पानशेत पुराच्या आठवणी…

माझे वडील श्री.श्रीकांत देशपांडे यांनी अनुभवलेली पानशेत धरण फुटले ती चित्तथरारक घटना…

पानशेत धरण फुटून पुण्यात आलेल्या महापूराला आज ६१ वर्ष झाली. १२जुलै १९६१ बुधवार होता. मी तेव्हा प्री डिग्री मध्ये फर्ग्युसन ला होतो. आमचे केमिस्ट्री चे पहिलेच प्रक्टीकल होते. ताबडतोब सुट्टी जाहीर करण्यात आली. रात्रभर तिकडेच अडकून पडलो. त्यावेळी मी पुणे विद्द्यार्थी गृहात रहात होतो. दुसर्या दिवशी तिथे पोहोचलो . पूरग्रस्त केंद्र चालू झाले होते महिनाभर तेथे काम केले. १६ ऑगस्ट ला कॉलेज पुन्हा सुरु झाले. आठवले म्हणून लिहिले.

पूर्वी डेक्कन वर हिंदविजय नावाचे सिनेमा थियेटर होते नंतर त्याचे नाव नटराज असे झाले आता तेथे व्यापार संकुल आहे . पुराचे वेळी हिंदविजय मध्ये जिस देशमे गंगा बहती है हा सिनेमा होता. अर्ध्या तासापूर्वी याच लकडी पूलावरुन मी फर्ग्युसनला गेलो होतो. पाणी पूलाला स्पर्श करुन चालले होते. संभाजी बागेच्या मत्स्यालयातील मासे कधीच खरोखरच्या पाण्यात गेले होते. कॉलेज सुटल्यानंतर जेमतेम रुपाली हॉटेल पर्यंत येउ शकलो . थोड्याच वेळात त्या भागात व जंगली महाराज रोड वर बोटी तून बचाव कार्य सुरु झाले. त्यावेळी मोबाईल व संगणक नव्हते त्यामुळे कोणाचे नातेवाईक कोणत्या पूरग्रस्त केंद्रात आहेत हेही समजत नव्हते. आपल्या घरातील कोण कोठे आहे , आहे की नाही हेच कुणाला समजत नव्हते. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी आहे तसा बाहेर पडला होता.

पानशेत पुराच्या आठवणी:- माझी पत्नी प्रियंवदा संभाजी पार्क समोरच्या तीन मजली घरात रहात होती. जसजसे पाणी चढायला लागले तसतसे घरातले सगळेजण घाबरत घाबरत एक एक मजला वर चढत होते. शेवटी तिसऱ्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर पोचले. पाणी दुसऱ्या मजल्याच्या वर चढत असलेले पाहून आता आपली शेवटची घटका भरली याची खात्री पटली.पण देवाच्या दयेने शेवटच्या पायरीवर आल्यावर पाणी ओसरू लागले आणि आम्हीं निःश्वास सोडला.
मी श्रीहर्ष सदाशिव पेठेत रहात होतो आणि रोज लकडी पूल सायकलवरून क्रॉस करून गरवारे कॉलेजमध्ये जात असे.
टिळक रोड वरून लकडी पुलावर जाताना नदीपात्र दिसत नाही.
त्या दिवशी सकाळी मी नेहमी प्रमाणे कॉलेजला जाताना टिळक रोड वरून लकडी पुलावर चढलो. पोलिस बंदोबस्त होता.मला वाटले मोर्चा असेल आणि कॉलेजला जायला उशीर झाला होता त्यामुळे पुणेरी चलाखीने पोलिसांना चुकवून सायकल पुलावर दामटली आणि काय त्याच वेळी पुलावरून पाणी वहायला लागले. पाण्यामुळे सायकल चालवता येईना. सायकलरून रस्त्यावर उडी मारून धावत पूल ओलांडला आणि वाचलो.
एक गोष्ट मुद्दाम नमुद करायची आहे की मातीच्या धरण फुटीचे प्रवाही पाणी नव्हते. माती मिश्रित पाणी असल्याने त्याचे वहाणे sluggish होते आणि म्हणूनच मला उरलेला पूल क्रॉस करता आला. नाहीतर काय झाले असते त्याची कल्पना करता येत नाही.

नंतर दुसऱ्या दिवशी अशी हूल उठली होती की पाण्याच्या जोराने खडकवासला धरण पण फुटले आहे आणि लोक धावपळ करायला लागली होती. पण एकाच वेळी लोकांनी भितीदायक पूर आणि लोकांनी स्वयंप्रेरणेने केलेली मदतही अनुभवली. बऱ्याच लोकांनी आपल्या पूरग्रस्त नातेवाईकांना आणि मित्रांना आपल्या घरामध्ये सामावून घेतले त्यांची घरं साफसफाई करण्यासपण केली.

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *