मला भावलेल्या स्त्री व्यक्तिरेखा – लता मंगेशकर
काही महिन्यांपासून मी जेव्हा “मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा” ह्या शीर्षकाखाली लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा लता मंगेशकर ह्या व्यक्ती विषयी लिहायचे हे अनेकदा मनात येऊन गेले. पण केवळ ह्यासाठी लिहिले नाही की इतिहासातील कुठे आहेत दीदी? त्या तर आपल्याबरोबर आहेत. छान गातायेत. आणि दुसरे कारण त्यांच्याविषयी लेख न लिहिण्याचा हे की त्या सामान्य स्त्री नाहीयेत तर त्या स्त्री रूपातील साक्षात सरस्वतीची अवतार आहे. दैवत आहेत. संगीत प्रेमी, तरुण, वृद्ध, बाळ गोपाळ यांची देव्हाऱ्यात वीणा घेऊन बसलेली गानसरस्वती. आणि अशा दैवताबद्दल माझ्यासारखी लहान, अतिसामान्य व्यक्ती काय लिहिणार? माझी वाणी मूक होते, अचंबित होते लताताई तुझे गाणे ऐकून! तरी आज मी तुझ्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केलाय…..
आज सकाळी जी बातमी पाहिली की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतादीदी काळाच्या पडद्याआड…. आणि अचानक घड्याळ थांबल्यासारख झालं, तिथेच थिजल्यासारखं झालं… हे कसं शक्य आहे? देव्हाऱ्यासमोर जाऊन पाहिलं, सगळे देव आहेत की, सरस्वती ही आहे तिथेच. मग लतादीदींबद्दल असं का बोलतायेत? दैवतं भक्तांजवळच असतात, अमर असतात. काही केल्या मन हे मानायला तयार नव्हते की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस जाणारच. जरावेळाने भानावर आल्यावर सावरलं स्वतःला. आणि समजूतही घातली आपल्या मनाची.
काही वर्ष मागे जाऊन आठवलं…. माझ्या बालपणीचे दिवस, मी वाढले ते लतादीदींच्या गाण्याबरोबरच… आपण जन्माला आल्यापासून लोरी ऐकून झोपलो ती लतादीदींचीच. मग ती “धीरे से आजा री अखियन में,” ( https://www.youtube.com/watch?v=_f-BLl0L1mk ) असो किंवा “चंदा है तू मेरा सुरज है तू” ( https://www.youtube.com/watch?v=PTyBaoqtx4Q ) असेल… सकाळ व्हायची तीही “घनःश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय जाहला”… ( https://www.youtube.com/watch?v=YpBqoVVYyYw ) ह्या भूपालीने दीदींच्या….
संध्याकाळी दिवा लावताना “शुभम करोति म्हणा मुलांनो” ( https://www.youtube.com/watch?v=1joB9fK0lgw ) हे लता दीदींच्या तोंडचे श्लोक संपूर्ण वातावरण पवित्र करून टाकत. तर शाळेत “बच्चे मन के सच्चे”, “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” अशी गीतं गाऊन लतादीदींनी लहान मुलांवर संस्कार सिंचन केले. लतादीदी तुम्हाला शतशः वंदन!
“तेरे सूर और मेरे गीत” ( https://www.youtube.com/watch?v=y1rXS6hx8x0 ) आणि “प्रेमस्वरूप आई”, ( https://www.youtube.com/watch?v=LRSgtP1x1rI ) “कल्पवृक्ष कन्येसाठी” ( https://www.youtube.com/watch?v=paPpn-LWHmk ) ही गीते मी शाळेत असताना कितीदा म्हणायची, ऐकायची आणि हमसून हमसून रडायची… केवळ लताताई तू प्रेम, माया या ओतप्रोत भरलेल्या भावनांनी ती गायलेली असल्याने.
आपल्या मातृभूमीविषयी प्रेम नसातून भिनू लागतं जेव्हा आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लता दीदींनी अजरामर केलेले हे गीत ऐकतो “ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला” ( https://www.youtube.com/watch?v=VtIQ5SNZUKI ) आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी “है मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी” जेव्हा लता दीदी गातात तेव्हा रोम रोम शहारून जातो आणि नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. लता दीदी तुझे सूर आकाशाला गवसणी घालतात. स्वर्ग लोकी परमेश्वराच्या हृदयाशी समरस होतात. तू कोण आहेस? काय म्हणू तुला? किमयागार? लाखों लोकांच्या हृदयावर तू राज्य केलंस. म्हणूनच तुला सम्राज्ञी म्हणायचं. तुला त्रिवार नमन…
तुझ्याविषयी अभिमान, जवळीक यासाठी वाटतं कारण तू एक मराठी मुलगी, सामान्य कुटुंबात वाढलेली, आमच्या महाराष्ट्रात, सांगलीत राहिलेली. भारत भूमीला संगीत क्षेत्रात जगाच्या नकाशात तू गौरव स्थान मिळवून दिलंस. तुझी भारत भूमी नेहमी ऋणी असेल.
तुझ्या गाण्यांवर हिंदी मराठी शेकडो सिनेतारका थिरकल्या. तुझ्या आवाजाची जादू अशी की शाळकरी मुलीपासून प्रौढ स्त्री पर्यंत तू सगळ्यांना आवाज दिला आहेस. तुझ्या आवाजाची लवचिकता इतकी की तू किती ढंगाची गाणी गायलीस! बालगीते, प्रणयगीते, विरहगीते, अंगाईगीत, देशभक्तीपर गाणी….
आज अचानक तुझं नसणं, कल्पनाच सहन होत नाहीये. मन म्हणतंय “तेरा जाना, दिल के अरमानों का लूट जाना”… ( https://www.youtube.com/watch?v=_Mrl_oozN4U ) “न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ, अचानक ये दिल किसी के जाने के बाद, करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात…” ( https://www.youtube.com/watch?v=9q1ODU2q0IU )
तू जरी प्रत्यक्षात नसलीस तरी “मेरी आवाजही पहचान है” ( https://www.youtube.com/watch?v=ZfkaxRYnZWA ) म्हणालीस ना? तुझा स्वर आसमंतात दुमदुमतोय, सदैव कानाशी तुझा मधुर ध्वनी गुंजारव करेल. खूप जड अंतःकरण झालंय लिहीत असताना…
ब्रह्माण्डात ध्रुव तारा अढळ स्थानी विराजमान झालाय, त्याला पाहिलं की तुझी याद येणार, कारण आमच्यासाठी तर संगीत विश्वातील ध्रुवतारा तूच असशील.
“लता”, तुझ्या नावाला उलट वाचले तरी “ताल” बाहेर येतो. तू साधं बोलत असतानाही नाद झंकारतो, अंगावर रोमांच येतात इतके तुझे सूर ऐकणाऱ्याच्या आत्म्याला जाऊन भिडतात, तसेच परमेश्वराचेही होत असावे तुझे सूर जेव्हा आकाशातून विहार करतात तेव्हा. पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात लतादीदींबद्दल म्हटले होते, “मला कुणी देव आहे का म्हणून विचारले तर मी म्हणेन माहित नाही. पण आकाशात चंद्र आहे, सूर्य आहे आणि लता चे एका दिशेहून दुसऱ्या दिशेला संचार करणारे सूर आहेत. “किती खरं आहे हे!कदाचित काही लोकांना वाटेल तू गेलीस. “जन पळभर म्हणतील हाय हाय…” ( https://www.youtube.com/watch?v=vcVRdUVZrZQ ) पण माझ्यासाठी तू चिरंजीवी आहेस. तुझे सूर चिरंजीवी आहेत. परवा वसंत पंचमी होती. वीणा हातात धरलेली शारदा म्हणजे तू , नंतर एक दिवसाने रथ सप्तमी, तू गेलीस तो सूर्योदयाचा समय साधून, ह्या दोन दिवसांमधील. परवा येणार भीष्म अष्टमी. ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे तू मोक्ष साधला अशाप्रकारे.
शेवटी लताताई तुला आदरांजली वाहताना तूच गायलेल्या ज्ञानेश्वरांच्या पसायदान म्हणून नतमस्तक होताना, साश्रू नयनांनी गुणगुणताना हीच प्रार्थना तुझ्या वाणीचा अखंड यज्ञ ह्या ब्रह्माण्डात दुमदुमत राहो!
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ।। ( https://www.youtube.com/watch?v=DQTKecWB9OM )