Wedding Vs Marriage
आपल्या भारताची कुटुंबसंस्था ही जगाच्या इतिहासात असणारी एकमेव अशी विवाह संस्थेवर आधारित रचना आहे ज्याचा आम्हा भारतीयांना अतिशय अभिमान आहे. पण गेल्या काही दशकांपासून जणू काही ग्रहण लागले आहे ह्या रचनेला, ज्यामुळे आपल्या कुटुंबसंस्थेची पाळंमुळं पार हलली आहेत. आता नेमका काय बदल आणि कशामुळे झाला असा विचार केला तर आपण एक उदाहरण घेऊया. साधारण २५ वर्षांपूर्वी आलेला सिनेमा “हम आपके है कौन”. माधुरी दीक्षित चा अतिशय सुंदर सिनेमा. “लग्न” हा संस्कार अतिशय उत्साहाने, कुटुंबातील लहान मोठे सगळ्यांची मने जपणारा, कुटुंबातील सगळ्यांबरोबर बघावा असा सिनेमा. पण आपल्या तरुणाईने ह्या सिनेमाचा नेमका घ्यायचा तो अर्थ न घेता त्यातील लग्न हा सोहळा, त्यातील फिल्मी अंदाज, ज्वेलरी, लहेंगे, गाणी, मेहंदी ह्या गोष्टी घेतल्या. आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सिनेमात लग्न हा विधी न राहता सोहोळा बनला आणि तरुण पिढीसाठी देखील वास्तवातील लग्न हे पवित्र बंधन कमी तर ८ दिवस चालणारा फॅशन वीक बनला. एक असा इव्हेंट बनला की त्याचं नामकरण “डेस्टिनेशन वेडिंग” असं झालं. प्रत्येक क्लास आपण Elite class मध्ये येण्यासाठी आवर्जून प्रयत्न करू लागला…. विवाह हा सोहळा कसा असणार ह्यावर चर्चा, बजेट सुरु झाले. शॉपिंग, ब्युटीपार्लर, जिम, वेट लॉस प्रोग्रॅम साठी अँपॉईनमेंट्स, इत्यादी इत्यादी….. जुन्या मंगल कार्यालयाची जागा lawns ने घेतली. किंवा ३ स्टार, ५ स्टार हॉटेल्स, AC Halls आले. मंगल सनई जाऊन त्या जागी DJ songs, Remix आले. पाट रांगोळी अशी जेवणाची पंगत जाऊन बुफे आले. मसाले भात, जिलबीसारखे पदार्थ कालबाह्य होऊन बंगाली स्वीट्स, नूडल्स व्याहीभोजनात डिश सजवू लागले. उभे राहून माणसं जेवू लागली. नवरा बायको ने घास भरवणे सारखे लोभस प्रसंग जाऊन लग्नाआधी ज्याला pre wedding shoot म्हणतात ते आले. होणारा नवरा आणि बायको महागडे कपडे घालून आऊटडोअर फोटोशूट करू लागले. आपण कसे दिसतो हे एकमेकांविषयी प्रेमापेक्षा जास्त महत्वाचे वाटू लागले. प्रेमाची भाषा पैसा ठरवू लागला.पारंपरिक वस्त्रं जाऊन घागरा, शरारा किंवा शेरवानी आली. सोन्याची जागा diamond jewellery ने घेतली. स्त्री धन म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडला, परंपरा ऑऊटडेटेड होऊ लागल्या आणि त्याबरोबर थोरामोठ्यांचे आशीर्वादही…. नातेवाईक ८,८ दिवस येऊन राहीनासे झाले कारण everything instant and ready wala catering services चा जमाना आला. मेहंदी, bangle ceremony, haldi ceremony, welcome dance, etc आले आणि २ दिवसात पण संस्कारांनी सिंचित लग्न प्रथा ८ दिवसांचा केवळ सोहोळा झाली. Costly honeymoon resorts etc आटोपले . तुम्ही म्हणाल ८ दिवस साजरे करण्यात वाईट काय, तर तसे वाईट काही नाही पण पैशाचा अपव्यय, वेळेचा अपव्यय होऊनही लग्न ज्या मूल्यांवर आधारित असायला हवे ते नसल्याने गोडवा राहिला नाही. प्रेमाची जागा personal space, rights व अधिकाराने घेतली. त्यामुळे हल्लीची स्वतःच्या पायावर उभी असलेली पिढी तडजोड करेनाशी झाली. लग्न हे Wedding Ceremony नसून Marriage आहे हे ह्या पिढीला सोहोळा संपला की जेव्हा संसार सुरु होतो तेव्हा खऱ्या अर्थाने समजू लागते आणि त्यातील ग्लॅमर जाते. पूर्वीच्या काळी साधेपणात एकमेकांविषयी आदर, प्रेम, जिव्हाळा ह्या भावना होत्या. फिल्मी दुनिया आणि वास्तव ह्यात जमीन आसमानाचा फरक असतो हे हळूहळू समजायला लागला की वाद होऊ लागतात. लग्न ही फक्त सोहोळा नसून एकमेकांचे गुणदोष स्वीकारून निभावण्याची संस्था आहे हे जेव्हा समजते तेव्हा इगो मुळे नम्रपणा नसतो आणि नाते गुंतागुंतीचे होत जाते.ह्यावर प्रत्येक जण व्यवहारी पणे निर्णय घेतो, भावना दुय्यम होत जातात आणि उरते एकच भीती Wedding ceremony झाला Marriage चे काय?