मोदींकडून ही अपेक्षा नव्हती
मोदींनी १९ नोव्हेंबरला कृषीविषयक कायदे मागे घेतले आणि उलट सुलट विधाने, चर्चा यांना जोर येऊ लागला. मोदींकडून ही अपेक्षा नव्हती, असा स्वर ऐकू येऊ लागला, विरोधकांचा दोन दिवस उन्माद वाढू लागला तरी विचलित होऊ नका. कारण एखाद्या कुटुंब प्रमुखाची भूमिका आज मोदी पार पाडत आहेत. स्वतःला झुकावे लागले तरी चालेल पण देशाला संकटात टाकणार नाही ही दूरदृष्टी त्यांची कदाचित आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे ही मोदींची हार आहे असं समजणाऱ्यांसाठी काही गोष्टी इथे सांगाव्याशा वाटतात. मोदींनी जेव्हा कुणाचीही तमा ना बाळगता हा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यांनी हे जाहीरपणे सांगितले की कृषिकायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत आणि त्यावर माझा ठाम विश्वास आहे. असे असले तरी काही शेतकऱ्यांना समजावण्यात मी कमी पडलो. पण मला वाटतं आता या राज्यात स्थिरता आणण्यासाठी हे आवश्यक आहे.
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे पंजाब हे सीमेपलीकडून येणाऱ्या अमली पदार्थांनी आजारी केलेलं राज्य आहे. एवढेच नव्हे तर खलिस्तानी चळवळीचा इतिहास असलेले हे राज्य आहे. मागच्या काही महिन्यात अशा चळवळींची बीजे पुन्हा डोकं वर काढतील अशी भीती निर्माण केली होती. अखेरीस देश हित महत्त्वाचे. यातून जर कोणी रस्त्यावर उतरून दंगली केल्या तर सरकारचे निर्णय बदलवता येऊ शकतात असा अर्थ काढला तर तो अशा लोकांचा दृष्टिहीनतेचा दोष आहे असं मी म्हणेन.
काही लोक असेही म्हणतात की उत्तरप्रदेश, पंजाब, मधील निवडणूका हे देखील कारण आहे. तसे पाहिले तर पंजाब निवडणुकांमधील भाजपचे अस्तित्व नगण्य आहे हे या लोकांना सांगणार कोण?
कुठलेही कायदे अमलात आणण्याआधीचा पुरेसा अभ्यास हे सरकार नेहमीच करत आले आहे. उदाहरणादाखल सांगायचे म्हणजे ३७० कलम लागू करताना, नवीन नागरिकत्व कायदा आणताना इत्यादी. त्यामुळे गेले वर्षभर जे दलाल कृषीविषयक आंदोलन चालवत होते त्यांच्यासमोर हे सरकार जे वर्षभर नमले नाही. असे असताना अचानक कायदे मागे का घेतले हे भविष्यात उत्तर मिळेल हे मात्र नक्की. कुठल्यातरी मजबूत देशद्रोही पाठींब्याशिवाय हे आंदोलन चालू असणे शक्य नाही. देशात शांतता प्रस्थापित करणे, अराजकता निर्माण होण्याची कारणे समूळ नष्ट करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे; जे हे कायदे मागे घेऊन मोदीजींनी पार पाडले आहे.
काही राजकीय पक्ष, काही तात्कालिक फायदा बघणारे लोक आणि दृष्टिहीन सामान्य जनता यांना काही स्पष्ट दिसणं केवळ अशक्य आहे.
तरी चीनचे वारंवार होणारे आक्रमण, पाकिस्तानची घुसखोरी हे जनतेला दिसत नाही त्याला नाइलाज आहे. कदाचित देशाचा सन्मान अशा लोकांना स्वतःच्या स्वार्थापुढे कमी वाटतो. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.
काही सूत्रांच्या मते कृषिकायद्याआड हिंदू शीख दंगली पेटवणे किंवा शीखांविरुद्ध हिंदू असं चित्र निर्माण करणे हा कट अस्तित्वात येत होता जो मोदींनी उद्ध्वस्त केला. “श्री अकाली तख्त साहिब” चे जथ्येदार ज्ञानी हरप्रीतसिग यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देशविरोधी शक्तीच्या कारवाया वेळीच आटोक्यात आणल्या हे आंदोलन थांबवून.
त्यामुळे मोदींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.