जाणून घेऊ या संरक्षण दलातील विविध पदे
मी साधारण 5 वर्षांपूर्वी 35 वर्षाच्या भारतीय वायुसेनेतील सेवेनंतर निवृत्त झालो. निवृत्तीनंतर समाजासाठी काही करावे ह्या हेतूने मी युवकांना व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण ह्या विषयांवर निशुल्क मार्गदर्शन करावयास सुरुवात केली व त्याच बरोबर सेनेमधे अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलाखतीसाठी पण मार्गदर्शन करू लागलो. ह्या कार्यासाठी मला बऱ्याच महाविद्यालयामधे व शाळांमधे भेट द्यावी लागे. ह्या भेटींमधे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संरक्षणदलाबद्दल विद्यार्थ्यांना काही शिक्षकांना व सामान्य नागरिकांना पण फारच कमी माहिती आहे. संरक्षणदलातील पदांबद्दल (Ranks) सुद्धा त्यांचे ज्ञान अपुरे असते. म्हणूनच ह्या लेखाद्वारे संपादकांच्या विनंती वरून मी, संरक्षणखात्याचे (थलसेना, वायुसेना व नौसेना) विविध पदे(Ranks) , तसेच निवृत्तीनंतर ही सेनाधिकाऱ्यांना संबोधतानाही पदे का उपयोगात आणावयाचे ह्याबद्दल लिहिणार आहे.
संरक्षणदल एक श्रेणीबद्ध संस्था आहे त्यामुळे (Rank)हुद्यांचे महत्त्व अधीकअसतें. भारताच्या सविधानांनाने अनुच्छेद 53मधे ज्यात संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांचा उल्लेख आहे ह्यात हे सुस्पष्ट केले आहे की राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. म्हणूनच ते सर्व संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना ‘प्रेसिडेन्सीयल कमिशन ’बहाल करतात.ह्या कारणेच निवृत्तीनंतर सुद्धा ही पदे वापरण्याची मुभा फक्त संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनाच आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच संरक्षण अधिकाऱ्यांचा उल्लेख करतांना त्याच्या हुद्यांचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. पदे उपसर्ग (Prefix)म्हणून जोडावयची असतात, उदाहरणच द्यायचे झाले तर एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर (निवृत्त) असे…………
जर सामान्य नागरिकांना पदांबद्दलच माहिती नसेल तर ते कसे बरे पदासहित (Rank)संरक्षण अधिकाऱ्याला संबोधणार?म्हणूनच मी येथे तिन्ही दलांच्या पदांची माहिती देत आहे.
थलसेना | वायुसेना | नौसेना |
फील्ड मार्शल | मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स | ऍडमिरल ऑफ द फ्लीट |
जनरल | एअर चिफ मार्शल | ऍडमिरल |
लेफ्टनंट जनरल | एअर मार्शल
| वाईस ऍडमिरल |
मेजर जनरल | एअर वाईस मार्शल | रिअर ऍडमिरल |
ब्रिगेडियर | एअर कमोडोर | कमोडोर |
कर्नल | ग्रुप कॅप्टन | कॅप्टन |
लेफ्टनंट कर्नल | विंग कमांडर | कमांडर |
मेजर | स्कॉड्रन लीडर | लेफ्टनंट कमांडर |
कॅप्टन | फ्लाईट लेफ्टनंट | लेफ्टनंट |
लेफ्टनंट | फ्लाइंग ऑफिसर | सेकंड लेफ्टनंट |
त्याच प्रमाणे संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना जेव्हा राष्ट्रपती विविध पुरस्कार प्रदान करतात ते पुरस्कार प्रत्यय (Suffix)म्हणून, जोडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संरक्षण दलातील अधिकाऱ्यांचा असतो.
भारत रत्न किंवा पद्म पुरस्कार उपसर्ग(Prefix) किंवा प्रत्यय(Suffix)म्हणून जोडण्याचा अधिकार भारताच्या सविधानांतील अनुच्छेद 18 प्रमाणे देण्यात आलेला नाही.एवढेच नव्हे तर असे केल्यास त्या व्यक्तीला पुरस्कारापासून वंचित करण्याचा अधिकार हा सरकार कडे आहे.
परंतु,भारत रत्न किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीना‘ राष्ट्रपतींच्या हस्ते भारत रत्न ने सन्मानित ’किंवा ‘भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ’असे संबोधित करता येते. भारतरत्न व पद्म पुरस्कार हे टायटल म्हणून उपयोगात आणायचे नसतात. फक्त संरक्षणदलातील अधिकाऱ्यांना आपले पद(हुद्दा)उपसर्ग(Prefix)म्हणून व मिळालेले पुरस्कार प्रत्यय(Suffix)म्हणून सेवेत असताना व सेवानिवृत्तीनंतर वापरण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे.राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर आहेत आणि म्हणूनच ते सर्व संरक्षण दलाच्या अधिकार्यांना प्रेसिडेन्सीयल कमिशन बहाल करतात म्हणून संरक्षणदलातील अधिकाऱ्यांना पदांसाहित (Rank)संबोधणे अनिवार्य आहे असेच म्हणता येईल. हा फक्त संरक्षण दलातील अधीकाऱ्यांना दिलेला एक सन्मानच म्हणावा लागेल.संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना सबोधतांना त्यांचे पद व त्यांना मिळालेले पुरस्कार ह्याचा उल्लेख त्याचे महत्व जाणून जर करण्यात आला तर ह्या लेखाचा उद्देश साध्य झाला असे म्हणता येईल.