजे “उर्मिला”. आज आपण दुसऱ्या क्रमांकावरील व्यक्तिरेखा बघू “शकुंतला”. 

शंकुतला म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर येतं ते महाकवी कालिदासांचं अजरामर काव्याचं नाट्य रूपांतर “अभिज्ञान शाकुन्तलम”. हे एक संस्कृत मधील मधुर असं काव्य म्हंटलं जातं. कालिदासांनी अधिक बारकावे दाखवण्याकरिता ह्या काव्याला खूप भावनाप्रधान करण्याचा प्रयत्न केलाय. खूप प्रणय आणि तळमळ दाखवली गेली आहे. 

पण दुष्यन्त राजाच्या प्रेमिके पलीकडेही तिचं व्यक्तिमत्व होतं हे व्यासांच्या महाभारतात लक्षात येतं. कसं ते बघू या.

शकुन्तलेच्या जन्माचे रहस्य  

देवांचा देव इंद्र ह्याला जेव्हा विश्वामित्र ऋषी घोर तपश्चर्या करून आपल्या पेक्षा श्रेष्ठ होतील की काय अशी भीती वाटू लागते तेव्हा ते अप्सरा मेनका हिला त्यांची तपश्चर्या भंग करण्या करता पाठवतात. आणि मेनका आपल्या कार्यात सफल होते. ते दोघं बरेच दिवस एकत्र घालवतात आणि त्यातूनच नवीन जीव जन्म घेतो. मेनकेचे ध्येय सफल झाल्यानंतर ती त्या बाळास नदीच्या किनारी सोडून स्वर्ग नगरी परत जाते. त्या नवजात मुलीची काळजी पक्षांचा थवा घेतो. ते आपल्या पंखांखाली बाळाचे जंगली जनावरांपासून रक्षण करतात. कालांतराने ऋषी कण्व तिथे येतात. पक्षी त्यांच्याशी वार्तालाप करतात आणि हकीकत सांगतात. संस्कृत मध्ये पक्षांच्या थव्याला शकुंत म्हणतात म्हणून त्यांनी शकुंतनी सांभाळलेली म्हणून शकुंतला असे ह्या बाळाचे नामकरण होते आणि कण्व ऋषी तिला आपल्या आश्रमात घेऊन येतात आणि जन्मदाता नसले तरी शकुंतलेचा बापाच्या मायेने सांभाळ करतात.

दुष्यन्त शकुंतला भेट   

शकुंतला आश्रमात हळूहळू मोठी होऊ लागते. एकदा पुरु वंशातील राजा दुष्यन्त आपल्या सैनिकांबरोबर शिकारीला गेला असता जंगलात मार्ग चुकतो आणि कुठे मनुष्य वस्ती दिसते का हे बघत शोधात असताना त्याची नजर मालिनी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सुंदर आश्रमावर पडते. हा ऋषी कण्व यांचा आश्रम असल्याचे तो पटकन ओळखतो आणि त्यांच्या भेटीसाठी तो आपले सगळे अलंकार काढून सामान्य नागरिकांप्रमाणे आश्रमात प्रवेश करतो. तिथे ऋषी तर भेटत नाही पण शकुंतला भेटते; जिच्या अवघ्या दर्शनाने, सौंदर्याने दुष्यन्त भान हरपून बसतो.ऋषी कण्व यांची मुलगी आहे ही हे कळताच तो शकुन्तलेला लग्नाची मागणी घालतो. आपले वडील येतील तू वाट पाहावीस असं  शकुंतला दुष्यन्तास सांगते पण गांधर्व पद्धतीने लग्न योग्य आहे हे तिला पटवले जाते. हा खूप मोठा निर्णय आहे आणि वडीलांची मान्यता कशी आवश्यक आहे हे तिने सांगूनही दुष्यन्त आम्हा क्षत्रियांसाठी आपण स्वतः स्वतःचा निर्णय घेणे कसे योग्य आहे हे तो समजावून सांगतो. अखेरीस शकुंतला एका अटीवर तयार होते, ती म्हणजे दुष्यन्ताने तिला वचन द्यावे की शकुंतलेचाच मुलगा केवळ त्याच्या राज्याचा वारस होईल. दुष्यन्त त्वरित ती अट मान्य करतो विचार न करता. दोघांचा गांधर्व विवाह पार पडतो आणि दुष्यन्त शकुन्तलेला मी लवकरच तुला घेऊन जाईन आपल्या महालात असे बोलून निघून जातो.

शकुन्तलेस पुत्ररत्न 

जेव्हा कण्व ऋषींना शकुंतला आणि दुष्यन्त विवाहाचे कळते तेव्हा ते खुश होतात आणि म्हणतात की शकुंतलेची निवड योग्य आहे. ती अजूनही आश्रमातच दुष्यन्ताची वाट बघत राहत असते. काही महिन्यांनी शकुंतला एका बाळास जन्म देते. त्या बाळाचे आपल्या मुलाचे ती सर्वदमन असे नामकरण करते. हळूहळू सर्वदमन जंगलात वाघ, सिंह, हत्ती, बरोबर कुस्ती लढवण्यात पटाईत होतो. अवघ्या १२व्या वर्षी सर्वदमन वेद, श्लोक ह्यात जाणकार बनतो.   

एकेदिवशी कण्व ऋषी शकुन्तलेला म्हणतात की आता तिचा मुलगा दुष्यन्ताचा वारस म्हणून राज्यपद पेलायला तयार झालाय.

दुर्लक्षित शकुंतला 

 कण्व ऋषींच्या सल्ल्याने शंकुतला आपल्या मुलाला घेऊन आश्रम सोडते आणि दुष्यन्त राजाच्या राज्यात पोहोचते. तिथे पोहचताच ती दुष्यन्ताला सांगते की हा तुझा मुलगा, त्याचा स्वीकार कर आणि तू वचन दिल्याप्रमाणे त्याला युवराज म्हणून घोषित करावस. शकुन्तलेला ओळखूनही दुष्यन्त ओळख दाखवत नाही उलट ती काय बोलते आहे ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतो.

धैर्यशील शकुंतला –

दुष्यन्ताच्या नाकारण्यामुळे लज्जित झालेली शकुंतला, क्रोधाने अंगार ओतणारे तिचे लालबुंद डोळे, तरीही संयम ठेवून म्हणते, “तुला सत्य काय आहे हे माहित असूनही तू स्वतःचा आत्मा निकृष्ट दर्जाचा आहे हे दाखवतो आहेस. पाप, पुण्य आपल्या हृदयात बंदिस्त असतात, बाहेरच्या साक्षीदारांची गरज नसते. निसर्ग साक्षी आहे आपल्या सगळ्या कृतींना आणि तोच निसर्ग मला फळ देईल. मी तुझी पत्नी आहे. नीच माणसासारखा भरलेल्या दरबारात माझा अपमान काय करतो आहेस? ह्या तुझ्या मुलाकडे बघ. तो जेव्हा जन्माला आला तेव्हा संतांच्या समुदायाने सांगितले  की हा १०० भव्य यज्ञ करेल आणि या भूमीवर राज्य करेल. तू का नाकारतो आहेस तुझ्या मुलाला?“ त्यावेळी दुष्यन्त शकुंतलेला तुझ्यावर, तुझ्या आई मेनकेच्या चारित्र्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं म्हणतो. खोटारडेपणाचा तिच्यावर आरोप करून तिला जाण्यास सांगतो.

अभिमानी शकुंतला – 

“दुसऱ्यांच्या चुका दाखवणे स्वतःच्या न बघता खूप सोपे आहे. तू मनुष्य रूपात जन्मलास जेव्हा माझी आई दिव्य अप्सरा होती. त्यामुळे आमच्या कुलीनतेची तुझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही. तुझा मुलगा तुझ्या आधाराशिवाय संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. मला देखील अशा असत्याला धरून ठेवणाऱ्या माणसाजवळ राहण्याची इच्छा नाही.” असं  बोलून शकुंतला निघणार तेवढ्यात आकाशातून गर्जना होते, “दुष्यन्त, शकुंतला तुझी पत्नी असून तो तुझा आपला पुत्र आहे. दोघांचा स्वीकार कर तशी आज्ञा देतो तुला. तुझा पुत्र “भरत” या नावाने ओळखला जाईल.“ ह्या दिव्य आकाशवाणीने दुष्यन्त आनंदतो.. तो आपल्या दरबारातील मंत्र्यांकडे बघून म्हणतो मला माहित होते शकुंतला सत्य बोलते आहे पण लोकांना पटावे म्हणून मी त्यांचा स्वीकार लगेच केला नाही. 

दुष्यन्त शकुंतला आणि भरत दोघांचाही स्वीकार करतो. त्यांना आदर, अधिकार बहाल करतो. 

काही वर्षांनंतर आपले सिंहासन भरताला देऊन तो वानप्रस्थाश्रमास निघून जातो.

थोर माता शकुंतला  

अशी थोर माता शकुंतला जिच्या पोटी भरतासारखा पुत्र जन्मास आला जो भारतवर्षाचा सार्वभौम राजा म्हणून जगभर ओळखला गेला. काय  तिची  कूस असेल, काय संस्कार असतील एक माता म्हणून, कसे तिने एकटीने अरण्यात राहून शौर्याचे धडे दिले असतील आपल्या पुत्राला !  

आणि आपण फक्त दुष्यन्ताची प्रेमिका म्हणून तिच्याकडे बघत होतो? 

सीते इतकीच पवित्र, सीतेसारख्याच अग्निपरीक्षेतून जावे लागणारी…..

कोणासाठी? तर प्रजेने मान्यता द्यावी म्हणून खुद्द ब्रह्मांडातून आकाशवाणी च्या वर्षावाने आपलं तेज सिद्ध करणारी शकुंतला मला तरी स्त्री म्हणून खूप खूप अलौकिक वाटते.

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *