आषाढी एकादशी निमित्त विशेष…. “घनु वाजे घुणघुणा”

श्री संत ज्ञानेश्वरांची “विराणी” किंवा “विरहिणी” हा काव्यप्रकार म्हणजे हृदयस्थ भावनांचा एक उत्तुंग अविष्कारच म्हणावा लागेल! या विराण्यांतून माउलींनी निसर्ग, मानवी मन आणि स्त्रीसुलभ भाव-भावनांचा आधार घेऊन परमोच्च कोटीच्या एकात्म भावाचे सहजसुलभतेने दर्शन घडवले आहे.
“घनु वाजे घुणघुणा”या विराणी मधून माउलींनी एका विरहिणीची कृष्ण भेटीसाठी होणारी तगमग व्यक्त केली आहे. विरहाने तप्त झालेल्या या प्रेयसीचा दाह केवळ मनमोहनाच्या भेटीनेच शांत होऊ शकणार आहे. त्या श्रीरंगाच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या विरहिणीला शाश्वत सत्याची अनुभूती कशी येते या कल्पनेतून माउलींनी शेवटी आत्मा – परमात्म्याचे अद्वैत समजावून सांगितले आहे.

घनु वाजे घुणघुणा ।
वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।
वेगी भेटवा कां।।१।।

ग्रीष्म ऋतुची दाहकता शांत करण्यासाठी आकाशात मेघ जमू लागले आहेत.. ते मेघ एकमेकांच्या अंगाला घुसमटू पहात आहेत… त्यासोबतच वारा देखील सुटला आहे… खरं तर घनांच्या या एकमेकांवर आदळण्याचा आणि सोसाटयाच्या वाऱ्याचा आवाज तसं पाहायला गेलं तर कर्णमधुर नक्कीच नाही; परंतु साऱ्या विश्वावर प्रेम करणाऱ्या माउलीला प्रत्येक गोष्टीत हळुवारताच जाणवते! माऊलीच्या मृदू हृदयाला त्या घनांच्या कर्णकर्कश्श आवाजात देखील नाद मधुरता जाणवू लागते… सोसाट्याच्या वाऱ्यात रुणुझुणु रुणुझुणु अशी रुंजी घातल्याचा भास होतो… श्रीरंग भेटीची आस असलेल्या या विरहिणीला हवाय तो फक्त तिचा कान्हा! त्यामुळे ती म्हणते, मला दुसरे काहीही नको… संपूर्ण ब्रह्मांडाला तारणारा असा हा माझा कान्हा मला भेटवा.

माउली शब्दांना इतकं तलमपणे गोंजारतात कि त्या शब्दांना वाटू लागतं; जणू आपण सशाच्या लुसलुशीत पाठीवर स्वार झालोय! आता हेच पहा ना, “भवतारक” या शब्दाला “भवतारकु” करून माउलींनी ती विरहिणी आणि तिचा कान्हा या दोघांमधील वत्सल भाव दर्शविला आहे. कन्हैय्याला भेटविण्याची उत्कटता “वेगीं” या शब्दाने अधिक तीव्र झाली आहे.

चांदवो वो चांदणे ।
चापेवो चंदनु ।
देवकी नंदनु ।
विण नावडे वो ॥ २ ॥

त्या विरहिणीचा विरहाग्नीची दाहकता इतकी तीव्र आहे कि; ती कशानेही शांत होत नाहीये. शीतलतेचे प्रतीक असणारा चंद्र आणि चांदण्यांना देखील हा दाह कमी करता येत नाही. चंदनाचा लेप लावला तरी तो विरहाग्नी शांत होत नाहीये. तिला आता केवळ आणि केवळ देवकीनंदन हवा आहे. या ठिकाणी माउलींनी “देवकीनंदन” या शब्दाची योजना करून एका मातेच्या हृदयातील आर्तता दर्शवली आहे. आपल्या सात अपत्यांच्या मृत्यूचे दुःख सहन करून देवकी आपल्या आठव्या पुत्र जन्माची वाट पहात होती; कारण तिला माहिती होते हाच माझा पुत्र जगाचा उद्धार करणार आहे! देवकीला जसे या पुत्र जन्माची ओढ होती तेवढीच ओढ या विरहिणीला लागून राहिली आहे. म्हणूनच माउलीच्या मुखातून शब्द येतात, “देवकीनंदनु च्या भेटीशिवाय जगातील कोणतीही गोष्ट मला आता आवडत नाहीये”.

चंदनाची चोळी ।
माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी ।
वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥

दाहकतेवर उत्तम उपाय म्हणून चंदनाचा वापर केला जातो. परंतु त्याच चंदनाची केलेली चोळी देखील माझ्या सर्व अंगाची लाही लाही करून सोडतीये एव्हढा हा विरह दाहक आहे. यावर उपाय एकच; तो म्हणजे माझा सखा कान्हा मला भेटवा! या विराणीमध्ये कृष्णाच्या विविध नावांचा ठिकठिकाणी होणारा औचित्यपूर्ण वावर म्हणजे माउलींच्या सृजनशीलतेचा उत्कट अविष्कार म्हणावा लागेल. या कडव्यात व्यक्त झालेलं “कान्हो वनमाळी” म्हणजे बाल-सवंगडी, झाडे-वेली-वने, पशु-पक्षी, गायी-वासरे आदी चराचर सृष्टीला भगवंताच्या बालरूपात पडलेली भूल निर्देशित होते. अशा या बाल कन्हैय्याला मला वेंगीने भेटवा असे ती विरहिणी विनंती करीत आहे.

सुमनाची सेज ।
सीतळ वो निकी ।
पोळी आगीसारिखी ।
वेगीं विझवा गा ॥ ४ ॥

अगदी मऊ-मुलायम, सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपले तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे. काहीही करून आता हा विरहाग्नी त्वरीत विझवा अशी आर्त विनवणी ती आपल्या संख्यांना करतेय.

तुम्ही गातसां सुस्वरे ।
ऐकोनि द्यावी उत्तरे ।
कोकिळें वर्जावें ।
तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥

मला माहित आहे, तुम्ही सर्वजणी माझं मन लागावं म्हणून सुस्वर आवाजात गाणी म्हणून मला रिझविण्याचा प्रयत्न करीत आहात. कोकीळेचा कुहू कुहू होणारा नादमधुर स्वर सर्वांना पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. परंतु तो सुमधुर स्वर देखील नकोस झाल्याने ती आपल्या मैत्रिणींना विनवणी करते कि, सख्यांनो तुम्ही जा आणि त्या कोकीळ पक्षाला आर्जव करा कि; बाबा रे, आता थांबव तुझं हे कुहू – कुहू करून मला रिझवणं, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये.

दर्पणी पाहातां ।
रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
मज ऐसे केलें ॥ ६ ॥

कृष्ण भेटीच्या व्याकुळतेने आपली काय अवस्था झाली आहे हे घटकाभर पहावं म्हणून मग ती विरहिणी आरशात आपलं रूप पाहायला जाते नि काय आश्चर्य! त्या आरशात तिचं रूप तिला दिसतंच नाहीये… कुठं गेलं माझं रूप? या आरशात तर मला तो “कान्हा”च दिसतोय! जणू तो कान्हा-श्रीरंग ज्याची भेट घडावी असं वाटत होतं “तो” आणि “मी” एकच तर आहोत! माउली म्हणतात की, त्या विरहिणी सारखीच माझी अवस्था झाली आहे….विठ्ठल भक्तीने ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन माझ्यातलं “मी”पण गळून जाऊन त्या विठ्ठलाच्या ठायी वसलं आहे आणि त्यामुळे मी विठ्ठलमय झालोय!

निसर्ग आणि मानवी भावभावनांचा वेध घेत-घेत सुरु झालेला हा प्रवास एका ‘शाश्वत सुखापाशी’ येऊन थांबतो!

पुंडलिक वरदा हारी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम!! पंढरीनाथ महाराज कि जय!!!
विठ्ठल! विठ्ठल!! विठ्ठल!!!

 

Shirish Ambulgekar

Shirish is working in of the top Pharma companies at a high position. He is a passionate blogger and has written a book by the name 'Athavan'. He has been donating all the sales proceeds of this book to poor and needy students. He can be reached at : 7021309583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *